मुंबईनं भारतीय व्हायला शिकवलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 05:04 PM2018-08-09T17:04:44+5:302018-08-09T17:28:50+5:30

लोक वाईट नसतात, माणसाची वेळ वाईट असते याचा अनुभव पहिल्यांदा आला तो मुंबईत. माझ्यातली मी सापडले ती ही मुंबई. वेगवेगळ्या संस्कृतीत वाढलेल्या माणसांसोबत राहायला शिकवलं तेही मुंबईनेच.

Mumbai taught to become an Indian! | मुंबईनं भारतीय व्हायला शिकवलं!

मुंबईनं भारतीय व्हायला शिकवलं!

Next
ठळक मुद्देमुंबई हे शहर नाही, त्याहून मोठं काही आहे, जे तुमच्यात भिनतं.

-अस्मिता मस्के


ऑक्टोबरमधली गोष्ट असेल. माझा मुंबईमधला पहिला दिवस. एका खासगी कंपनीमध्ये इण्टरव्ह्यू होता, अंधेरीला. आई-बाबा नको म्हणत असताना मुंबईला आले. दादाकडे थांबणार होते. दादा शिवडीला राहात होता. लोकलने जायची भीती वाटत होती, तर तो म्हणाला माझी स्कूटी घेऊन जा. मुंबई लोकलबद्दल मनात एवढी भीती की मी लगेच तयार झाले. त्यावेळी हेही माहीत नव्हतं की अंधेरी आहे कुठं? जायचं कसं? गूगल मॅप चालू केला आणि निघाले. साधारण तास-दीड तासाच्या प्रवासानंतर अंधेरीला पोहोचले. मुलाखत झाली, जॉब मिळाला त्या आनंदात परतीच्या प्रवास चालू झाला. हिवाळा होता अर्थात मुंबईमध्ये कसली आलीय थंडी, घामाच्या धारा वाहत होत्या. दिवसभराचा प्रवास आणि दमट वातावरण यामुळे फार चिडचिड झाली होती माझी. नवीन जॉब मिळाला याचा आनंद होता; पण खूप प्रश्न होते. राहू शकेन का मी या शहरात? चिंता लागली होती, जमेल का हे मला? पुण्याबद्दल प्रचंड प्रेम होतं मला नेहमीच. पुणेकरांचा तो स्वभाव, तो स्पष्टवक्तेपणा माझ्या स्वभावाला साजेसा होता; पण तरी निर्णय घेतला मी माझ्या क्षेत्नात काही करायचं असेल तर मुंबईशिवाय पर्याय नाही असा. मला मुंबईला जॉबला पाठविण्यासाठी कोणीच तयार नव्हतं; पण मी हट्टी निर्णय घेतला आणि निघाले. ट्रेनचं तिकीट बुक केलं गडबडीत, तिही एलटीटीला जाणारी. आता हे एलटीटी नेमकं कुठं आहे याचा जरादेखील अंदाज नव्हता. त्यात ओएलएक्सवरून राहण्याची जागा शोधली. पैसे भरले, सगळं सुपरफास्ट काम झालं, आणि सुरू झाला मुंबईचा प्रवास.  
त्या फ्लॅटवर कोणी नसायचं, का तर मुंबईचं नाइट लाइफ. त्यात अस्सल पुणेरी वरण, भात, भाजी, चपाती खाणार्‍या मला अंधेरीसारख्या ठिकाणी बंगाली, बिहारी कामवाल्या बायकांनी बनविलेलं जेवण काही पचनी पडेना. समस्या वाढत आहेत हे जाणवायला लागलं होतं. अजून ऑफिसमध्ये कामात निभाव लागायचा होता. अचानक ऑफिसला जाताना मोबाइल चोरीला गेला. नवीन शहर, नवीन लोक, नवीन ऑफिस या सर्वात माझं करमणुकीचं साधन होता तो मोबइल. पार संताप झाला काय हे शहर आहे. ना नीट जेवण, नुसती धावपळ, चोरी, लोकदेखील चांगले नाहीत अशा सर्व विचारांनी मुंबईचा राग आला. एका क्षणाला वाटलं सारं सोडून पुण्याला परत जाऊया पण ते आता शक्य नव्हतं. 
हळूहळू माझं रूटीन जमलं. एरव्ही कधी आईला साधी मदत ना करणारी मी स्वतर्‍ स्वयंपाक करायला सुरुवात केली. सकाळी स्वयंपाक, मग ऑफिस, मग थोडी भटकंती असा काहीसा दिनक्रम सुरू झाला. खाण्याची आवड तर माझी होतीच; पण आता कळलं की साध्या साध्या भाज्या बनवत असतानादेखील एखादा छोटा जिन्नस टाकायचा राहिला तरी भाजीची चव किती बदलते. मला स्वयंपाक करायला आवडतो हे मला नव्यानंच समजलं. या शहरात रात्नी फिरण्याची काय नशा आहे हे अनुभवूया म्हणून एकदा रात्नी फिरण्याचा बेत आखला. लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला गेले. किती ते लोक, काय त्यांचा तो उत्साह, ती प्रचंड ऊर्जा पाहून मी मोहून गेले. दिवसभर ऑफिस करून थकून गेल्यावरही कुठून येत असेल हे सारं? प्रश्न पडला मला. एकीकडं पुण्यात ग्राहक दारात उभा असला तरी 9 वाजले की दार तोंडावर बंद करणारे लोक आणि इथं मात्न उलट चित्न पाहायला मिळालं. माझं कुतूहल अजून वाढायला लागलं होतं. या शहरात रात्नीची नशाच वेगळी असते, असं वाटलं.
हळूहळू या शहराची नशा मला कधी चढली हेच कळलं नाही. सगळ्या खाऊ गल्ल्या फिरले, वेगळे वेगळे पदार्थ खाल्ले. फोर्टला बडेमियापासून ते मीरारोडला असणार्‍या  ढाब्यार्पयत, सीएसटीला गाडय़ांवर मिळणार्‍या अंडाभुर्जीपासून आलिशान मराठी रेस्टॉरंटर्पयत सारं पालथं घातलं. साऊथ मुंबईमधल्या कमानी असणार्‍या टोलेगंज इमारती पाहिल्या की छाती गर्वाने फुगून जाते. आपण त्यांच्याकडे आकर्षित होतोय का असं काहीसं वाटतं. मरीन ड्राइव्हच्या समुद्राकडे पाहिलं तर हेवा वाटतो. लोक त्या किनार्‍यावर येऊन गप्पा मारत बसतात, किती गोष्टींचा साक्षीदार आहे तो! जगातल्या कुठल्याच शहराच्या समुद्रकिनार्‍याच्या नशिबात इतकं सुख नसावं. एकटं जगायला, स्वतर्‍चा विचार करायला शिकवलं या शहराने. लोक वाईट नसतात, माणसाची वेळ वाईट असते याचा पण अनुभव देऊन गेलं हे शहर. वेगवेगळ्या संस्कृती, समाजाचे लोक आहेत या शहरात तरी खर्‍या अर्थाने भारतीय व्हायला शिकवलं या शहरानं. या शहराच्या वेगाला जो सामावून घेऊ शकतो तोच त्या वेगाने पुढे जाऊ शकतो हेही तितकंच खरं आहे. सळसळतं चैतन्य, उत्साह, गती, स्वातंत्र्य, गर्दीमधली शांतता, प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याचं धैर्य देतं आपलंस करून घेतलं आहे मला मुंबईने. प्रत्येकाला एकदा तरी वाटतं यावं इथं अशी ही जादूनगरी आहे. चांगली-वाईट दोन्ही प्रकारची माणसं भेटतील; पण दोन्ही माणसं खूप काही शिकवून गेली इतकं मात्न नक्की. माझ्यातल्या मला शोधायला मुंबईने शिकवलं, माझ्या लिखाणाला वाचा फुटली, माझ्यातला प्रवासी जागा करून दिला, वैचारिकदृष्टय़ा प्रगल्भ बनवलं, सहनशीलता वाढवली, शांत आणि स्टेबल व्हायला मदत केली. अ‍ॅडजस्टमेन्ट म्हणजे नेमकं काय, ते शिकवलं.
मी मुंबईत आयुष्यभर राहीन की नाही माहीत नाही; पण शेवटी इतकं म्हणेन लोक देश सोडून गेलेली पाहिली आहेत, पण मुंबई सोडून गेलेला कोणी पाहिलं नाही. कारण मुंबई हे शहर नाही, त्याहून मोठं काही आहे, जे तुमच्यात भिनतं.

Web Title: Mumbai taught to become an Indian!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.