प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले तरी केवळ अँडमिशन फी भरता येत नाही म्हणून शिकणं सोडून द्यावं लागतं, अशी तक्रार अनेक विद्यार्थी करतात. आता मात्र एज्युकेशन लोन अर्थात शैक्षणिक कर्ज घेऊनही या समस्येतून वाट काढता येऊ शकते. या कर्जात अभ्यासक्र माच्या फीसह अगदी हॉस्टेलच्या फीपर्यंतचा खर्च एज्युकेशन लोनअंतर्गत बँकेकडून घेता येऊ शकतो. दरवर्षी पास होत राहिलं तर बँक पुढच्या शिक्षणासाठीही कर्ज देत राहते. फक्त त्यासाठी अभ्यास करण्याची तयारी आणि कागदपत्रांची बरीच पूर्तताही करावी लागते.
शैक्षणिक कर्ज कसं मिळतं? कधी मिळतं? कुणाला मिळतं?
उच्चशिक्षणासाठी किंवा व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज मिळतं. वाटतं तेवढी त्याची प्रक्रियाही किचकट नाही. मात्र तरीही तुम्हाला एज्युकेशन लोन घ्यायचं असेल तर हाताशी काही माहिती असलेली बरी..
1) प्रत्येक बँकेच्या शाखेत कर्ज पुरवठा विभाग असतो. तेथे शैक्षणिक कर्जाची सर्व माहिती मिळू शकते. त्यामुळे जाऊन थेट बॅँक मॅनेजरला भेटा. हे कर्ज विद्यार्थ्याला मिळत नाही तर पालकांना हमीदार/सहकर्जदार म्हणून जबाबदारी घ्यावी लागते. प्रत्येक बॅँकेची पद्धत वेगळी असते. बँकेचा व्याजदर वेगळा असू शकतो. कर्ज मंजूर करण्याच्या प्रक्रियेतही थोडाफार फरक असू शकतो. काही ठिकाणी ‘तारण’ही ठेवावं लागतं. त्यात घर, जमीन, एलआयसीची पॉलिसी, एखादं पालकांचं फिक्स डिपॉझिटही तारण ठेवता येऊ शकतं. चार लाखांपर्यंतच्या कर्जाला तारण ठेवावं लागत नाही, मात्र तरीही यासंदर्भात बॅँकांचे नियम आणि अभ्यासक्रम यानुसार फरक पडू शकतो.कर्ज कोणाला मिळतं?
* बारावीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकलसह इतर व्यावसायिक शिक्षणासाठी कर्ज मिळतं.
* पदवीनंतर सर्व प्रकारच्या उच्चशिक्षणासाठी कर्ज घेता येतं.
* उच्चशिक्षणानंतर संशोधनासाठी कर्ज मिळतं. कर्ज कुणाच्या नावावर मिळतं?
* पालक किंवा नातेवाइक, भाऊ-बहीण गॅरेंटर (हमीदार) किंवा सहकर्जदार असतात. पालकांना उत्पन्नाची माहिती द्यावी लागते. कर्ज फेडण्याची हमी द्यावी लागते.
कोणत्या बँका कर्ज देतात?
सर्व राष्ट्रीयीकृत, निमसार्वजनिक, काही खासगी तसेच काही नागरी बँका शैक्षणिक कर्ज देतात. मात्न राष्ट्रीयीकृत बँकेतून कर्ज घेतलेलं बरं. त्यासाठी थेट जवळच्या बॅँक मॅनेजरशी संपर्क कर.
आपल्याला हवं तेवढं कर्ज मिळू शकतं का?
* भारतात शिक्षणासाठी साधारणपणो दहा लाखांपर्यत कर्ज मिळतं. अर्थात आता परदेशी शिक्षणसंस्था भारतात सुरू झाल्याने त्याबाबतीत वेगळे निकष असतात.
* भारतात शिक्षण घेण्यासाठी एकूण कर्जाच्या (चार लाखांपेक्षा अधिक कर्ज असेल तर) पाच टक्के रक्कम शिक्षणसंस्थेत भरावी लागते, उर्वरित रकमेचं कर्ज मिळतं.
* परदेशात शिक्षणासाठी कर्ज मिळतं. ते कोर्सप्रमाणे वेगळं असू शकतं.
* चार लाखांवरील कर्जासाठी घर किंवा जमीन तारण ठेवावी लागते. घर/जमिनीचे बँकेकडून मूल्यांकन केलं जातं, त्यानुसार कर्ज मिळतं.
कुठली कागदपत्रं लागतात?
* शैक्षणिक प्रमाणपत्रं .
* जो अभ्यासक्र म करायचा त्यासाठीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं पत्र. (जीआरई/जीमॅट/टोफेल/आयएलईटीएस/सीईटी/कॅट)
* संबंधित अभ्यासक्र माला शासकीय मान्यता हवी. (यूजीसी/एआयसीटीई/आयसीएमआर)
* प्रतिज्ञापत्र.
* महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचं पत्र.
* फीचं संपूर्ण विवरण (सत्ननुसार)(जे महाविद्यालय देतं.)
* प्रवेश फी भरली असल्यास त्याची पावती.
*आधारकार्ड/पॅनकार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र.
प्रतिज्ञापत्र करावंच लागतं का?प्रतिज्ञापत्र अर्थात अँफेडेव्हिट करावं लागतं. त्यात संबंधित शिक्षणासाठी आणखी दुस-या कोणत्याही बँकेचं कर्ज घेतलं नसल्याचं नमूद करून इतरही तपशील त्याला द्यावा लागतो.
कर्जफेड कशी करतात?
* शिक्षण संपल्यानंतर एक वर्ष किंवा नोकरी मिळाल्यानंतर सहा महिने यापैकी जी तारीख आधी असेल, तेव्हापासून कर्जफेड करण्यास सुरुवात करावी लागते.
* पाच वर्षात कर्ज फेडावं लागतं. कर्जफेडीच्या मुदतीत वाढ करून देण्याचा विचार केला जाऊ शकतो.
* शिक्षणाच्या काळात मुद्दल न भरता फक्त व्याज भरण्यास सुरु वात करता येते.
* कर्ज फेडलं नाही तर ते पालक किंवा हमीदार यांच्याकडून वसूल होतं आणि त्यामुळे डिफॉल्टर म्हणून खटलाही बॅँक दाखल करू शकते.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पढो इंडिया !
भारत सरकारच्या ‘पढो इंडिया’ योजनेद्वारे अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे परदेशात शिक्षण घेण्यासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत त्याची माहिती मिळू शकते.------------------------------------------------------------
विद्यालक्ष्मी पोर्टल
https://www.vidyalakshmi.co.in/Students/
या पोर्टलशी संपर्क केल्यास शैक्षणिक कर्ज मिळण्याची प्रक्रिया नेहमीपेक्षा अधिक जलद आणि सुलभ होऊ शकते. केंद्र सरकारचा उपक्रम असलेला हा प्रकल्प आहे. एनएसडीएल आणि इ-गव्हर्नंन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे पोर्टल चालविण्यात येतं. हे एक विद्यार्थी पोर्टल आहे. यात 13 बॅँक विविध प्रकारचे 22 कर्ज देतात. त्यात काही कर्ज योजनांसह स्कॉलरशिपचेही पर्याय आहेत. 10 मंत्रालय आणि केंद्र सरकारचे विभागही त्याच्याशी जोडलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे पर्यायही उपलब्ध आहेत.
या पोर्टलवर काय आहे?1. या पोर्टलवर विद्यार्थ्याला स्वत:ला रजिस्टर करावं लागतं. त्यातून त्यांना एक आयडी, पासवर्ड मिळतो.
2. एज्युकेशन लोनचा फॉर्म मिळतो. त्यासोबत ओळखपत्र, मातापितांचे आयटी रिटर्न आणि मार्कशिट, कुठं प्रवेश घेतला हेही सादर करावं लागतं.
3. एकाचवेळी अनेक बॅँकांना विद्यार्थ्याचं कर्ज प्रस्ताव पाठवला जातो. त्यातून मुलांचे कर्ज मिळण्याचे पर्याय वाढतात.
4. विशेष म्हणजे नो युवर कॉलेज या सुविधेंतर्गत आपलं कॉलेज खरोखरच मान्यताप्राप्त आहे, फी योग्य घेत आहे, अभ्यासक्रमाला मान्यता आहे की नाही हे ही कळतं.
5. कर्ज मंजूर झाल्याची किंवा न झाल्याची माहितीही याच पोर्टलद्वारे प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विशिष्ट मुदतीत मिळते.
6. अधिक माहितीसाठी - https://www.vidyalakshmi.co.in/Students