आता दिसतं केवळ पदक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 07:07 PM2021-03-10T19:07:28+5:302021-03-10T19:17:40+5:30
रिंकी धन्या पावरा आणि पल्लवी चंद्रकांत जगदाळे. आदिवासी, ग्रामीण भागातील या मुली. पण धावण्याची जिद्द. त्यासाठी घर सोडलं, गाव सोडलं, नाशिकला आल्या. राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत नाव कमावलं. गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत दोघींनीही सुवर्ण आणि कांस्य पदक मिळवलं. त्यांच्या जिद्दीची ही कहाणी..
- माधुरी पेठकर
मी नंदूरबारच्या खर्डी या आदिवासी गावातून दोन वर्षांपूर्वी नाशिकला आले ते मॅरेथॉनचं शास्रशुध्द ट्रेनिंग घेण्यासाठी. शूज घालून कसं पळतात ते मी इथे नाशिकला आल्यावर पहिल्यांदा अनुभवलं. रोज दगड मातीतून पळायची सवय होती.
आम्हा सात भावंडांमधली मी पाचवी. घरची शेती. तीही पावसावरची. उन्हाळ्यात आईबाबांना मजुरीसाठी गावाच्या बाहेर पडावंच लागतं. आम्हीपण त्यांच्यासोबत जायचो .पण गेल्या दोन वर्षांपासून आईवडील मजुरीला बाहेर पडत असले तरी आम्ही मात्र गावातच असतो. आर्थिक परिस्थिती खराब असल्यानं इतर काही गोष्टींचा विचार करताच येत नव्हता. तरीही मला पळण्याचं वेड लागलं. याला कारण माझा मोठा भाऊ. तो स्पर्धेत भाग घ्यायचा. आता या खेळामुळेच त्याला वनरक्षकाची नोकरी लागली. भावामुळे मलाही स्पर्धेत भाग घ्यावासा वाटू लागला. २०१७ मधे शालेय स्पर्धेत भाग घेतला. दुसरी आले. पण मला फक्त प्रमाणपत्र मिळालं आणि जी चौथी आली तिला मात्र मेडल मिळालं. मला त्या गोष्टीचं फार वाईट वाटलं. तेव्हा मी ठरवलं की यांना दाखवूनच द्यायचं. मी पळण्याचं मनावर घेतलं. पायात बूट नसले तरी मी मन लावून पळायचे. मनात एकच होतं आपल्याला मेडल मिळवायचं.
२०१८मधे आमच्या गावापासून नऊ कि.मी अंतरावर असलेल्या मुखबारी गावात एक धावण्याची स्पर्धा होती. सहा किलोमीटर. त्या स्पर्धेत मी पहिली आले . कविता राऊत बक्षीस वितरणासाठी आल्या होत्या. त्या म्हणाल्या, रिंकी मनापासून केलं तर काहीही शक्य होऊ शकतं.’ हे ऐकून माझ्या मनातली मेडलची इच्छा आणखीनच पक्की झाली. त्यानंतर आणखी एका स्थानिक पातळीवरच्या मॅरेथॉनमधे भाग घेतला होता. दहा कि.मी धावण्याच्या या स्पर्धेतही मी पहिली आले. या विजयाने माझं सिंगापूरच्या मॅरेथॉनसाठी सिलेक्शन झालं, पण पासपोर्ट नव्हता. मला जाता आलं नाही. त्याचवेळी शाळेतल्या पावरा सरांनी मला नाशिकला विजेंद्रसिंग सरांकडे आणलं. सरांनी ट्रायल घेतली. मी चांगलं टायमिंग दिलं. तेव्हापासून नाशिकमधेच मॅरेथॉनचा सराव करतेय.
नाशिकला आल्यावर स्पर्धेसाठी खेळणं म्हणजे काय हे समजायला लागलं. आधी फक्त आवड होती या आवडीला इथे सरावाची जोड मिळाली. पहाटे ४.३० ला उठून ५ वाजता सरावासाठी ग्राऊंण्डवर जावं लागतं. पुढे साडेतीन तास वर्कआऊट आणि सराव. परत दुपारी ४ ते ७ वर्कआऊट आणि सराव. मधला वेळ काम, अभ्यास आणि आरामासाठी. इथे आल्यावर चांगलं खायला मिळायला लागलं. फळं मिळायला लागली. त्यामुळे पळण्याचा स्टॅमिनाही वाढला. इथे आल्यापासून मी पाच स्टेट आणि चार नॅशनल मॅरेथॉनमधे भाग घेतला. आता नुकतीच गुवाहाटी येथे झालेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमधे ३००० मीटरच्या स्पर्धेत ९ मिनिटं ५५ सेकंदचा टायमिंग घेत मी पहिली आले. मेडल मिळवलं. आता इंटरनॅशनलमधे पळायचं आहे. नोव्हेंबरमधे केनियाला होणाऱ्या स्पर्धेच्या सिलेक्शनसाठी ट्रायल होणार आहे. त्या ट्रायलचं दडपण येतं. पण गावाकडे जिंकूनही न मिळालेल्या मेडलनं मला आता खूप हिंंमत आली आहे.
मी स्पर्धा जिंकली की तिकडे आईबाबांनाही खूप आनंद होतो. पूर्वी गावातले लोकं म्हणायचे की मुलगी म्हणजे चूल आणि मूल. पण आता मी करुन दाखवलं. त्यामुळे गावची माणसंही माझ्यावर खूप खूश आहेत. ‘पुढे जाण्यासाठी जे कष्ट करावे लागतात ते तू कर. गावाचा विचार करु नकोस’ असं म्हणत आता गावही मला हिंमत देत आहे.
तीन वर्षापूर्वीची गावतील मी आणि आताची मी याकडे बघते तेव्हा मला माझं आयुष्य खूप बदलल्यासारखं वाटतं. दु:खानंतर, वेदनेनंतचं सुख काय असतं ते मी अनुभवते आहे. मला पहिल्यापासूनच काहीतरी वेगळं करायचं होतं. त्याला आता दिशा मिळाली आहे. मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर आता फक्त मेडलच दिसतात.
- रिंकी धन्या पावरा, खर्डी, नंदूरबार.
----------------------------------------------------------
आता लक्ष्य इंटरनॅशनल!
पंढरपुरातील अढी गावात आमचं घर. घरची शेती. पण वडिलांचा कायम आम्हा मुलांना पाठिंबा. माझी दीदी कोमल जगदाळे. ती आता आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावते. गावात ती पळायची. शाळेतल्या स्पर्धेत भाग घ्यायची, जिंकायची. माझे वडील म्हणायचे तूही दीदीसोबत पळ. मग मीही दीदीसोबत पळत जायचे ग्राऊंडडवर. दीदीचे कोच एकदा मला म्हणाले, ‘तू चांगली धावते, तूही सरावाला येत जा!’ मग मी पळण्याचा सराव करु लागले.
सातवीत असल्यापासूनच मी स्टेट आणि नॅशनल स्पर्धेत धावू लागले. आठवीपासून मला मेडल मिळायला सुरुवात झाली. पण पंढरपुरातील ग्राऊंड छोटं होतं. शिवाय तिथल्या सरावाला टायमिंग नव्ह्तं आणि शिस्तही नव्हती. दीदी नाशिकला होती. विजेंद्रसिंग सरांनी माझं पळणं बघितलं होतं. सरांनी मला नाशिकला बोलवून घेतलं. मी दहावीला होते तेव्हाच नाशिकला आले. इकडच्याच शाळेत अॅडमिशन घेतली. तेव्हापासून आतापर्यंत दिल्ली, गुजरात, भोपाळ, आसाम, रांची, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथे झालेल्या नॅशनल मॅरेथॉनमधे धावले. गुवाहाटीतल्या स्पर्धेत रिंकी पहिली तर मी दहा मिनिटं १५ सेकंदाचा टायमिंग देत तिसरी आली.
नोव्हेंबरमधे इंटरनॅशनसाठीची ट्रायल होणार आहे. दीदीसारखं मलाही इंटरनॅशनलमधे पळायचं आहे.
धावण्यासोबतच मी अभ्यासाकडेही तेवढंच लक्ष देते. खेळण्यामुळे नोकरी मिळते पण ती नोकरी करायला नॉलेज लागतं. त्यासाठी मला शिक्षणही महत्त्वाचं वाटतं.
पल्लवी चंद्रकांत जगदाळे, आढी, पंढरपूर