ओटीटी प्लॅटफॉर्म हा मिनरल वॉटर बॉटलसारखा झालाय, सुरुवातीला जेव्हा काही एकदोन कंपन्यांनी बॉटलबंद पाणी विकायला सुरुवात केली तेव्हा हा समज होता की, ज्या देशात जलदान पुण्यकर्म समजलं जातं तिथे विकतचं पाणी कोण विकत घेईल? आणि आता पहा. पाणी सर्रास विकत घेतो आपण. ओटीटी प्लॅटफॉर्मने २०१६-२०१७ पासून भारतात मुळं रोवायला सुरुवात केली, तेव्हा समज होता की टीव्हीवर मोफतमध्ये सिरीअल व सिनेमे बघणारी व मोबाइलवर इंटरनेटच्या साहाय्याने मोफतमध्ये फेसबुक, व्हॉट्सॲप, यू-ट्यूब, इन्स्टाग्रामवर पडीक असणारी जनता दरमहा पैसे खर्च करून मनोरंजन कशाला विकत घेईल?
पण ‘ओव्हर द टॉप’ - ओटीटीने तेही करून दाखवलं. आता हा टप्पा पुढे कुठे जाऊ शकतो?
१. २०१८ मध्ये आलेल्या सेक्रेड गेम्स वेब सिरीजनंतर ओटीटी माध्यमाने भारतात बाळसं धरायला सुरुवात केली. याच काळात मिर्झापूर वेब सिरीज आल्यावर तुफान लोकप्रियता मिळाल्याने भारतात ओटीटीला अधिक पसंती मिळू लागली. त्याआधी टीव्हीएफ या आयआयटी इंजिनिअर मित्रांनी येऊन स्थापित केलेल्या कंपनीद्वारे ओटीटी माध्यमावर ते सर्वोत्तम व कालानुरूप स्मार्ट कंटेंट लोकांना उपलब्ध करून देत होतेच. पण त्यांचा कंटेंट ‘रिच’ असून, लोकांपर्यंत त्याचा ‘रिच’ कमी होता. सेक्रेड गेम्सनंतर नेटफ्लिक्सचा भारतात व्यवसाय आणखी जोरात वाढला. त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट बघण्याचा सपाटा सुरू झाला.
कोरोनाकाळात पासवर्ड शेअर करकरून तरुण पोरांनी नेटफ्लिक्स, अमेझॉनवर ऑनलाइन बिंज पार्ट्या केल्या.
२. २०२०. जवळपास वर्षभर सिनेमागृहे बंद असल्याने मोठ्या प्रॉडक्शन हाउसचे सिनेमे ओटीटीच्या व्यासपीठावर प्रदर्शित झाले. ओटीटीची ताकद आणि उपलब्धता यावर्षी वाढली. २०१९ मध्ये भारतात जवळपास १९ कोटी ओटीटी वापरकर्ते होते, गेल्या वर्षभरात ते चौपट वाढले आहेत. लॉकडाऊनच्या काळात ओटीटी माध्यमांचा उपयोग जास्त झाला आहे. वर्क फ्रॉम होमसोबत एंटरटेनमेंट फ्रॉम होम ही संकल्पना ओटीटीमुळे आता रुजू होतेय.
३. ओटीटी माध्यमांवर सिनेमे प्रदर्शित केले जात आहेत, बघितले जात आहेत. यामुळे खचितच ओटीटीवरील कंटेंटचे वेगळेपण आता हरपायला लागले आहे किंबहुना आता कंटेंटमध्ये भेसळ व्हायला लागली आहे. ओटीटीवर आता फक्त क्लासिक वेब सिरीज, सिनेमे नसून सोबत मसाला चित्रपटदेखील आहेत.
बदललेल्या माध्यमांचा २०२० हा पूर्वार्ध होता. २०२१ हा उत्तरार्ध असणार आहे. आता तरुण मुलांना आपल्या स्मार्ट फोनवर किंवा टॅबवर आपल्या आपण हवं ते पाहण्याची चटक लागली आहे. नव्या वर्षात ओटीटी हेच तरुण मनोरंजनाचं साधन होणार हे उघड आहे.