रस्त्यावरची ट्रॅफिक कंट्रोल करणारी पॅरिसमधली एअर टॅक्सी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 05:06 PM2019-07-18T17:06:24+5:302019-07-18T17:06:45+5:30
रस्त्यावर ट्राफिक जाम होतंय, म्हणून आता पॅरिसमध्ये थेड उडायचाच पर्याय समोर येतोय!
- प्रसाद ताम्हणकर
पॅरिसमध्ये 2024 साली होणा-या ऑलिम्पिकसाठी येणा-या परदेशी स्पर्धकांना आणि दर्शकांना एअर टॅक्सीने प्रवासाचा अनोखा अनुभव मिळणार आहे. पॅरिस सरकार, एअरबस कंपनी आणि एअरपोर्ट्स दे पॅरिस हे संयुक्तपणे या एअरबॉर्न टॅक्सीच्या प्रोजेक्टवरती काम करत आहेत.
गेल्या आठवड्यात पॅरिस येथे झालेल्या ‘पॅरिस एअर शो’चे निमित्त साधून या एअरबॉर्न एअर टॅक्सीची संकल्पना माध्यमांसमोर ठेवण्यात आली. ऑलिम्पिकसारखा जागतिक सोहळा हे अशाप्रकारच्या भविष्यातील गाड्यांना व्हर्टिकल टेक ऑफ आणि लॅण्डिंग बनविण्याची सुसंधी असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पुढील काळात वाहतुकीचा ताण आणि येणा-या समस्या यांचा विचार करून एअरबॉर्न टॅक्सीसारख्या भविष्यातील तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात येणार आहे. 18 महिन्यांत या जागेची बांधणी करण्याचे आणि पायाभूत सुविधा उभ्या करण्याचं उद्दिष्टं असून, त्यासाठी 10 मिलियन युरो एवढा प्रचंड खर्च अपेक्षित आहे.
प्रत्येक सहा मिनिटाला एक टॅक्सी उड्डाण करू शकेल अशा क्षमतेच्या या सुविधा असणार आहेत. या जोडीलाच सध्याच्या हेलिकॉप्टर कॅरिडोरचीदेखील चाचणी केली जाणार आहे. या एअरबॉर्न टॅक्सीच्या उत्पादनावरती काम करत असलेल्या उत्पादकांकडे या आधीच दोन प्रकारची प्रोटोटाइप मॉडेल्स तयार आहेत. सिंगल सीटर वहाना आणि चारसीटर ’सिटी एअर बस’ अशी त्यांची नावे आहेत.
हा प्रकल्प फक्त सार्वजनिक वाहतुकीवरचा तोडगा नसून, प्रदूषणमुक्ती आणि हवाई वाहतुकीला एक वेगळी दिशा देणारा प्रकल्पदेखील असणार आहे. अर्थात, या एअरबॉर्न टॅक्सीच्या बॅटरीची र्मयादा, दोन हवाई टॅक्सीची हवेत टक्कर टाळण्यासाठी बनवावी लागणारी यंत्नणा अशा काही प्रमुख अडचणींवरती देखील उत्पादकांना मात करावी लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, नागरिक या सेवेला कितपत आपलेसे करतात आणि प्रतिसाद देतात हे पाहावे लागणार आहे. तसेच ही सेवा सुरू होण्याआधी हवाई वाहतुकीच्या नियमांचा पुन्हा एकदा आढावा घेऊन, काही काटेकोर नियम पुन्हा आखावे लागणार आहेत, तसेच हवाई वाहतुकीची पूर्ण रूपरेषाच नव्याने ठरवावी लागणार आहे.
(लेखक तंत्रज्ञानविषय लेखन करणारे पत्रकार आहेत.)
prasad.tamhankar@gmail.com