- डॉ. यशपाल गोगटे
वयात येतानाचा काळ. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये लैंगिक बदल घडवणारा हा काळ. निसर्ग नियमाप्रमाणे बालवयात सावकाश होणार्या बदलाला या अवस्थेत एकदम बुलेट ट्रेनप्रमाणे गती मिळते. उंची व लैंगिक बदलाबरोबर मानसिक व आकलनविषयक बदल या काळात घडत असतात. साधारणतर् मुलींमध्ये बाराव्या वर्षी आणि मुलांमध्ये तेराव्या वर्षी हे अपेक्षित परिवर्तन घडत असतं. या वयातील मुलांना अॅडोलेसन्ट अथवा टीन एजर्स असंही म्हणतात. या बदलाकरता जबाबदार असलेले हार्मोन्स म्हणजे सेक्स हार्मोन्स. मानवी शरीरात तीन मुख्य सेक्स हार्मोन्स असतात - टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. हे हार्मोन्स पुरुषामध्ये वृषणात आणि स्त्रियांमध्ये बीजकोषात तयार होतात. पिटय़ुटरीमधील एफएसएच, एलएच व प्रोलॅक्टिन हार्मोन्स हे वृषण व बीजकोषातील हार्मोन्सवर नियंत्नण ठेवतात.शरीरामध्ये इतर संस्था जसे पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण आदी जन्मतर् सक्रिय होतात. परंतु जननसंस्थेचे (रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम) चक्र वेगळंच असतं. मुलींमध्ये आईच्या पोटात असताना कार्यरत असणारी ही संस्था जन्म झाल्यावर सुप्तावस्थेत जाते. मुलांमध्ये मात्न जननसंस्था जन्मानंतर सक्रिय होते व जवळ जवळ सहा महिन्यांर्पयत सक्रिय असते व त्यानंतर ती सुप्तावस्थेत जाते. याला मिनी पौगंडावस्था (मिनी प्युबरटी) असे म्हणतात. पुढे जाऊन एका विशिष्ट वयाला ही पुन्हा कार्यरत होते. हे बदल नक्की एका विशिष्ट वयातच का सुरू होतात याची कारणं अजून पूर्णपणे उलगडलेली नाही. शरीरशास्त्नाप्रमाणं बहुतेककरून योग्य वजन झाल्यावर हे बदल होण्यास सुरुवात होते. वजन वाढल्यामुळे चरबीतून एक संबंधित हार्मोन- लेप्टीन मेंदूतील हायपोथॅलॅमस या भागाला उत्तेजित करतो व पौगंडावस्थेला गती मिळते. हे काही प्रमाणात प्रत्येकात असणार्या जनुकांनी थोडंफार इकडे-तिकडे होऊ शकतं. हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुला-मुलींमध्ये चरबीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे ठरावीक टार्गेट वजन ही मुलं-मुली वयाआधीच प्राप्त करतात. बहुतेककरून लवकर वयात येण्याचं हे एक मुख्य कारण समोर आलं आहे. पौगंडावस्थेत होणारे हे बदल एका विशिष्ट वयोमर्यादेनुसार होत असतात. मुलींमध्ये स्तनांची, बीजकोषाची व गर्भाशयाची वाढ व विकास व मुलांमध्ये इंद्रियांची वाढ व विकास होत असतात. मिसरूड फुटणं, आवाज घोगरा होणं, शरीरावर केसांची वाढ होणं, घामाला विशिष्ट वास येणं हेदेखील सेक्स हार्मोन्समुळेच होत असतं. भावी काळात माता-पित्याची जबाबदारी घेण्यासाठीची ही पूर्वतयारी असते.पौगंडावस्थेत काही विशिष्ट आजार होत असतात. मुला-मुलींमध्ये आढळणारा आणि पौगंडावस्थेशी निगडित असा खास आजार म्हणजे तारुण्यपीटिका किंवा पिम्पल्स. हे बरेचवेळा आपोआपच बरे होत असतात. काहीवेळेस मात्न या आजाराकरता डॉक्टरी सल्ला व औषधं लागू शकतात. चष्मा लागणं, पाठीला कुबड येणं हे सुद्धा या वयात दिसणारे सामान्य आजार आहेत. पौगंडावस्थेत मुलींमध्ये अॅनिमिया म्हणजेच रक्त कमी होण्याची खूप जास्त शक्यता असते. अन्नातून योग्य प्रमाणात लोह न मिळाल्यास मुलींना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे खाण्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, उसळी- डाळी, धान्य वर्गातील घटक, मांस व काजू याचं योग्य प्रमाण असावं. पौगंडावस्थेत अनेक मानसिक बदलदेखील घडत असतात. त्यामुळे नैराश्य, चीड चीड करणं, टेन्शन येणं यासारखे मानसिक आजारदेखील या वयात जास्त आढळतात. आई-वडिलांनी आपल्या मुलांशी खुला, मोकळा केलेला संवाद अशावेळेस मदतीचा ठरतो. काहीवेळेस मात्न काउन्सलर अथवा मानसिकरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. पौगंडावस्थाचा काळ हा लहानपण व तारुण्य यातील संधीकालच होय. या अवस्थेत मुला-मुलींमध्ये शारीरिक आणि मानसिक असे आमूलाग्र बदल होत असतात. त्यामुळे या बदलांना घाबरू नका, फक्त आवश्यक तिथं मदत मागा, मोकळेपणानं बोला.
...हा आजार का होतो?
मुलांमध्ये आढळणारा पौगंडावस्थेतील एक आजार म्हणजे गायनेकोमास्टिया. या विकारात मुलांमध्ये स्त्नीसारखा छातीचा विकास होत असतो. पौगंडावस्थेत सुरुवातीच्या काळात स्त्रियांचे हार्मोन्स इस्ट्रोजेन याचे अधिक प्रभुत्व असल्यानं हा होतो. हा आजार नसून एक नैसर्गिक बदल आहे. बरेचवेळा वाढत्या वयाबरोबर हा आपोआपच बरा होतो. मात्न काही मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात असल्यास त्यावर औषधोपचार अथवा सर्जरी करता येऊ शकते. या बदलाचा तृतीय पंथी असण्याशी काही एक संबंध नाही. हल्ली जिममध्ये बॉडी बिल्डिंग करता काही हार्मोन्सच्या इंजेक्शन्सचा वापर होतो त्यामुळेदेखील गायनेकोमास्टिया होऊ शकतो.