हॉलिवूडची प्रियंका , कोल्हापूरची पल्लवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 07:29 PM2021-03-10T19:29:02+5:302021-03-10T19:35:02+5:30
पेट्रोलियम टेक्नॉलॉजीची मास्टर डिग्री घेतलेलीकोल्हापूरची पल्लवी यादव मोटरस्पोर्ट्समध्येही देशपातळीवर नाव कमावते आहे.
- संदीप आडनाईक
कोल्हापूर म्हणजे रांगडेपणा. हाच रांगडेपणा तिच्याही रक्तात आहे. लहानपणापासूनच घरातील सर्र्वाना गाड्यांची प्रचंड आवड. भावंडांमध्ये मुलगी केवळ एकच असल्यामुळे तिची जडणघडणही मुलांप्रमाणेच झाली. त्यामुळे महिला म्हणून नव्हे तर साहसाची आवड म्हणून गाड्या चालविण्यासाठी चढाओढ असायची.
पेट्रोलियम टेक्नॉलॉजीची मास्टर डिग्री घेतलेल्या कोल्हापूरच्या पल्लवी यादव हिने दहा वर्षे पेट्रोलियम फिल्ड इंजिनिअर म्हणून काम केले. भारत, दुबई, अमेरिका आणि कतार या देशांत इंजिनिअर म्हणून प्रत्यक्ष फिल्डवर अनुभव घेतलेली ती एकमेव महिला आहे. ज्या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी होती, त्या क्षेत्रात तिने तेलविहिरीत काम केले, तेही परदेशात आणि एकटीने. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या रेसिंगमध्येही उतरण्याचेही धाडस तिने केले. अभ्यासात नेहमीच हुषार असणाऱ्या पल्लवीने पेट्रोलियम इंजिनिअर म्हणून जाणीवपूर्वक नोकरी केली आहे. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे पल्लवीला हवे ते मिळत गेले. पण तरीही ती जमिनीवर राहिली. वयाच्या तेराव्या वर्षी तिला गाड्यांची आवड निर्माण झाली. वडीलांनी तिच्यातला स्वाभिमान जोपासला. गाड्या चालवायला शिक, पण त्याआधी त्या दुरुस्त कशा करायच्या हेही शिकून घे असे त्यांनी बजावल्यामुळे लहानपणापासूनच गाड्यांचे मेकॅनिझम तिने समजून घेतले. पंक्चर काढणे, स्पार्कप्लग, क्लच याबरोबरच गाडी संपूर्ण खोलून पुन्हा जोडण्याचे तंत्र तिने शिकून घेतले, ज्याचा फायदा तिला झाला.
कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी मूळात स्वत:ला आवड असावी लागते. शिवाय आपल्यात काही वेगळे करण्याची क्षमता आहे, हे त्या क्षेत्रात काम केल्याशिवाय समजत नाही. त्यामुळे स्वत:वर बंधने लादून न घेता आत्मशक्तीच्या जोरावर काम केले पाहिजे. आयुष्य थोडे आहे आणि अनेक क्षेत्रात आपल्याला काम करण्याची तयारी पाहिजे, असे पल्लवी म्हणते. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता असे वेगळे न मानता प्रत्येक क्षेत्रातील अनुभव प्रत्येकानंच घेतला पाहिजे. ज्या ज्या वेळी मी प्रवासाला गेले, त्या त्या वेळी प्रत्येक पुरुषांनी ओळख नसूनही खूपच मदत केली. अनेकदा ढाब्यांवर त्यांच्या भरवशावर मुक्काम केला. या चांगुलपणावर विश्वास ठेवला पाहिजे. विशेषत: मुलींना हा संदेश द्यायला पाहिजे. पालकांनीहीं आपल्या मुलींवर विश्वास ठेवावा, असे ती सांगते. फेब्रुवारीत तिने हम्पी येथील राष्ट्रीय पातळीवरील मोटारस्पोर्टस शर्यतीत सहभाग नोंदवला होता. डिसेंबर २0२0 मध्ये ओवायए संस्थेच्या गुम्बल इंडिया एन्डुरन्स ड्राईव्हसाठी कन्याकुमारी ते आग्रा असा ३000 किलोमीटरचा सलग, विनाथांबा ६0 तासांचा मार्ग पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे यात दोन्ही पायांनी अपंग असलेल्या दिव्यांग व्यक्तीची ती सहचालक होती.
कौशल्य आणि स्टॅमिना याच्या जोरावर पल्लवीने अनेक गाजलेल्या मोटारशर्यती जिंकल्या आणि आज ती मोटरस्पोर्टसमधील टॉपची महिला आहे. पंजाब, चंदीगड, जयपूर, भोपाळ अशा सर्व ठिकाणी झालेल्या विविध क्लबस्पोर्ट स्पर्धेत तिने एकटीने भाग घेतला आहे. तिच्या या योगदानाबद्दल चंदीगडचे कॅबिनेट मंत्री बलबीर सिंग सिध्दू, यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये सन्मानित केले होते, तर कालच्या८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पल्लवीला केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांच्याहस्ते नवी दिल्लीत सन्मानित करण्यात आले. हॉलिवूडमधील चित्रपटातील स्टंटसाठी ऑक्टोंबर २0१९ मध्ये तिच्याकडे विचारणा झाली, तेव्हाही तिने एक वेगळा प्रयोग म्हणून याकडे पाहिले. विशेष म्हणजे तिला चित्रपटाची फारशी आवड नाही. तिचे कार रेसिंगमधील प्रशिक्षकांच्या आग्रहामुळे तिने द व्हाईट टायगर या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी प्रियंका चोप्राची डमी म्हणून काम केले. दिल्लीतील प्रचंड थंडीत वेगवेगळ्या तापमानात तिने जवळपास अडीच आठवडे इंडियन स्टंट दिग्दर्शक सुनील राँड्रींग्ज याच्यासोबत काम केले. एका स्टेडियमवर मित्सुबिशीच्या पजेरो गाडीवर हे ड्रायव्हिंग दृश्याचे स्टंट पल्लवीने केले.
आजही पल्लवी स्वत: ड्रायव्हिंग करत राजस्थान आणि गुजरातच्या वाटेवर आहे. गाडी हेच तिचे आता घर झाले आहे. गाडीचे स्टेअरिंग हाती आले की तिला वेळेचेही भान रहात नाही. रात्रभर ती प्रवास करते. तिच्या या प्रवासात तिच्या गाडीचेही मोठे योगदान आहे. २00८ मध्ये तिने ही गाडी घेतली, ती आजही सोबत आहे. ४ फेब्रुवारीला मुंबईत तिने तिच्या जीटा असे आफ्रिकन नामकरण केलेल्या सुझूकी एस एक्स फोर या गाडीचा केक कापून वाढदिवस साजरा केला. १३ वर्षे तिच्यासोबत ही गाडी आहे आणि आतापर्यंत कधीही तिने दगा दिलेला नाही. तिच्या या प्रवासात तिच्या प्रशिक्षकाचा मोलाचा वाटा असल्याचे ती सांगते. सुरक्षिततेसाठी नियमानुसार विमा काढला असला तरी रोडवरील ड्रायव्हिंगपेक्षा शर्यतीत वेगाने गाडी चालवणे जास्त सुरक्षित आहे, असे तिचे म्हणणे आहे. तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता तुम्हाला जास्त यश मिळवून देते असा अनुभव आहे. यात घरच्यांचाही पाठिंबा मिळणे गरजेचे आहे, असे मत तिने मांडले.
(उपमुख्य उपसंपादक, लोकमत, कोल्हापूर)