कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातलं कोरज हे डोंगरकपारीतील एक छोटंसं गाव. तिथला हा समृद्ध राजाराम कांबळे. या छोटुशा गावातला हा मुलगा थेट शास्त्रीय गायनाकडे वळला तो केवळ त्याच्या शिक्षिका असलेल्या आईमुळे. आजोबा निवृत्त मुख्याध्यापक. ते सांस्कृतिक कार्यक्रमात हार्मोनियमवादन करायचे. घरातच असं गायनवादन असल्यानं समृद्ध लहान वयातच गाऊ लागला.
तीन वर्षाचा असताना 15 ऑगस्ट 2005 रोजी त्यानं कोवाडच्या कला महाविद्यालयाच्या कार्यक्रमात ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत पहिल्यांदा व्यासपीठावर जाऊन गायलं. तिथूनच त्याच्या गायनाचा प्रवास सुरू झाला. गडहिंग्लज येथील स्वरसाधना संगीत महाविद्यालयात त्याचं आता शिक्षण सुरू आहे. डॉ. सदानंद पाटणो आणि प्राचार्य मच्छिंद्र बुवा यांच्याकडे तो गुरुकुल पद्धतीने शास्त्रीय गायनाचा रियाज करीत आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथे सध्या तो कुटुंबासह राहतो. जवळच्याच महागाव येथील जयभारत इंग्लिश स्कूलमध्ये सातवीत शिकतो. आठवडय़ातून तीन दिवस शाळा सुटल्यानंतर 25 किलोमीटर प्रवास करून स्वरसाधना महाविद्यालयात संगीत शिक्षणासाठी जातो. सोबतीला वडील प्रा. राजाराम कांबळेही असतात.
आजवर त्यानं अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत, अनेक बक्षिसं जिंकली आहेत. दूरचित्रवाणीवरील ‘गौरव महाराष्ट्राचा 2क्12’ कार्यक्रमात ‘मूर्ती लहान, कीर्ती महान’ कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून 14 कलाकारांत अंतिम चाचणीत निवड, नागपूरसाठी कोल्हापुरात झालेल्या ‘आवाज भीमाचा’ कार्यक्रमासाठी 5क्क् स्पर्धकांतून निवड, तसेच स्टार बॅटल, सारेगमपच्या ऑडिशनमध्येही सहभागी झाला. दुबईतील आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात त्यानं सहभाग नोंदवला आहे. सेंटर फॉर कल्चरल रिसोर्स अँड ट्रेनिंग न्यू दिल्ली (सीसीआरटी) या केंद्र सरकारच्या संस्थेने टॅलण्ट स्कॉलरशिपसाठी निवड करून त्याची एकप्रकारे दखल घेतली आहे.
शास्त्रीय गायनात स्वत:ला झोकून देणा:या समृद्धला पायपेटी, तबला, व्हायोलियन, गिटार, हार्मोनियम आदि वाद्यांमध्ये तितकीच आवड आहे. फावल्या वेळेत इंटरनेटवर संगीत कलेतील अत्याधुनिक माहितीच्या शोधात तो असतो. इतक्या लहान वयात त्याच्या गाण्यानं मिळवलेलं हे यश कौतुकास्पद आहे.
- भरत बुटाले
(लेखक कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)