मासे पाण्यात उत्तम पोहतात
पण हत्तींना पोहता येत नाही,
म्हणून माशांच्या तुलनेत हत्ती
मठ्ठ ठरतात का?
***
गरुडाला उडता येतं
पण माशाला उडता येत नाही,
पाण्याबाहेर माशाच्या ‘पोहण्याचं’
काही कौतुकच नाही,
म्हणून मग गुणवत्तेच्या स्पर्धेत
गरुड सरस ठरतात का?
***
सिंहाला शिकार करता येते मात्र
त्याला हत्तीसारखं अजस्त्र ओंडके वाहण्याचं
काम करता येत नाही,
बैलासारखं औताला जुंपता येत नाही,
गायीसारखं दूध देणं जमत नाही,
म्हणून मग स्पर्धेच्या जगात सिंहाचा
काही उपयोगच नाही का?
**
आणि फुलपाखरं, मैना, पोपट, बुलबुल
यांसारख्या सुंदर दिसणा:या,
गाणा:या पक्ष्यांचं काय?
की त्यांचा कामाला उपयोग नाही,
म्हणून त्यांची काही किंमतच नाही?
***
सगळ्या प्राण्यांना एकाच परीक्षेत बसवून त्यांना
‘पास’ आणि ‘नापास’
‘गुणवान’ आणि ‘ना-लायक’ ठरवणं जसं चूक,
तसंच सगळ्याच मुलांना गुणांच्या तागडय़ात तोलणं
आणि ज्यांना कमी मार्क मिळाले,
त्यांच्या बाकीच्या गुणांवर कंडम म्हणून
फुल्या मारणं कितपत योग्य आहे?
***
नसतील मिळाले दहावीत जास्त मार्क,
भूमितीतला पायथागोरस, इतिहासातल्या सनावळ्या,
भूगोलातली ग्रहणं आणि
गणितातले एक्स-वाय नसतील टाळक्यात शिरत;
पण चित्रकला आवडते, पीटी आवडते,
हस्तकौशल्य चांगलंय, भाषा आवडतात,
गाता येतं, नाचता येतं, बोलता येतं,
पळता येतं सुसाट. पोहता येतं.
या सा:याला गुणांच्या स्पर्धेत काहीच किंमत नाही?
***
आजकाल तर मुलांना शंभरपैकी एकशे दहा टक्के
वगैरे मरक पडतात म्हणो !
नव्वद टक्के तर कमीतकमी.
कटऑफच जिथे पंचाण्णवच्या पुढे असतो
तीच म्हणो भारी कॉलेजेस आणि
त्यात ज्यांना प्रवेश मिळतो, तेच खरे गुणवान !
***
या गुणवानांच्या गर्दीत पन्नास-पंचावन्न टक्केवाले
बिचारे दिसतही नाहीत,
- पण असतात ना ते !!
कुठे असतात? काय चालतं त्यांच्या जगात?
आणि काय होतं त्यांच्या करिअरचं?
ज्यांना पोहता येत नाही असे गरुड,
उडता येत नाही असे मासे..
ेटक्केवारीच्या शर्यतीत मागे पडले, तरी
आयुष्याच्या स्पर्धेत हरत नाहीत ते !
त्यांच्या सिक्रेट जगात काय चालतं,
याच्या बातम्या कोण छापणार?
पण म्हणून ते सिक्रेट जग इंटरेस्टिंग नसतं,
असं थोडंच आहे?
**
चला, भेटूया त्यांना !
त्यांच्यात तुम्हाला तुमची स्टोरी दिसेल कदाचित !!
- ऑक्सिजन टीम