श्रुती कोतवाल -राष्ट्रीय विक्रम करणारी पुण्याची आइस स्केटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 06:00 AM2018-12-27T06:00:00+5:302018-12-27T06:00:07+5:30

स्केटिंग करणारे भारतात कमी नाहीत, पण आइस स्केटिंग करत थेट कॅनडा गाठणारी आणि तिथं राष्ट्रीय विक्रम करणारी श्रुती कोतवाल आता ती वर्ल्डकप आणि विण्टर ऑलिम्पिकची तयारी करते आहे.

Shruti Kotwal - Ice Skater from Pune. Now she ready to make a world record | श्रुती कोतवाल -राष्ट्रीय विक्रम करणारी पुण्याची आइस स्केटर

श्रुती कोतवाल -राष्ट्रीय विक्रम करणारी पुण्याची आइस स्केटर

googlenewsNext


- रोहित नाईक

रोलर स्केटिंगच्या चाकावरून थेट आइस स्केटिंगच्या ब्लेडवर येण्यासाठी तिला मोठा संघर्ष करावा लागला. रोलर स्केटिंगमध्ये सहजपणे वावरणारी ती आइस स्केटिंगमध्ये मात्र अनेकदा धडपडली, बॅलन्स साधताना कित्येकदा तिला दुखापत झाली. मात्र तिचा निर्धार पक्का होता, डोळ्यांसमोर एकच लक्ष्य होतं. आइस स्केटिंग. त्यात कर्तबगारी गाजवणं आणि त्या मेहनतीच्या जोरावरच कॅनडामध्ये प्रशिक्षण घेत तिनं एक, दोन नाही तर तब्बल चार नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले.  पुण्याच्या श्रुती नितीन कोतवाल या तरुण स्केटरनं अशक्य वाटणारं एक स्वप्न जगून दाखविलं आहे.

खरंतर तिनं आयुष्यात कधीही आकाशातून पडणारा बर्फ पाहिलाही नव्हता. पुण्याच्या जेमतेम पडणा-या थंडीत ती वाढली. स्केटिंगची आवड होतीच. रोलर स्केटिंगमध्ये राष्ट्रीयस्तरावर तिनं अनेक पदकं जिंकली. मात्र आइस स्केटिंगचं आव्हान समोर होतं. ते तिनं स्वीकारलं आणि आता ती  वल्र्डकप आणि विंटर ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठय़ावर उभी आहे.
 

श्रुतीकडे सध्या वल्र्ड आइस स्केटिंगचा भारतीय चेहरा म्हणून पाहिलं जात आहे. आजपर्यंत वल्र्डकप आइस स्केटिंगमध्ये भारतीय कुणी खेळलेला नाही. मात्र श्रुतीच्या मेहनतीला यश आलं तर लवकरच ती या स्पर्धेतही खेळताना दिसेल.

हानपणापासून रोलर स्केटिंग करणार्‍या र्शुतीने बालेवाडीत स्केटिंगचे धडे गिरवले. आई उमा कोतवाल स्वत: राष्ट्रीय ट्रॅक अँण्ड फिल्ड खेळाडू आहेत. श्रुती स्केटिंग करायला लागली, त्यात तिनं प्रावीण्य मिळवलं आणि अल्पावधीतच अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये छाप पाडली. रोलर स्केटिंगच्या विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर काहीतरी वेगळं  करण्यासाठी र्शुती आइस स्केटिंगकडे वळाली. 

पण चाकांवरून ब्लेडवर जाणं हा मोठा टप्पा होता. अवघडही. ती सांगते, ‘ बर्फावर स्केट करणं हा अत्यंत अवघड टास्क होता. कारण हे सर्व माझ्यासाठी नवीन होतं. आइस स्केटिंगला सुरुवात करतानाच लक्षात आलं की रोलर स्केटिंगच्या तुलनेत आइस स्केटिंग खूप मोठा खेळ असून, याला जागतिक मान्यता आहे. रोलर स्केटिंगचा ऑलिम्पिकमध्ये समावेश नाही. पण आइस स्केटिंग मात्र ऑलिम्पिकमध्ये खेळला जातो आणि मग ठरवलं आपण हा खेळ खेळायचा. 

आता रोलर स्केटिंगच्या अन्य  जागतिक स्पर्धेतही भारतीय संघ सहभागी होत आहे. पण हे मी खेळत असताना तशी शक्यता नव्हती. त्यामुळे मग मीच माझ्यासाठी मोठं आव्हान निवडलं.’
 

आव्हान फक्त स्केटचं नव्हतं, तर वातावरणाचंही होतं. आकाशातून पडणारा बर्फ बघितलेला नव्हता आणि अति थंड वातावरणात जिथं श्वास घेणंही त्रास होतो अशा ठिकाणी तिला स्पर्धेत उतरायचं होतं.  सुरुवातीचे काही दिवस श्वास कसा घ्यावा हे शिकण्यातच गेले. यानंतर खेळातील टेक्निक, ब्लेडवर उभं राहून बॅलेन्स साधणं अशा गोष्टी आल्या.  हे करत असताना ती अनेकदा धडपडलीही.  दुखापतीही झाल्या. हा खेळ आपण का शिकतोय, असाही विचार मनात यायचा. मात्र त्या निराशेवर मात करत तिनं जोमानं सराव सुरू केला. ज्या ओव्हल स्केटिंग रिंगमध्ये ती सराव करते त्या रिंगचं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा खूप गरम असतं. मात्र बाहेर प्रचंड गारठा. मात्र त्या वातावरणाशी जुळवून घेत आता त्या खेळातही ती प्रावीण्य मिळवत आहे. 

आइस स्केटिंगचे प्राथमिक धडे उत्तर भारतातून घेतल्यानंतर तीन वर्षांपूर्वी श्रुती जागतिक प्रशिक्षणासाठी कॅनडाला गेली.  तिच्या येण्यानं सर्वांनाच चकित केले कारण तिचा स्कीन कलर सर्वांपेक्षा वेगळा होता. आशियाई उष्ण देश त्यातही भारतीय त्यामुळे ही मुलगी आइस स्केटिंगमध्ये कितपत टिकेल? असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र श्रुतीनं आपल्या दमदार कामगिरीचा धडाका लावत सर्वांना चकित केलं. आज कॅनडामध्ये 500 मीटर, 1000 मीटर, 1500 मीटर आणि तीन हजार मीटरच्या राष्ट्रीय रेकॉर्ड्सची नोंद तिच्या नावावर आहे.
अजून थोडा जोर लावला तर विंटर ऑलिम्पिक आता फार लांब नाही!

 

मदतीचे हात

या खेळाचे साहित्य खूप महाग असल्याने सहाजिकच श्रुतीलाही आर्थिक अडचण आलीच. कॅनडाला जाण्याआधी तिने र्जमनीत सराव केला. तिथे तिच्या कामगिरीने प्रभावित होऊन र्जमन अकॅडमीने साहित्य भेट म्हणून दिलं. यानंतर कॅनडामध्ये तिच्याकडे साहित्य जरी होते, तरी रेसिंग सूटवर नसलेल्या तिरंग्याची रुखरुख तिला होतीच. ही कमी पूर्ण केली कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांनी. श्रुतीच्या अनेक रेसेस पाहण्यासाठी उपस्थिती दर्शविलेल्या भारतीयांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी स्वत:हून मिळून काही रक्कम जमा केली आणि श्रुतीसाठी तिरंगा असलेला रेसिंग सूट बनवून घेतला. पारखी या मराठी कुटुंबाच्या पुढाकारानं हे शक्य झाल्याचं श्रुती आवर्जून सांगते.
 


 

Web Title: Shruti Kotwal - Ice Skater from Pune. Now she ready to make a world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.