- गणेश कुलकर्णी
भरपूर पैसे खर्च करून
स्मार्टफोन मारे घेतो आपण,
पण त्याचा स्मार्ट वापर करतो का?
स्मार्ट फोन तुमची अनेक कामं
बिनबोभाट करेल,
पण त्याला कामाला तर लावायला शिका.
आपला स्मार्टफोन ‘स्मार्ट’ आहे म्हणजे नेमके काय हो?
आपण स्मार्टफोनमध्ये करतो तरी काय? कॉल करणं, चॅटिंग करणं, सर्फिग करणं किंवा गेम्स खेळणं या चार गोष्टी स्मार्टफोनवर सर्वात जास्त केल्या जातात. त्यात आता गुगल मॅप्स आणि नेव्हिगेशन वापरणं, शॉपिंग करणं या गोष्टींची भर पडली आहे. यापैकी खरोखर स्मार्ट काम म्हणजे गुगल मॅप्स आणि नेव्हिगेशन वापरणं. बाकीची कामं स्मार्टनेस इंडेक्सवर यथातथाच!!
आज आपण आपल्या स्मार्टफोनचा अधिक स्मार्टपणो वापर कसा करता येईल याच्या सोप्या टिप्स बघू. आणि जो स्मार्टफोन एवढे पैसे खचरून घेतला आणि तो स्मार्टपणो वापरायलाही शिकू.
गुगल कीप
गुगल कीप म्हणजे छोटा पॅक बडी व्हॅल्यू असा प्रकार आहे. नोट्स घेणं, रिमाइंडर ठेवणं यासारख्या कामांसाठी कीप एकदम उत्तम. याशिवाय यात तुम्ही कामाच्या किंवा खरेदीच्या लिस्ट्स बनवू शकता आणि त्या शेअरही करू शकता. म्हणजे ट्रिप किंवा इव्हेंट प्लॅनिंग यासारखे ग्रुप टास्क्स कीपमुळे खूप सोपे होतात. कीपचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही यात फोटो नोटसुद्धा सेव्ह करू शकता. आणि यातली सर्वात भारी गोष्ट म्हणजे फोटोमध्ये काही टेक्स्ट असेल (जसे की पुस्तकातील पानाचा फोटो, क्लासनोट्सचा) तर कीप वापरून आपल्याला फोटोतला टेक्स्ट काढून टेक्स्ट नोट म्हणून सेव्ह करता येतं.
हे गुगल कीप अॅण्ड्रॉईड अॅप, क्र ोम अॅप किंवा वेब ब्राऊजरद्वारे वापरता येतं.
गुगल नाऊ
गुगल नाऊ हे गुगलच्या भात्यातले एक जबरदस्त अस्त्र आहे. एव्हाना तुमच्या अॅण्ड्रॉईड फोनवर गुगल नाऊ तुम्ही वापरलंही असेल. यात एक कळीची गोष्ट आहे. गुगल नाऊला तुम्ही तुमचा पर्सनल असिस्टण्ट असल्यासारखं वापरायला लागा. म्हणजे अलार्म लावायचाय तर ‘OK Google Wake Me Up at 5 AM’ अशी आज्ञा द्या म्हणजे लगेच हा तुमचा असिस्टण्ट पहाटे 5 वाजता तुम्हाला उठवेल. यासारखी अनेक कामं तुम्ही या असिस्टण्टला सांगू शकता. गुगल नाऊचा जितका जास्त वापर तुम्ही कराल तेवढा हा असिस्टण्ट कामात हुशार होत जाईल.
टास्कर
मी सकाळी ऑफिसात आलो की ऑफिस वायफायला फोन कनेक्ट करतो. मग कामं सुरू होतात. त्यात मग मध्येच कॉल येणं, व्हॉट्स अॅपची टूक-टूक, ट्विटर नोटिफिकेशन्स या सगळ्या गोष्टी सुरू असतात. अक्षरश: बसस्टॅण्डवर कोलाहलात बसून काम केल्याचा फिल येतो. एक दिवस विचार केला की मी ऑफिसमध्ये आल्याचं माङया स्मार्ट नावाच्या या फोनला का कळत नाही? ऑफिस आलं आहे म्हणजे इथं ओळखीचं वायफाय असणार मग व्हावं त्याला कनेक्ट? किंवा साहेब 1क् वाजल्यापासून साहेबांचं काम सुरू होतं मग गप्प बसावं. नोटिफिकेशन्स ऑफ करावेत. साहेबांना व्यत्यय चालत नाही. पण नाही. या विटेला रोज कनेक्ट करावं लागतं आणि काम सुरू झालं की रोज गप्प करावं लागतं. आहे ना डोक्याला खुराक?
टास्कर हा यासारख्या कटकटींवरचा रामबाण उपाय आहे. प्लेस्टोअरमध्ये फक्त 2क्क् रुपयांना उपलब्ध असणारं हे अॅप म्हणजे माईंडब्लोईंग आहे. हे अॅप माङया फोनवर असतं तर वरचं माझं काम अॅटोमॅटिक, न चुकता रोज झालं असतं. याशिवाय ड्राइव्ह करताना काही न करता रिंगची तीव्रता वाढवणं किंवा घराबाहेर पडल्यावर वायफाय ऑटोमॅटिक ऑफ करणं, टूजी-थ्रीजी ऑन करणं, स्क्रीन ब्राईटनेस कमी करणं किंवा फोन शेक करून फ्लॅशलाईट ऑन करणं यांसारखी अनेक कामं टास्करबुआ बिनबोभाट करतात. आणखी महत्त्वाचं म्हणजे टास्करची लक्झरी फक्त अॅण्ड्रॉईडवाल्यांनाच आहे. त्यामुळे कुणी आयफोन मिरवला तर त्याला बिनदिक्कत सांगा - मेरे पास टास्कर है!
स्मार्टफोन लिया है, तो स्मार्ट बनके दिखाओ!!