- श्रुती साठे सोनम कपूर. स्टाइल आयकॉन. तिचा कुठलेही आउटफिट घालायचा कॉन्फिडन्स, तिच्या भोवती असलेलं ग्लॅमर यामुळे तिच्या जवळपास सगळ्या स्टाइल्स चर्चेत असतात. अर्थात कधी स्तुती होते तर कधी टीका! मात्र तिची अजून एक गोष्ट चर्चेत असते. साडी नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. रेखा, विद्या बालन या क्लासिक आणि पारंपरिक साडय़ांसाठी ओळखल्या जातात. पण सोनम उठून दिसते ती तिच्या वेगळ्या ब्लाउज पॅर्टन्समुळे आणि साडी नेसायच्या पद्धतींमुळे! सोने आणि चांदीचे जरी वर्क, कलमकारी पद्धतीचे काठ आणि अंगभर चेक्स असलेली अस्सल सिल्क कांजीवरम साडी आणि त्यावर वापरलेलं मोठय़ा बाह्यांचं ब्लाउज सोनमवर सुरेख दिसलं. मोठा काठ आणि चेक्स हे दक्षिण भारतीय साडय़ांचं खास वैशिष्ट. प्रत्येक स्त्रीला आपल्याकडे एखादीतरी कांजीवरम साडी असावी असं वाटतंच! ‘ संजू’ प्रमोशनच्या वेळी सोनम व तिच्या हटके साडीची बरीच चर्चा झाली. गौरव गुप्ता या नामांकित डिझायनरने जांभळ्या रंगाची साडी गाउन अशी नवीन स्टाइल सोनमच्या माध्यमातून जगासमोर आणली. नेहमीच्या पद्धतीची साडी आणि त्या जोडीला गळ्याभोवती जास्तीचे प्लिटेड शिफॉन लावून मागे घेर सोडला गेला. हलका मेकअप, मोजके दागिने आणि साडी गाउन यामुळे सोनम नक्कीच परिकथेतली नायिका दिसली. ऑल ओव्हर प्रिण्टेड प्युअर सिल्क अतिशय रिच दिसते, नेहमीच! सोनमने निवडलेली पावडर ब्लू रंगाची, प्लेन सोनेरी काठ असलेली प्रिण्टेड साडी कॅज्युअल आणि फ्रेश लूक देऊन गेली. त्यावर वापरलेलं लूज टॉप कम ब्लाउज एक वेगळा लूक देतंअलीकडेच तिनं ऑल गॉल्ड अशी थीम ठेवत सोनेरी साडी नेसली. सोनेरी रंगाचा टॉप आणि त्याच रंगाच्या साडीसारख्या निर्या आणि पदर स्टाइल हटके दिसली. गोल्डन ज्वेलरी आणि सॅण्डल्स वापरून तिने लूक पूर्ण केला. डेनिम साडी हल्ली पाहायला मिळते. पण रिप्ड डेनिम साडी कोणी कधी वापरेल असं वाटलं नव्हतं. ब्लेझर कॉलर पांढरा टॉप आणि रिप्ड डेनिम साडी असा लूक काहींना आवडला तर काहींनी नाकं मुरडली. तुमचं काय मत आहे, यातलं काही करणार का कॉपी?
sa.shruti@gmail.com