चिडीचूप चक्र
By admin | Published: December 18, 2015 03:35 PM2015-12-18T15:35:10+5:302015-12-18T15:35:10+5:30
मासिक पाळीच्या संदर्भात सोशल साइट्सवर मोहिमांचा गाजावाजा असला, तरी प्रत्यक्ष खेडय़ापाडय़ातल्या वयात येणा:या मुलींचे प्रश्न वेगळेच आहेत, आणि जास्त गंभीर व जास्त जटिलही आहेत. त्या प्रश्नांची उकल शोधणा:या मैत्रिणींचे हे दोन अनुभव. त्या म्हणताहेत, शहरी चष्म्यांपलीकडे आणि वरवरच्या तोडग्यांपलीकडे प्रत्यक्षातल्या प्रश्नांवर उत्तरं शोधली नाहीत,तर वयात येणा:या आणि तरुण मुलींच्या समस्या सुटणं अवघड आहे.
Next
गैरसमजुती, अज्ञान आणि गरिबीसह अनारोग्याचं हे भयाण वर्तुळ तोडण्यासाठीचे काही आशादायी उपक्रम..
आदिवासी भागातल्या मुली, अंध-अपंग-गतिमंद मुली, यांचे त्या चार दिवसातले प्रश्नही वेगळे आहेत.
सरसकट एक शहरी उत्तर त्यावर तोडगा म्हणून कसं काम करेल! त्यासाठी माहिती आणि मोकळेपणा या दोन गोष्टींनी सुरुवात करावी लागेल!
प्रश्न फक्त भावनेचा नाही,
आरोग्याचा आहे!
देहासी विटाळ म्हणती सकळ
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध
संत सोयराबाई यांनी 13-14 व्या शतकात म्हणून ठेवलेल्या या काही ओळी. किती स्पष्ट, किती थेट.
पण आज आपण कुठे आहोत? एकविसावं शतक उजाडलं तरी मासिक पाळी हा विषय अजूनही अशुद्धी, सोवळं-ओवळं, संकोच आणि किळस याच सगळ्या गैरसमजुतींमध्ये गुदमरून राहिला आहे. जे द्रष्टेपण संत सोयराबाईंनी सातशे वर्षापूर्वी दाखवलं, त्याचा आपल्यामध्ये आजही अभाव दिसून येतो.
गेली तीन र्वष मी ‘मासिक पाळी’ या विषयावर समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या महिलांसोबत बोलते आहे. नक्की समस्या काय आहे हे जाणून घेण्याचा आणि त्याची उत्तरं शोधण्याचा माङया परीने प्रयत्न करते आहे. त्यातून अनेक धक्कादायक निरीक्षणं बाहेर येताहेत. समाजाच्या कोणत्याही स्तरातली महिला असो, तिला पाळीचे चार दिवस चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी चार मूलभूत गोष्टींची गरज असते. विषयाबद्दलची जागृती (मासिक पाळीबाबतची योग्य ती माहिती), वैयक्तिक स्वच्छता, मूलभूत साधनांची उपलब्धता (कापड किंवा नॅपकिन, स्वच्छतागृह, पाणी) आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विषयावर बोलण्यासाठी आवश्यक मोकळेपणा. खरंतर यापैकी कुठलीही एक गोष्ट नसेल तरी महिलांसाठी आरोग्याचे धोके वाढतात.
आनंदवनात मागील तीन र्वष स्त्नीषु (Strissue... By the womenhood) या प्रकल्पांतर्गत आम्ही या चार मूलभूत गोष्टींवर काम करतो आहोत. आई आपल्या गर्भात एक जीव वाढवते, त्याला जन्म देते, लहानाचं मोठं करते. पण तरीही आपल्याला मासिक पाळी कशासाठी येते याची योग्य ती माहिती अनेक मुलींनाच काय पण त्यांच्या आईलाही नसते. त्यामुळेच जेव्हा एखाद्या 12-13 वर्षाच्या मुलीला पहिल्यांदा पाळी येते तेव्हा तिची घालमेल थांबवू शकेल, तिला हा विषय समजावून सांगू शकेल आणि तिच्या प्रत्येक शंकेचं निरसन करू शकेल इतकी तिची आई सक्षम नसते.
पहिल्या पाळीच्या अनुभवांबद्दल अनेक मुलींशी, स्त्रियांशी बोलल्यावर आजही जे कळतं ते सारं फजिती, कुचंबणा, घुसमट आणि अज्ञान याभोवतीच फिरतं. आणि मुख्यत्वे वाटते भीती आणि अनेकदा तर त्या अनुभवाची घृणाही!
त्याक्षणी निर्माण झालेली भीती आणि घृणा टाळता आली नसती का? त्यांना पाळीविषयी योग्य माहिती आधीच देता आली नसती का? सुशिक्षित कुटुंबातील मुलींना सर्व माध्यमं उपलब्ध असूनही ही अवस्था, मग अशिक्षित-अल्पशिक्षित घरांमध्ये काय घडत असेल? महिलांशी या विषयावर चर्चा करू लागलं की असे अनेक प्रश्न आपल्याला घेरतात. त्यात एखादी तरुणी जर दृष्टिहीन, कर्णबधिर किंवा मतिमंद असेल तर पाळीच्या काळातल्या या चार मूलभूत गरजा ती कशी भागवत असेल, तिचे प्रश्न काय असतील आणि काय हाल होत असतील या विचाराने आम्हालाही अस्वस्थता येते.
समाजातील सर्व थरातल्या तरुणींचा विचार केला असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे समाजातील सर्वात दुर्लक्षित स्तरातल्या मुलीला आणि मुलांनाही या विषयाबद्दल परिपूर्ण, शास्त्रीय माहिती देता येईल अशा समर्थ माध्यमाची आपल्याला अत्यंत गरज आहे. अशिक्षित व्यक्ती, दृष्टिहीन, कर्णबधिर किंवा मतिमंद व्यक्ती अशा सगळ्यांना समजेल अशा स्वरूपात या विषयाचं ज्ञान उपलब्ध करून द्यायला हवं, या विचारातून आनंदवनात Menstruation Center आकार घेतं आहे.
असं केंद्र आनंदवनातच का उभं करायचं? आनंदवन ही एक आदर्श ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या अडीच हजाराच्या घरात आहे. अर्थातच, त्यातली अर्धी लोकसंख्या महिलांची आहे. आनंदवनातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मिळून दरवर्षी 35क्क् पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यात दृष्टिहीन, कर्णबधिर आणि शारीरिक अपंगत्व असणा:या विद्याथ्र्याचा समावेश असतो. त्याचबरोबर आनंदवनाला दरवर्षी अंदाजे एक लाख लोक भेट देतात. ज्यामध्ये ग्रामीण भागातील महिला, शालेय विद्यार्थी यांची संख्या खूप मोठी असते. त्यामुळे सर्व स्तरातील मुली-महिला आणि पुरु ष या सर्वापर्यंत पोहोचण्यासाठी, माहिती देण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचं ठरेल.
मासिक पाळी, पौगंडावस्थेत मुलामुलींमध्ये होणारे शारीरिक आणि भावनिक बदल, त्यादृष्टीने घ्यायची काळजी याबद्दलची सर्व माहिती वेगवेगळ्या माध्यमांतून या प्रदर्शनात मांडली जाईल. त्यासाठी ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमाचाही वापर केला जाईल. मासिक पाळीच्या काळात वापरली जाणारी विविध साधनं मुलींना, महिलांना इथे प्रत्यक्ष पाहता येतील, हाताळता येतील. त्याबद्दल माहिती सांगण्यासाठी इथे प्रशिक्षित व्यक्ती उपलब्ध असतील. मुलींसोबत किशोरवयीन मुलांशीही त्यांच्या शरीरात होणा:या बदलांसोबत मासिक पाळीबद्दल मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. त्यावरही हे केंद्र भर देईल. तसंच, दृष्टिहीन, कर्णबधिर किंवा मतिमंद व्यक्तींसाठी स्वतंत्र माध्यम वापरलं जाईल, असं नियोजन आहे.
खेडय़ापाडय़ातल्या मुलामुलींशी बोलताना आम्हाला एक नक्की जाणवलं आहे की, वयात येऊ घातलेल्या मुलामुलींसमोर आपण हा विषय मोकळेपणाने मांडला तरच पुढे पाळीशी निगडित अनेक समज-गैरसमज दूर होऊन आरोग्यपूर्ण आणि मोकळा समाज तयार होऊ शकेल. पाळीच्या काळात देवळात प्रवेश करण्यासाठी बंदी घालणा:यांना उत्तर देण्याचा कदाचित हा अधिक परिणामकारक मार्ग असेल. अशा विधायक मार्गाची आज जास्त गरज आहे, कारण प्रश्न भावनेचा नाही तर आरोग्याचाही आहे.
सॅनिटरी नॅपकिनसाठी पैसे कुठून आणायचे?
एकदा आमच्या सोमनाथ प्रकल्पाच्या आजूबाजूच्या खेडय़ातील बायकांशी बोलत होते. त्यांमध्ये 18 वर्षाच्या नातींपासून ते 6क् वर्षाच्या आजींर्पयत सगळ्या वयोगटाच्या बायका होत्या. पाळीदरम्यान कोण काय वापरतं याबद्दल मी त्यांना विचारत होते. बहुतेक जणी कापड वापरत होत्या. पण त्यातील एक मुलगी म्हणाली,‘मी विकतचे सॅनिटरी नॅपकिन्स वापरते.’ मी विचारलं, ‘किती रु पयांचं पाकीट घेतेस?’ ती म्हणाली, तीस रु पयांचं. कधी एक पुरतं, तर कधी दोनही लागतात. ते ऐकून एक आजी पटकन म्हणाली, ‘म्हणजे एक पायली तांदूळ झाले की बाई. मग त्यापेक्षा कापड का नाही वापरत या पोरी’. इतका साधा सरळ हिशेब मांडला त्या आजीने. मजुरी करणा:या या बायकांना महिन्याला पन्नास-साठ रु पये सॅनिटरी नॅपकिन्सवर खर्च करणं परवडणारं नव्हतं, हे उघड आहे. त्यामुळेच गावखेडय़ातल्या महिलांचे प्रश्न समजून घेतले की कापड वापरणं चूक आणि सॅनिटरी नॅपकिन्स वापरणं हेच बरोबर असा थेट प्रचार करणं कितपत बरोबर आहे, असा प्रश्न पडतो. त्यापेक्षा त्या काळात स्वच्छता कशी राखायची आणि अयोग्य पद्धतीने वापरल्यास काय दुष्परिणाम होतील याची माहिती महिलांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे, असं वाटतं.
- पल्लवी आमटे
(पल्लवी आनंदवनात स्त्नीषु या उपक्रमांतर्गत खेडय़ापाडय़ातल्या मुलींसह अंध, अपंग, गतिमंद मुलींच्या मासिक चक्राविषयीचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न आणि गैरसमज यासंदर्भात जनजागृतीचं काम गेली तीन वर्षे करते आहे.)