मातीशी घट्ट नातं असणा-या  टेनिसच्या ग्लॅमरस विश्वाच्या राजाची अर्थात राफाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 02:52 PM2020-10-15T14:52:41+5:302020-10-15T14:53:07+5:30

राफेल नदाल हा कराटे किड नाही टेनिस किड आहे. खरं तर त्याला क्ले किड म्हणणं योग्य ठरेल. कारण माती आणि त्याच्यात खास बॉँडिंग आहे.

The story of Rafa, the king of the glamorous tennis world, who has a close relationship with the clay court. | मातीशी घट्ट नातं असणा-या  टेनिसच्या ग्लॅमरस विश्वाच्या राजाची अर्थात राफाची गोष्ट

मातीशी घट्ट नातं असणा-या  टेनिसच्या ग्लॅमरस विश्वाच्या राजाची अर्थात राफाची गोष्ट

Next


- अभिजित पानसे

‘कराटे किड’ या जॅकी चॅनच्या जगप्रसिद्ध सिनेमात एक दृश्य आहे.
मिस्टर हान हा कराटेगुरु 12 वर्षाच्या ड्रे पार्करला कराटे शिकवायला सुरुवात करण्याआधी सांगतो की, जॅकेट जमिनीवर टाकायचं, खुर्चीवर टांगायचं, स्माइल करायचं, परत घालायचं.
आपल्याला कराटे शिकायचं आहे आणि हे काय भलतंच शिक्षक शिकवतोय असं म्हणत तो मुलगा वैतागतो.
पण इलाज नसतो, ते उत्तम जमेर्पयत त्याला ते करावंच लागतं. सातत्य आणि सकारात्मक वृत्तीचं हे ट्रेनिंग जॅकेट घालणं-टाकणं यातून नकळत सुरूहोतं.
कराटे किड सिनेमा आठवला तो राफेल नदालच्या निमित्ताने. त्यानं फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली तेव्हा वाटलं हा मुलगाही तर असाच घडला आहे, कष्ट आणि सातत्यातून.
राफेल नदाल हा कराटे किड नाही टेनिस किड आहे. खरं तर त्याला क्ले किड म्हणणं योग्य ठरेल. कारण माती आणि त्याच्यात खास बॉँडिंग आहे.
राफेल नदालच्या काकांनी त्याला बालवयातच टेनिस शिकवताना त्याच्यावर माणुसकीचेही संस्कार केले. राफलने त्याच्या आत्मचरित्रात सांगितलंय की, त्याचे काका म्हणजेच त्याचे कोच अत्यंत कडक, शिस्तप्रिय होते.
यामुळेच यशाची हवा राफेलच्या डोक्यात गेली नाही. पाय जमिनीवर राहिले. राफेलची नाळ मातीशी पक्की राहिली. या मातीनेच त्याला यशाचं सोनं प्राप्त करून दिलं. 
टेनिसमधील एकूण चार मोठय़ा टुर्नामेंट या ग्रँड स्लॅम असतात. नव्या वर्षाच्या सुरु वातीला ऑस्ट्रेलियन ओपन जी कडक प्रांगणात खेळली जाते, त्यानंतर मातीच्या प्रांगणात खेळली जाते ती फ्रेंच ओपन स्पर्धा, त्यानंतर साधारणत: जून-जुलैमध्ये गवताच्या कोर्टावर विम्बल्डन स्पर्धा होते व ऑगस्ट -सप्टेंबरमध्ये यूएस ओपन स्पर्धा होते. 


लाल मातीच्या प्रांगणात म्हणजे क्ले कोर्टावर खेळल्या जाणा-या फ्रेंच ओपनचा बादशहा कोण तर याचं उत्तर एकच स्पेनचा राफेल नदाल.
त्याला डाव्या हाताने खेळताना बघणं डोळ्यांना ट्रीट असते. तो शारीरिक प्रचंड मेहनत करतोच; पण त्याची सशक्त बाजू आहे त्याची मानसिकता.
टेनिस इतिहासात सगळ्यात जास्त जखमी झालेला खेळाडू कोणी असेल तर तो राफेल नदाल.
पण दरवेळी आपल्या अडचणींवर मात करून जोरदार मुसंडी मारणाराही नदालच आहे. नदालचा नादच खुळा.
करिअर भरात येत असतानाच गुणसूत्नांमुळे येणा:या व्याधीमुळे त्याच्या पायांमध्ये त्रास सुरू झाले. विशीतच त्याचं करिअर संपायची वेळ आली, कारण अशा व्याधीसोबत तो टेनिस खेळणं अशक्य आहे त्याला सांगितलं गेलं. राफेलने प्रचंड मेहनत घेऊन व सशक्त मानसिकतेच्या भरवशावर याही अडचणींवर मात केली.
टेनिसच्या ग्लॅमरस विश्वाचा तो राजा असून, तो अत्यंत नम्र व कुटुंबवत्सल आहे. स्पर्धा आटोपली की तो स्पेनमधील मायोर्क  बेटावर आपल्या बायको व आईवडिलांसोबत, मोठय़ा  कुटुंबासोबत झगमगाटापासून दूर राहातो; 
पण राफेलचा भारताशी विशेष संबंध आहे हे बहुतेकांना माहीत नाही. 
2010 साली आपल्या आईसोबत नादालने राफा नदाल फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. याचं एक केंद्र आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे आहे. भारतातील पीडित, वंचित मुलांसाठी शिक्षण केंद्र उभारलं आहे. येथे गरीब मुलांना टेनिस प्रशिक्षणासमवेत इतर शिक्षण दिलं जातं. त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची काळजी व योग्य पोषण केलं जातं. 
त्याचे पाय मातीतून कधी सुटले नाहीत, म्हणून ती माती त्याला भरभरून यशाचा आशीर्वाद देत राहाते.


( अभिजित ब्लॉगर आहे.)

 

 

Web Title: The story of Rafa, the king of the glamorous tennis world, who has a close relationship with the clay court.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.