गरीबीच्या दावणीला बांधलेले आईबाप मुलींना कुपोषणाच्या दुष्टचक्रात ढकलतात, तेव्हा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 06:15 AM2019-06-27T06:15:00+5:302019-06-27T06:15:03+5:30
लातूर-उस्मानाबाद पट्ट्यात मुलगी दहावी होते न होते तोच तिचं लग्न उरकलं जातं. का? - तर वयात आलेली मुलगी घरात नको आणि शेतीच्या कामाने काळवंडली तर मग कोण पत्करणार तिला? लग्नानंतर शिक्षण थांबतं, वर्षाच्या आत पाळणा हलतो आणि कोवळी पोर कुपोषित मुलाची आई होते.
- धर्मराज हल्लाळे
आई, अण्णाला सांग, मला शिकायचंय, इतक्यात लग्नाचं पाहू नका़ या दुष्काळात कर्ज काढून लग्न लावू नका, मला एवढय़ात लग्न करायचंच नाही, मला शिकायचंय़ .
असं कळवळून सांगणार्या मुली घरोघर असतात; पण त्या कुणाला दिसत नाहीत. अनेकांना वाटतं, खेडय़ापाडय़ात मुली शिकत आहेत, आता गोष्टी बदलत आहेत, पण तोही एक भ्रमच आहे. कारण दहावीनंतर अनेकींचं शिक्षण थांबतं आणि सर्रास त्यांची लग्न लावून घरचे आपल्या ‘जबाबदारीतून’ मोकळे झाल्याचा आनंद कमावतात. दहावीनंतर 3 ते 3500 हजार मुली ‘ड्रॉप’ होतात, त्यांचं शिक्षण थांबतं आणि त्या कॉलेजात पोहोचूच शकत नाहीत असं आकडेवारी सांगते. काय होतं त्यांचं पुढे? तर लग्न होतं. आणि मग अकाली मातृत्वाच्या चक्रात आणि आर्थिक ओढाताणग्रस्त संसारात त्या अडकतात.
तरी दहावीर्पयत शिकणार्याही नशिबवानच म्हणायला हव्यात. कारण ज्या गावात शाळा सातवीर्पयतच असते तिथल्या बहुसंख्य मुलींचं शिक्षण सातवीर्पयतच पोहोचतं. त्यातूनही ज्यांच्या घरचे परवानगी देतात, ज्यांच्या गावापासून दुसर्या गावात जाणं सोयीचं, सुकर असतं त्या गावातल्या पाच- दहा जणी पुढे हायस्कूलमध्ये जातात. दहावीर्पयत शिकतात. काही गावांमध्ये तर चौथीर्पयतच शाळा, तेवढं शिकलं, लिहिता-वाचता आलं फार झालं म्हणून गावात मजुरीला आईबाप मुलींना सोबत नेऊ लागतात. त्यामुळे दहावीर्पयत शिक्षण हीसुद्धा आजही अनेक मुलींसाठी फार मोठी गोष्ट आहे. कारण तेवढं शिकणार्याही नशिबवानच, त्यांच्या अनेक मैत्रिणी चौथी-सातवीनंतरच शिक्षणाचा हात सोडून देतात. आणि ज्या उरतात त्यांनाही दहावी उत्तीर्ण झाल्या तरी महाविद्यालयात जाण्याचं स्वप्न परवडत नाही. दहावीर्पयत शिकली पोरगी आता बास झालं, लगीन करून देऊ असं पालक सर्रास म्हणतात आणि लगेच लग्नाच्या तयारीला लागतात.
आईवडील का असं लेकींच्या शिक्षणाला नख लावतात, तर एकीकडे शेती व्यवस्था उद्ध्वस्त झाली आह़े शेतकर्यांच्या आत्महत्येचं सत्र थांबत नाही़ डोक्यावर कर्जाचे डोंगर. उद्याची खातरी नाही. त्यामुळे एक किंवा त्याहून जास्त मुली असतील तर मुलींचं लग्न उरकणं ही मोठी जबाबदारी वाटते. त्यातही आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एकल पालक तर मुलीचं लग्न पटकन उरकून टाकून आपली जबाबदारी सरली म्हणतात.
त्यात दुष्काळामुळेही शिक्षण थांबतं आहे. शेती करणार्या अनेक कुटुंबाचंही रोजगाराच्या शोधात स्थलांतर होतं आहे. त्यामुळेही मुलींची लग्न लवकर करण्याकडे कल वाढला आहे.
काही उदाहरणं तर अशी की अनेकजणी हुशार असतात, 75 टक्केच्या पुढे मार्क मिळवतात. त्यांना शिकायचंही असतं; पण दरम्यान त्यांचं लग्न लावून दिलं जातं. कारण मुलींना दुसरीकडे गावापासून लांब शिकायला पाठवायचं तर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो. जरा काही गडबड झाली तर गावात तोंड दाखवायला जागा उरणार नाही असं पालक सहज बोलतात आणि कुठलाच धोका नको म्हणून मुलीला घरी बसवतात. आपल्या शिक्षणाचा बळी देऊन लग्न लावलं असं मात्र काही या मुली बोलत नाहीत की सांगत नाहीत, कारण एकदा संसार-मुलंबाळं झाली की जणरीत सांभाळून गप्प राहणंच त्या पसंत करतात.
दहावीर्पयत शिकलेल्या या मुली, त्यांची लग्न होतात आणि जेमतेम 19 वर्षे पूर्ण होण्याआधीच त्यातील 10 ते 15 टक्के मुलींच्या वाटय़ाला मातृत्व येतं. मराठवाडय़ात उस्मानाबादमध्ये 31 टक्के मुलींची तर लग्नच 18 वर्षे पूर्ण होण्याआधी होत असल्याचं आकडेवारी सांगत़े या मुली आर्थिकदृष्टय़ा गरीब कुटुंबातल्या, त्यांच्या पोषणाची आधीच आबाळ झालेली असते. शारीरिक कष्ट करकरून शरीर अशक्त असतं, रक्त कमी अर्थात अॅनिमियाचा आजार अनेकींना असतो. आणि लग्नाच्या पहिल्या किंवा दुसर्याच वर्षी पाळणा हलला की त्या गरोदरपणातही त्यांचं पोषण होत नाही. मुळात आईच अल्पवयीन, अशक्त, कुपोषित असते, मग मूलही कुपोषित जन्माला येतं. अर्धवट शिक्षण, लवकर लग्न, गरोदर मातेचं कुपोषण आणि आबाळ हे सगळं कुपोषणाच्या पायाशी असतं. मात्र या सार्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा विचार होत नाही. आणि अनेक मुलींचं आयुष्य अकालीच अनेक अर्थानी कुपोषित होऊन जातं.
****
* मला शिकू द्या़ दहावीला 80 टक्के मार्क आहेत़ बारावी तरी करू द्या़ अशा गयावया मुली करतात. बरोबरच्या मुलांना शिकायला जिल्ह्याच्या ठिकाणी जाता येतं़ मी मात्र गाव सोडू शकत नाही़ का?
- असा सवाल त्या करतात; पण त्याचं उत्तर हेच, मुलगी आहे म्हणूऩ!
* मुलगी म्हणजे अब्रू, काचेचं भांडं, जबाबदारी याच भावनेतून अजूनही समाज बाहेर येत नाही त्यामुळे शिक्षण थांबवून लग्न सर्रास लावली जातात.
* एकीकडे मुलींचा मार्काचा टक्का वाढतोय म्हणून आकडे प्रसिद्ध होतात, दुसरीकडे दहावीनंतर घरी बसणार्या कुठल्याशा अंधारात गायब होतात. त्याच अंधारात भविष्यात अनारोग्याच्या ढिगार्याखाली कुपोषणाचे सांगाडे सापडतात.
* अलीकडेच उस्मानाबाद तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकर्याच्या मुलीनं दहावी परीक्षेत 76 टक्के गुण मिळविल़े पुढील शिक्षणाची सोय गावात नव्हती़ त्यासाठी मुरूड अथवा उस्मानाबादला जावं लागणार होतं़ गावात बसही येत नव्हती़ त्यामुळे घरच्यांनी तिचं शिक्षणच थांबविलं़ हे एक प्रातिनिधक उदाहरण. अशा अनेक कहाण्या आहेत, जिथं अजूनही मुलींना दहावी, बारावीच्या पुढे सरकताच येत नाही़