एकाच दिशेच्या दोन प्रवाशांचा एकत्र तरीही स्वतंत्र प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 07:15 AM2018-12-27T07:15:45+5:302018-12-27T07:20:02+5:30

प्रेमात पडताना तर आवडतेती ‘स्वतंत्र’, पण उद्या लग्न झाल्यावरकोंडणार तर नाहीस तिलाबंदिस्त भिंतीत?

Two passengers in the same direction tells their story of freedom | एकाच दिशेच्या दोन प्रवाशांचा एकत्र तरीही स्वतंत्र प्रवास

एकाच दिशेच्या दोन प्रवाशांचा एकत्र तरीही स्वतंत्र प्रवास

Next

-श्रुती मधुदीप 

आपण कुठंवर येऊन पोचलोय रे? किती अंतर आपण सोबत चाललो असू? की तुझी ओळख होण्यापूर्वीही आपण सोबतच होतोच? पण का कोण जाणे, तू असा सतत सोबत असल्यासारखा वाटतोस, जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून किंवा त्याही आधी माझ्या नेणीवेतही असावास तू! म्हणूनच की काय अंतर मोजता येत नाही. कारण प्रवासाचा उगमबिंदूच पॉइंट आउट करून दाखवता येत नाही. 

इतक्यात गूगल मॅपने डावीकडे टर्न घ्यायला सांगितला. तिने गाडीवरून एक हलकसं वळण घेतलं. 

तुझं नाव, गाव, रंग, रूप मी कधी विचारलं नाही. तुला त्वरेने पाहाण्याचा अत्याग्रह कधी केला नाही; पण तुझं रूप मला माहीत नाही, असं मला कधी वाटलंच नाही, हे कशामुळे असावं गं? म्हणजे तुझ्यासारखी व्यक्ती शोधायचा प्रयत्न केला नाही असं नाही; पण तुझ्याइतके समजुतीचे, प्रेमळ हसणारे डोळे फक्त तुझेच असावेत, असं वाटतं राहातं.
किंचित गार झुळूक त्याच्या शरीराला स्पर्शून गेली. हातावर हात घासत हसत त्यानं उजवीकडे वळण घेतलं. 

आज कानातले हेडफोन गाणी गात नाहीयेत. कितीतरी दिवसांनी तुझ्या आठवणींचं चित्र  काढायची स्पेस मिळाल्यासारखंच वाटतंय मला. तू म्हणशील फक्त विचारांनी चित्र  काढता येतं? मी हसेन. म्हणेन, हो, का नाही. तुला नाही दिसत मी रंगवलेले हे तुझ्यातले रंग? हेच तर चित्र  दाखवू पाहाते मी तुला. तुला ते दिसतं का? सांग ना, ए ऐकायचंय मला. बघ माझी ही बोटं किती सा-या रंगांनी रंगली आहेत तुझं चित्र  बनवताना! मला हे चित्र तू पाहिलेलं हवंयस. पाहतोयस ना? 

इतक्यात समोरून विरूद्ध दिशेने एक गाडी आली आणि तिनं तिच्या गाडीचा ब्रेक करकचून दाबला. 

तुला कसा दिसतो गं मी? मला तर भीतीच वाटते. तुला हव्या तशा, हव्या तितक्या रंगात रंगबेरंगी होता येईल का मला? मला खरंच माहीत नाही. या रस्त्यावरच्या आजूबाजूच्या लोकांनी मला ठरावीक एका रंगात रंगवून टाकायचा आतोनात प्रयत्न केलाय. खरं सांगू, ते स्वीकारून त्या एका रंगात राहाणं मी काहीकाळ पसंतदेखील केलंय. खरं तर अभिमान बाळगलाय त्या रंगाचा; पण तुझे डोळे दिसू लागले मला एका काळानंतर म्हणून की काय तू माझ्यात वसतेस हे समजलं मग मला मी वेगळाच भासू लागलो. वाटलं मी फक्त एका रंगाचा कसा असेन! 

त्यानं अंधार पडू लागलेल्या त्या काळसर आभाळाकडे पाहिलं. 

तू कधी एका रंगाचा नव्हतासच, ना मी कधी! 

आपल्याला कितीही ओरडून कुणीही काहीही सांगितलं तरी इकडे बघ माझ्या चेहर्‍यावर काय दिसतं तुला? मृदुपणा? फक्त? नाही ना! मी फक्त मृदु कधीच नव्हते, ना तू कधी फक्त स्ट्रॉँग. आपल्याला माहीतच नव्हतं आपण एकमेकांच्या इतके आत कधी आणि केव्हा जन्मलोय ते, तुला असं जाणवलंय कधी?
तिनं चेह-यावरच्या स्टोलची गाठ सोडली. 
हो! हो! पण तू अशी नेहमी एकांतातच भेटशील की काय? 
काहीही असलं तरी मला तुला स्त्री  म्हणूनही अनुभवायचंय.
तो रस्त्याच्या शेजारच्या एका बाकावर बसला. 
मलाही! मीही आतूर आहे तुला पुरुष म्हणून अनुभवण्यासाठी! काय झालं? असा आश्चर्यचकित का होतोयस? अच्छा ! मी असं म्हणू शकत नाही का? लाजायला वगैरे हवं की काय मग मी फक्त? काय रे? 
ती हसली. 
तसं कुठे म्हटलं मी! म्हणजे ऑकवर्ड झालो मी, नाही असं नाही! पण तुला तुझी मतं मांडायचा, तुला हवं ते बोलायचा अधिकार आहेच, हीच तर गोष्ट आवडते मला तुझ्यातली. असं वाटतं मी पण नव्यानं  पाहू लागलोय स्वत:ला. आपल्याला.
तो बाकावरून उठला आणि पुन्हा चालू लागला. 

ए, ऐक हं पण तुला हे सगळं माझं स्वतंत्र वगैरे असणं आता आवडत असेल पण मी तुला भेटल्यावर तू हे सगळं दरवाजाआड बंद केलंस तर? तू मला तुझ्या घरात बंद तर करणार नाहीस ना? आपलं घर आपल्या दोघांचंही राहील ना नेहमी? भिंतींना सैल सोडशील ना? दरवाजाचं पीपहोल तुला आपल्या घराला कुंपण घालायला भाग नाही ना पाडणार? 
टेक युवर राइट अँण्ड ड्राइव्ह फॉर फाइव्ह हन्ड्रेड मीटर्स - गूगल मॅपवाल्या बाईने सांगितलं. 
मी आपलं घर आपल्या दोघांच्या कष्टाने, पैशाने बांधलेलं पाहातोय. आपल्या घराच्या दाराच्या कडीवरला तुझा हक्क मला कधीच तुझ्याकडून हिरावून घ्यायचा नाहीये. मी आकृती पाहातो आपली, तू मला लसूण सोलून देत काहीतरी वाचून दाखवत किचनमधे बसलीयेस आणि मी भाजी बनवतोय! 
.कधी व्हाइस व्हर्सा. 
तू मात्र  एकटीच या किचनच्या स्टोअरमध्ये अडकून न पडण्याचं वचन दे मला. वचन दे की कडी उघडून बाहेर पहातानाही तुझं आठय़ा पडलेलं-खोल विचार करणारं कसलेही दागिने न चढवलेलं कपाळ तुलादेखील सुंदर वाटेल. तू माझी तुझ्या सौंदर्यामुळे भारावलेली नजर पाहण्यासाठी सतत चेहर्‍यावर लेप चढवण्यात गुंतलेली नसशील, वचन दे! 
त्यानं आशेनं समोर पाहिलं आणि डावीकडे वळला. 
तू जवळपास आहेस की काय? 
तुझ्या येण्याची अशी चाहूल लागते की सैरभैर होतो मी. 
त्यानं अजूबाजूला पाहिलं.
मला माहीत आहे तू व्याकूळ होतोस मला भेटायला ते. पण ऐक मी मागे राहिलीय ना मला यायला थोडासा वेळ दे. तोवर तुला पेशन्टली थांबावं लागेल. थांबशील ना ? तुला माझ्यासाठी थांबवेल? की तडजोड करशील माझ्याशी?
तिचे डोळे पाणावले. 
ये.. मी थांबलोय केव्हाचा! माझ्यात तू वसतेस हे कळलंय मला. मी फक्त पुरुष कुठे राहिलोय आता! मीच तुला मागे सोडून आलोय. आता मात्र मी तुझ्यासाठी कितीही वेळ थांबेन! वचन देतो तुला. 
तो तिचा अदमास घेऊ लागला. 
‘युअर डेस्टीनेशन विल बी ऑन टू हण्ड्रेड मीटर्स’ 

बघ तू थांबायचं फक्त वचन दिलंस अन् मी किती जवळ पोहोचले तुझ्या! आपल्यातलं अंतर कमी होऊ लागलंय. खरं तर आपल्यात अंतर नव्हतंच! 
आणि तिने अँक्सिलेटरचा वेग आणखीन किंचित वाढवला..


( समाप्त)

Web Title: Two passengers in the same direction tells their story of freedom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.