माहितीचा अधिकार वापरा आणि खड्याचे दोषी कोण हे विचारा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 04:50 PM2019-07-18T16:50:16+5:302019-07-18T16:55:32+5:30
एका पावसात रस्त्यात खड्डे पडले, कायम हेच, कधी बदलणार? अशी नुस्ती कटकट करू नका. विचारा सरकारला की, हा खड्डा नेमका कुणाचा दोष?
- मिलिंद थत्ते
रस्ता आताच झाला. पावसाळ्याच्या जस्ट आधी आणि खड्डे पडलेसुद्धा! काय कंत्राटदाराने पैसे खाल्ले का अभियंत्यांनी खाल्ले, काय कळंना. ते गेले त्यांची कमाई करून नि आम्हाला हितं रोज जीव मुठीत धरून त्या रस्त्यावरून जावे लागते ना बे! अपघात होतील, म्हातारे-कोतारे पडतील, मग बातम्या येतील अन मग कायसुदीक फरक नाय पडनार. पुढची 10 वर्षे तरी रस्ता तसाच सहन करावा लागतोय.
-अशी बडबड करून बोटं मोडायची किंवा बोटात लेखणी घ्यायची नि एक माहिती अधिकार ठोकायचा.
बोला काय केल्यानं आपल्या आवतीभोवतीचं चित्र बदलेल?
बोला, हाय का तयारी?
मग असं करा - माहिती अधिकाराचा नमुना अर्ज घ्या. तसाच अर्ज हाताने लिहिला तरी चालतो. टाइप केलेला, छापलेलाच पाहिजे असं काही नाही. त्यात तुमच्या जवळच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचं नाव, पत्ता व वर जनमाहिती अधिकारी असं लिहून टाका.
1) मग अर्जदार म्हणून तुमचे नाव, पत्ता लिहा.
2) माहितीचा कालावधी - ‘तो रस्ता बांधायच्या आधीपासून ते आजच्या तारखेपर्यंत’ असा लिहा.
3) माहितीचा तपशील लिहिताना कुठून ते कुठूनचा रस्ता ते लिहा व त्या रस्त्याशी संबंधित पुढील माहिती मिळावी असे लिहा. म्हणजे, अ) सदर रस्ता बांधकामाच्या करारांची/कंत्राटाची प्रत, ब) दोषदायित्व कालावधी, क) वर्कऑर्डरची (काम सुरू करण्याचा आदेश) प्रत.
4) माहिती अधिकाराच्या अर्जात तपशील लिहिताना उगा पसारा करू नये. 150 शब्दाच्या आत आपले लिहून झाले पाहिजे.
5) नेमके मुद्दे किंवा दस्तावेज लिहिणं महत्त्वाचं.
6) वरच्या मसुद्यात ‘दोषदायित्व कालावधी’ म्हणजेच डिफेक्ट लायबिलिटी पिरिएड असा शब्द आहे. कोणतेही बांधकाम केल्यानंतर ठरावीक काळासाठी त्या बांधकामात दोष आल्यास जबाबदारी कंत्राटदाराची असते. तुमचा रस्ता आताच झाला आणि सहा महिन्यांच्या आतच खड्डे पडले तर नक्कीच हे दोषदायित्व कालावधीत बसते. तुमच्या माहिती अधिकारात हा शब्द आला म्हणजे तुम्हाला फसवणं सोपं नाही हे यंत्रणेला कळतं.
7) अर्जात माहितीचा तपशील लिहून झाला की, ‘माझा अर्ज दुस-या माहिती अधिका-याकडे वर्ग करायचा झाल्यास कलम 6(3) खाली तशी कारवाई करून मला सूचित करावे’ असं वाक्य लिहा. आता कुठलाही माहिती अधिकारी, ‘आमच्या हापिसला ही माहिती भेटत नाही दुसरीकडे जा’ असं तुम्हाला म्हणू शकत नाही.
8) तुम्ही कुठेही अर्ज दाखल केलात तरी तो अर्ज योग्य त्या ठिकाणी पाठविण्याची जबाबदारी त्या माहिती अधिकार्याची असते. आपण वणवण करायचं काम नाही.
9) लक्षात ठेवायचं लोकशाहीत आपण नागरिक म्हणजे खास माणसं! फक्त आपली ताकद आपण वापरली पाहिजे.
(लेखक ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)
milindthatte@gmail.com