आम्ही गावठी
By admin | Published: December 18, 2015 03:25 PM2015-12-18T15:25:45+5:302015-12-18T15:25:45+5:30
आमच्यात नसतोय थर्टीफर्स्ट सेलिब्रेट करावं असं काही नसतंच आमच्याकडे, त्याला काय इलाज?
Next
>वर्ष संपत आलं.
माझ्या कॉलेजच्या कट्टय़ावर आता न्यू इयर सेलिब्रेशनचे प्लॅन्स सुरू झाले.
जो तो एकमेकांना विचारतो आहे, काय यंदा प्लॅन?
मलाही विचारलं दोस्तांनी. मी म्हटलं काही नाही.
तशी एक आगाऊ पोरगी म्हणाली, ‘त्यांच्यात नसतं रे असं काही, गावंढळ आहे तो.’
माझ्या तोंडावर ती पोरगी मला गावंढळ म्हणाली याचं काही दु:ख नाही. एरवीही माझ्यासारख्याला कट्टय़ांवर गावंढळ, गावठी, खेडलू असं काहीबाही म्हटलं जातं. त्याचं आम्हाला काही वाटत नाही. मला तर नाहीच. माझी भाषा शुद्ध नाही याचंही मला काही लयी दु:ख वाटत नाही. त्या एका सिरीयलमधे कोण तो पिंटय़ा, त्याची बायको गावठी बोलते तर कट्टय़ावर माझे पुणेरी दोस्त मला म्हणालेच चारदा, ‘तुझी बहीण आहे का रे ती, तुमच्यात असंच बोलत्यात ना.?’
त्यांना प्रतिउत्तर काही मी दिलं नाही. कारण संताप झाला तर आपली जीभ कमी आणि हात जास्त चालल अशी आपल्याला भीती वाटते. म्हणून गप्प राहतो एवढंच!
तर ती पोरगी म्हणाली की, त्यांच्यात नसतं रे असं काही.’
ते मला जास्त लागलं.
तिला काय सांगणार की, नसतंच आमच्यात असं काही!
आम्ही म्हणजे गाववाले पोरं. पुण्यात शिकायला आलेले. मी कर्नाटक बॉर्डरवरचा. वडील सालदार म्हणून राहतात. मी ईबीसी कोटय़ातून जमेल तसं शिकतोय. यंदा बहिणीचं लग्न झालं. वडिलांनी सांगितलं एवढं वर्ष तुझं तू काढ पुण्यात, लय उधारी झालीय इकडं. मी पार्टटाइम काम करतोय कम्प्युटर ऑपरेटर म्हणून.
माझे दोस्तही असेच गरिब! गरिबीतले दोस्त आम्ही! आमचा कसला आला थर्टीफर्स्ट. आम्ही एखाद्याच्या रूमवर टीव्ही पाहू. खिचडी करू. गप पडून राहू.
पुणोरी पोरापोरींसारखा सोशल अवेअरिन्स दाखवत कॉलेजात ‘नो ड्रिंक्स’च्या घोषणाही नाही देता येत. जे परवडतच नाही, ते काय प्यायचं?
आणि तरी हे पोरं आम्हालाच चिडवणार, विचारणार तुमचा काय प्लॅन?
त्यांच्या भाषेत सांगायचं तर ‘हर्ट’ होतो आम्ही. पण तोंड उचकटून बोलत नाही फार.
बोलून उपयोग नाही. आमची दरिद्री कहाणी त्यांना कळणार पण नाही. आणि आपण सांगत बसलो तर बरं बी दिसणार नाही!
पण त्यादिवशी हे सारं लयी झोंबलं म्हणून ऑक्सिजनला तिरमिरीत पत्र लिहितोय.
वाटलं तर छापा!
तुमच्यामुळे तरी काही पोरांना कळल की, गरिबे पोरं थर्टीफस्र्टचं प्लॅनिंग काय म्हणून नाही करत.
माङयासारखे!
- अविनाश