प्राची कुलकर्णी
आयबीएन लोकमत -
१0, ९,८,७, काउंटडाऊन सुरू होतं. एक एक टप्पा पार पडत होता. शेवटचे काही सेकंद बाकी होते..
सगळेच वाट पाहत होते ‘त्या’ क्षणाची. एकेक क्षण एकेका तासासारखं वाटणं म्हणजे काय असतं याचा तो अनुभव. इस्त्रोच्या कंट्रोल रुममधला. जमलेली सगळीच माणसं श्वास रोखून बसली होती.
तेवढय़ात मंगळयानाचा एॅण्टीना उलट म्हणजे पृथ्वीच्या दिशेने वळायला लागला.
तेव्हा शेवटचे ४ सेकंद बाकी होते. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. पुढची काही मिनिटं तो कडकडाट तस्साच सुरुच होता..
एरवी एखादं यश सेलीब्रेट करायचं असलं तरी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची एक ठराविक ठरलेली पद्धत असते.
पण यावेळी मात्र वेगळंच चित्र दिसत होतं.
काही शास्त्रज्ञ व्ही फॉर व्हिक्टरीची खूण करत हात उंचावताना दिसत होते, एकमेकांना मिठय़ा मारत सेलिब्रेट करणारे तरुण चेहरे दिसत होते.आणि तेवढय़ात एक ट्विट आलं. Howdy? marscuriosity? keep in touch. i"ll be around..
हे ट्विट होतं मंगळयानानं स्वत:च्या ट्विटर हॅण्डलवरून केलेलं!
हे डोकं चालवणारी अर्थातच होती इस्त्रोची तरुण टीम. या तरुण शास्त्रज्ञांनी केलेली ही छोटीशी गंमत. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये इस्त्रोचं हे बदलतं रूप प्रकर्षाने समोर येताना दिसलं.
गेल्या काही दिवसांपासून इस्त्रोमध्ये तरुणांचा सहभाग वाढतो आहे. शास्त्रज्ञ / तंत्रज्ञ म्हणून काम करायला इच्छूक असणार्या तरुणांच्या अर्जांची संख्या इस्त्रोकडे वाढत होती. इंजिनिअरिंग, एमएस्सी केलेल्या तरुणांचा ओढा इस्त्रोकडेही वळत होता. या सार्या बदलाला कारणीभूत ठरली ही मंगळयान मोहीम.
१५ ऑगस्ट २0१2 रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी या महत्त्वकांक्षी मोहिमेची घोषणा केली. घोषणा तर झाली पण एक नवं आव्हानही उभं राहिलं. लवकरात लवकर यान पाठवायला हवं असं इस्त्रोच्या टीमनं ठरवलं आणि यान नोव्हेंबर २0१3मध्ये पाठविण्याचा निर्णय झाला.
मला अजूनही तो दिवस आठवतोय.
५ नोव्हेंबर २0१३. श्रीहरिकोट्यामधल्या सतीश धवन केंद्रातून मंगळयानाचं लाँचिंग होणार होतं. देशातलेच नाही तर परदेशातलेही अनेक पत्रकार येऊन दाखल झाले होते. भारत मंगळावर यान पाठवतोय यावर अनेकांचा विश्वासही बसत नव्हता. बहुतांश परदेशी पत्रकांराच्या बातमीचा अँगलसुद्धा असाच की एकीकडे भारतात वीज सगळ्या गावात पोहोचलेली नाहीये, गरिबीचा प्रश्न सुटलेला नाहीये आणि तरी हे बघा, अंतराळ संशोधनावर इतके पैसे खर्च करताहेत. हा प्रकल्प यशस्वी होणारे का याबाबतचं प्रश्नचिन्हही त्यांच्या चेहर्यावर दिसत होतं. पण भारतीय शास्त्रज्ञ यासार्या शंकाकुशंकांना पुरून उरले.
यानाचं लॉँचिंग तर झालं. एक टप्पा तर पार पडला. पण पुढचा जवळपास दहा महिन्यांचा प्रवास मंगळयानाला करायचा होता. अंतराळातल्या अशा प्रवासाचा अनुभव भारताकडे अर्थातच नव्हता. पण सगळ्या शक्यता गृहीत धरल्या गेल्या होत्या. बॅकप प्लॅन तयार होते.
आणि २४ सप्टेंबर २0१४ रोजी हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावणार होतं. पहाटे तीन वाजल्यापासूनच नटूनथटून बरेच शास्त्रज्ञ (त्यात तरुण आणि महिला शास्त्रज्ञही होतेच) कंट्रोल रुममध्ये दाखल होत होते. समोर दिसणार्या प्रोजेक्शन्सवरून काय काय घडतयं याचा अंदाज तेही घेत होते. पहाटे सव्वाचार वाजता पहिली स्टेप पार पडली. त्यानंतर एक एक स्टेप पुढे सरकायला सुरुवात झाली. सगळ्यात महत्त्वाचं होतं इंजिन फायर होणं, यानाचा वेग कमी होणं, मात्र या सगळ्यावेळी पृथ्वीवर ग्रहणाचा कालावधी होता. म्हणजे नेमकं काय घडतंय याची काहीही माहिती सेण्ट्रल रुमला मिळणार नव्हती. या सगळ्या गडबडीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी कंट्रोल रुममध्ये दाखल झाले. टेन्शन सगळ्यांच्याच चेहर्यावर दिसत होतं. साडेसातच्या सुमारास माहिती मिळाली इंजिन व्यवस्थित फायर झाल्यामुळे यानाचा वेग मंदावला आहे. शास्त्रज्ञांनी प्रथेप्रमाणे टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. पण पुढचे महत्त्वाचे टप्पे बाकी होते. संपूर्ण कण्ट्रोल रुमच्या परिसरात माध्यमांचे प्रतिनिधी वगळता कोणाचाच आवाज नव्हता.
आणि अखेर शेवटी समजलं की, मंगळयान मंगळाच्या कक्षेमध्ये स्थिरावलं.
पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं ते खास त्यांच्याच शैलीत ‘मंगल को मॉम मिल गयी है ’
आणि तेवढय़ात या मॉमने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून बाळलीला दाखवायलाही सुरुवात केली. ‘आपण इथून कसा सेल्फी काढू शकत नाही. मला एक आरसा पाठवून द्या चटकन’ अशी मागणीही या मंगळयानाने केली. अर्थातच तरुण शास्त्रज्ञ ही गंमत करत होते. आणि मग एकदम शास्त्रज्ञ कण्ट्रोल रुममधून बाहेर आले ते आनंदाने घोषणा देतच. दहा महिन्यांचे खडतर परिश्रम सफल झाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. मेन कण्ट्रोल रुममधिल काही तरुण शास्त्रज्ञ बाहेर आली ती पंतप्रधानांचे ऑटोग्राफ हातात नाचवतच.
‘हमने पिछले कुछ महिनो से दिन रात मेहनत की है, मैने पीएम से बोला मेरा नाम कमलकिशोर है, मै कमल आप मोदी’ हसत हसत एक तरुण सांगत होता.
‘आता काय करणार?’ असं त्यांना विचारलं तसा एकजण म्हणाला, ‘ पिछले कुछ महिनों मे हमने दिनरात मेहनत की है, नाऊ इट्स टाइम फॉर सेलिब्रेशन.’
आणि मग ते सेलिब्रेशन सुरू झालं, इस्त्रोत.आणि सार्या देशातच.