- सुयोग जोशी
नाशिक जिल्ह्यातलं त्र्यंबकेश्वर तसं जगप्रसिद्धच. मात्र त्र्यंबकेश्वर सोडून साधारण 30 किलोमीटर वाघेरा गावाकडे निघालं की लागतो घाट. डोंगरवाटा अशा निमुळत्या नी खोल खोल की भीतीच वाटावी. दर्याखोर्यात लांबलांब वसलेले आदिवासी वाडे दिसतात. रणरणत्या उन्हात भकभकीत वातावरणात गाडी धावते तशी घशाला कोरड पडते. सगळा रखरखाट. वाघेरार्पयत पोहचता पोहचताच डोंगररस्ते दमछाक करतात, तिथून पुढं आणखी आत, डोंगराच्या पोटात एक छोटं पाडावजा गाव आहे. खरवळ.त्या खरवळ गावात जायचं होतं. तिथं भेटणार होता मनोहर.तो कोण?चारचौघांसारखाच एक आदिवासी पोरगा. साधासुधा. मनोहर गोपाळ हिलीम त्याचं नाव. एरव्ही त्याला कुणी पत्रकारानं भेटायला जावं असं काही नव्हतंही त्याच्या आयुष्यात. आता मात्र त्यानं कामच असं केलंय की, त्याला त्याच्या घरी जाऊन भेटावं आणि जमल्यास घेऊन यावी त्याच्याकडून हिमालयाएवढी उत्तुंग जिगर आणि जिद्द. त्या जिद्दीलाच भेटायला निघालो होतो तेव्हा या आदिवासी पाडय़ांत भेटली खरी झालेली काही स्वपA.आणि मनोहरच्या त्याच स्वपAाचं नाव होतं, मिशन शौर्य. त्या मिशनवर जाऊन तो माउण्ट एव्हरेस्ट सर करून आलाय. आश्रमशाळेत शिकणारा पोरगा मात्र थेट एव्हरेस्टवर चढून ते जिंकून आलाय.तोच नाही तर या मोहिमेत नाशिक जिल्ह्यातले एकूण तीन जण सहभागी झाले होते. मनोहर हिलीम, अनिल कुंदे आणि मनीषा गायकवाड. मिशन शौर्य अंतर्गत महाराष्ट्रातील आदिवासी भागातील 11 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातल्या नाशिक जिल्ह्यात राहणार्या या एव्हरेस्टवीरांना भेटायचं म्हणून ‘ऑक्सिजन’ने थेट त्यांच्या गावी, त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायचं ठरवलं.आणि पहिल्यांदा भेटला खरवळ गावचा मनोहर. तो वाघेर्याच्या महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळेत निवासी म्हणून राहतो. तिथं तो सध्या अकरावी सायन्सचं शिक्षण घेतोय. गावच्या वाटेवरच आश्रमशाळेत त्याची भेट झाली आणि त्याच्यासोबतच त्याच्या गावी निघालो. लांब 15 किलोमीटरचा डोंगराळ रस्ता. अत्यंत खडतर. संपूर्ण नागमोडी वाट. घाटात गाडी धावते तरी त्या वाटेवर पोटात भीतीचा गोळा येतो. खोल खोल दर्या अन् वळणावळणांचे रस्ते. रस्त्यावर अनेक ठिकाणी कैर्या, आंब्यांचे सडे पडलेले दिसतात. भर उन्हात काही आदिवासी तरुण जंगली रानमेवा करवंदं, जांभळं विकताना काही गोळा करताना दिसतात. डोंगराच्या कुशीत लपल्यासारखं खरवळ मग हळूहळू दिसायला लागतं. साधारण 50 - 60 घरं दिसतात. डोक्यावर पाणी वाहणार्या तरुणी आणि आयाबाया वणवणताना दिसतात, तेव्हाच गावचे पाण्याचे हाल कळतात.कळसूबाईच्या डोंगररांगात जगणारे हे तरुण मुलं. मात्र त्यांनी महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर असलेलं कळसूबाई कधी पाहिलं नव्हतं, एव्हरेस्टवर जाण्याचं स्वप्न ते काय पाहणार? मुळात असं काही असतं हेच त्यांना माहिती नव्हतं. तरीही ते एव्हरेस्टवर पोहचले, कसे याच प्रश्नाच्या शोधात तर या मुलांच्या गावात निघालो होतो.
मनोहर हिलीमभरदुपारी आम्ही मनोहरच्या घरी पोहोचलो. त्याच्या घराच्या बाहेर गोठा होता. मात्र त्यात एकच गाय आणि वासरू. तीन खोल्यांचं साधंसं कौलांचं आणि कुडाचं घर. घरी पाहुणे आले म्हणून घरातल्यांनी पटकन समोरच्या घरातून प्लॅस्टिक खुच्र्या धावत आणल्या. घरात माणसं खूप. मनोहरला तीन भाऊ आणि पाच बहिणी. मोठा कुटुंब कबिला आणि कमावणारे एकटे वडील. शेतीवर पोट. तेही पाऊस झाला तर. नागली, वरई, भात हे सारं पावसाच्या हवाल्यावर पिकतं. काहीच नसेल तेव्हा दुसर्याच्या शेतात जाऊन मोलमजुरी करतात सगळेच. मनोहरची आई मैनाबाई हिलीम. त्यांना माहिती होतंच, मनोहर एवढय़ा मोठय़ा मोहिमेवर गेला, बर्फाचा डोंगर चढायला गेला. त्या म्हणल्या खरं सांगते, मनोहर तिकडं गेला तर आम्हाला अन्नपाणी जात नव्हतं. मरणाशी झुंज दिलीना पोरानं ! तो परत आला याचाच आनंद मोठा आहे !’तो आनंद त्या आईबापाच्या डोळ्यात दिसतो. एव्हरेस्ट सर करणं, तो गौरव हे सारं त्यांना माहिती नव्हतंही; पण एक माहिती होतं की, आपलं पोरगं जिद्दीनं काम फत्ते करून आलं. मनोहरचे वडील तिसरी इयत्ता शिकलेत, ते सांगतात, ‘लहानपणापासून मनोहर सुसाट धावायचा. हुशार होता. त्यामुळं तो या स्पर्धेत यशस्वी होईल असं वाटत होतंच. तो हिमालयाच्या मोहिमेत भाग घ्यायला गेला तरी आम्ही बेफिकीर होतो. तशी काय काळजी नव्हती, पोरगं जिंकून येईल याची खातरीच होती.’ही खातरीच मनोहरची ताकद होती की काय न जाणो. पण साधेभोळे आईबाप मात्र निश्चिंत होते. अत्यंत कौतुकानं सांगत होते, मनोहरनं एव्हरेस्ट शिखर फत्ते केल्याचा निरोप गावात आला, तेव्हा गावात केवढा जल्लोष झाला. मनोहर परत आल्यावरही गावातून त्याची मोठी मिरवणूक काढण्यात आली.मुलानं एव्हरेस्ट सर केलं यापेक्षा मोठा आनंद गावकर्यांनी काढलेल्या मिरवणुकीचा होता. हे ग्लोबल-लोकल चित्र भारी बोलकं वाटलं.मनोहर आपल्या मोहिमेविषयी सांगतो, ‘एव्हरेस्टच्या वाटेवर जागोजागी अरुंद वाटा, मामुलीशी चूक मृत्यूकडे नेणार हे माहितीच होतं. बर्फाच्या कडे-कपार्यांमधील वर्षानुवर्षापासून पडलेले काही मृतदेह बघून प्रचंड भीतीही वाटली. पण मनात ध्येय होतं, शिखर गाठायचंच. त्यामुळं मागे हटण्याचा विचार मनात आला नाही, सावध; पण हिमतीनं चालत राहिलो. माझा मोठा भाऊ भागवत, त्यानं मला हे स्वप्न पाहण्याची, पुरी करण्याची ताकद दिली आणि आमचं प्रशिक्षणही सोबत होतं म्हणून हे जमलं ! परतीच्या प्रवासात अध्र्या रस्त्यात ऑक्सिजनच संपल्याने थोडे घाबरल्यासारखे झाले होते. परंतु स्वतर्ला सावरत मोहीम पूर्ण केली !’त्याच्या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक नितीन पवारही आपल्या विद्याथ्र्याचं आणि त्याच्या जिद्दीचं कौतुक करतात, त्याच्यामुळं आमच्या शाळेला नवीन ओळख मिळाली असं सांगतात.त्या वाटेवरचा प्रवास सुरू करणारे, या मिशनसाठी शाळेतून मनोहरची निवड करणारे प्रा. आत्माराम कोरडेही सांगतात की, मनोहर दररोज सकाळी 6 वाजता उठून रनिंग आणि व्यायामाचे प्रकार करतो. त्याचं सातत्य दांडगं आहे. शाळेने केलेली निवड त्यानं सार्थ ठरवल्याचा आनंद वाटतो. विशेष म्हणजे तो राज्यस्तरीय धावपटू आहे. उंचीवर चढण्यासाठी शरीराला ऑक्सिजन मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठीची व्हॅसिला व्हेसीन नावाची लस मनोहर आणि अनिल यांना देणारे हृदयाशी संबंधित सर्व चाचण्या करणारे डॉ. सुशील शेवाळेही या मुलांच्या फिटनेसचे आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या प्रय}ांचे कौतुक करतात. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे, सचिव सुधाकर साळी यासह आश्रमशाळेनं त्याचा आणि त्याच्या पालकांचा सत्कार केला, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतर् शाळेला पत्र लिहून अभिनंदन केलं याचाही शाळेला आनंद वाटला. शाळेला प्रथमच मुख्यमंत्र्यांचे पत्र आल्याचा वेगळाच आनंद आहे. यासार्या कौतुक कहाण्यात सापडतं एक सामूहिक स्वप्न . ते एव्हरेस्ट सर करण्यापुरतं मर्यादित नाही तर आपल्या मर्यादांच्या पलीकडचं आकाश कवेत घेण्यासाठीची एक झेप आहे. जी एकटय़ा मनोहरने नाही तर त्याच्या कुटुंबानं, शाळेनंही घेतलेली दिसते.***
अनिल कुंदेत्र्यंबकेश्वरपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर त्र्यंबक पिंप्री गावच्या रस्त्याच्या कडेला कुडाचं, जेमतेम कौलांचं असं एक इटुकलं घर दिसतं. ते अनिलचं घर. अनिल पांडुरंग कुंदे. घरात पाऊल ठेवावं तर गच्च अंधार. खिडकीच नाही तर त्या कुडाच्या भिंतीतून प्रकाशाची तिरीपही घरात येत नाही. आम्ही गेलो तसं त्याच्या वडिलांनी बाहेर अंगणातच घोंगडं टाकलं. तिकडं त्याच्या आईनं आल्या पाहुण्याला चहा तरी करायचं म्हणून चूल पेटवायला घेतली.घरात अंधार होताच आता धूरही कोंडला गेला. त्यात गप्पा रंगल्या. वडील अनिलविषयी मोठय़ा कौतुकानं सांगत होते. तो जवळच्या बोरीपाडा शासकीय आश्रमशाळेत शिकतो. यंदा अकरावी आर्ट्सला आहे. त्याला दोन भाऊ आणि तीन बहिणी. कुटुंब मोठं आणि परिस्थिती अगदीच जेमतेम. सगळी मदार शेतीत जे पिकेल त्यावरच. पावसाच्या पाण्यावर शेती. जेवढं पिकेल तेवढं आपलं असं जगणं. संसाराचा कसाबसा रेटा ढकलला जातो, तो ढकलावाच लागतो काय करणार, असं अनिलचे वडील सांगतात. त्यांना आनंद आहे की, अनिल एव्हरेस्ट नावाचं मोठं शिखर सर करून आला, एवढी मोठी कामगिरी केली, त्याच्या या कामाचं काही चीज व्हायला पाहिजे. ते म्हणतात, ‘त्याला शासनाने नोकरी, आर्थिक मदत केली तर खूप बरं होईल !’त्याच्या आईचं, पुणाबाईचंही हेच मत. आपल्या पोरानं जीव धोक्यात घालून एवढं मोठं शिखर सहन केलं याचा आनंद त्यांना आहेच. मात्र घरची परिस्थिती इतकी हलाखीची की त्या सहज सांगतात, ‘आमच्या पोरानं एवढा उंच शिखर सर केला, त्याच्या कामाची शासनाने दखल घ्यायला हवी, त्याला मदत दिली तरच आमच्याही पोटापाण्याचा प्रश्न मिटेल !’ पावसाच्या पाण्यावर नागली, वरई, भात पिकवून लेकरांचं पोट भरणारं हे साधंसं कुटुंब. एव्हरेस्ट सर केल्याचा तामझाम त्यांच्या बोलण्यात कसा येईल? त्या एव्हरेस्टहून मोठय़ा समस्या त्यांच्यासमोर उभ्या आहेत, त्या परिस्थितीच्या. त्यामुळं त्याच्या लेकाच्या यशाचं कौतुक मोठं असलं तरी त्यांच्या बोलण्यात त्याच्या भवितव्याची काळजी दिसते. अनिलच्या गावातही तो एव्हरेस्ट मोहीम फत्ते करून आल्याचं कुणाला फारसं माहिती नाही. सारा गावच असा विवंचनेत जगणारा. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस.बी. तमखाने आणि अश्विनकुमार घाटे यांना मात्र अनिलच्या क्षमतेवर विश्वास होता. त्यांच्या शाळेला अनिलच्या कामगिरीमुळं थेट मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवलं याचा आनंद त्यांच्या बोलण्यात जाणवत राहतो.अनिल सांगतो, ‘एव्हरेस्टच्या चढाईपेक्षा परतीचा प्रवास जास्त खडतर ठरला. शारीरिक श्रमामुळे येताना आम्ही प्रचंड दमलो होतो, थकवा होता. निसर्गाच्या बदलात प्रचंड शक्तिशाली रूप दिसत होतो. तोल जाऊ न देता आम्हाला धीर धरून खाली यायचं होतं. पायाखाली ओढ होती, खाली खेचले जात होतो. या सगळ्या प्रवासात महत्त्वाची होती शेर्पाची साथ. देवदूतांसारखे शेर्पा, त्यांची खूप मदत झाली.’
*****
हेमलता गायकवाड
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुका. विकासापासून काहीसा दूर, आदिवासी भाग. या सुरगाणा तालुक्यातल्या हस्ते गावची ही तरुणी हेमलता अंबादास गायकवाड. एवढुशी मुलगी. कुणाला खरं वाटणार नाही की ही मुलगी एव्हरेस्ट सर करून आली. मात्र तिच्याशी बोलतानाच जाणवते तिच्यातली आग आणि झुंजायची धमक. दोन भाऊ, आई-वडील आणि ती असं तिचं कुटुंब. कुडाचं घर आणि मातीच्या भिंती. झोपडीवजाच साधं घर. परिस्थिती बेताचीच. थोडय़ाफार शेतीवर कुटुंबाची गुजराण कशीबशी होते. कारण पाण्याची समस्या मोठी आहे. पाणीच नसल्यानं पावसाच्या पाण्यावरच शेती होते. पावसानं धोकाच दिला तर मात्र मोलमजुरीशिवाय दुसरा पर्याय नसतो. तिची आई सुमन आणि वडील अंबादास गायकवाड दिंडोरी तालुक्यात मग शेतमजुरीसाठी जातात. मात्र मुलांनी शिकावं असं त्यादोघांना खूप वाटतं. वडिलांनी हेमलताला भेभुसावरपाडा या आश्रमशाळेत शिक्षणासाठी पाठवलं. ती सध्या बारावी सायन्समध्ये शिकतेय. लहानपणापासूनच ही मुलगी हुशार. खो-खो छान खेळते. खो-खोच्या स्पर्धेत एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पाच वेळा तिनं राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेत. याच वाटेवर तिनं एक महत्त्वकांक्षी स्वपA पाहिलं. एव्हरेस्ट मोहिमेवर जाण्याचं स्वप्न . या मोहिमेसाठी आपली निवड व्हावी म्हणून तिनं कसोशीने प्रय} केले. अविनाश देवस्कर, क्रीडाशिक्षक निवृत्ती लांडगे यांनीही तिच्या स्वप्नावर विश्वास ठेवला. तिनं मदत-मार्गदर्शन केलं.मिशन शौर्यसाठी निवड तर झाली मात्र त्यानंतर वर्धा, हैदराबाद, दार्जिलिंग, सिक्किम, लडाख याठिकाणी खडतर प्रशिक्षण या मुलांना देण्यात आलं. हेमलता सांगते, ‘त्या प्रशिक्षणातूनच खूप काही शिकायला मिळालं. आम्हा आदिवासी मुलांमध्ये उत्साह होताच, मात्र उत्तम आत्मविश्वास निर्माण झाला. आम्हाला वाटलं की, हे स्वप्न आपण नक्की पूर्ण करू ! आणि ते आम्ही केलंच!’
(सुयोग लोकमतच्या नाशिक आवृत्तीत उपसंपादक आहे)