'न्यू मी' चा अर्थ यंदा सापडेल का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 07:59 AM2021-01-07T07:59:40+5:302021-01-07T08:00:37+5:30
न्यू मी असं आता अनेक जण म्हणतात, त्या न्यू मी चा अर्थ २०२१ मध्ये कदाचित सापडेलही!
‘न्यू मी’, ‘न्यू ईअर, न्यू मी’ असं म्हणत अनेकांनी नव्या वर्षाच्या पोस्टस् टाकल्या. खरं तर हे ‘न्यू मी’ नवीन वर्षामुळे नव्हे, तर लॉकडाऊनमुळे निर्माण झालं. २०२० मध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच स्वत:ला नव्यानं शोधलं. त्याला तरुण मुलं आणि टीनएजर्स तरी कसे अपवाद असतील? नवीन नाती जोडली. काही तोडली; पण स्वत:सोबतचं नातं मात्र फुलवलं. काहींचे ब्रेकअप झाले. काहींना ऑनलाइन डेटिंगचा अनुभव आला. स्क्रीन जरा बाजूला ठेवून वर्क फ्रॉम होम असलेल्या पालकांशी गप्पा मारल्या. अर्थात ऑनलाइन क्लासमुळे स्क्रीन काही दूर राहू शकला नाही; पण हे सारं होता होता न्यू नॉर्मलही ‘न्यू’ राहिलं नाही. पीडीएफरूपात गृहपाठ, फेसटाइमवर सोबत कॉफी पिणं आणि अंगाचा सॅनिटायझरसारखा येणारा वास हे सारं आता न्यू नॉर्मलमध्ये मोडतं; पण असं असलं तरी २०२१ कडून तरुणांच्या फार अपेक्षा आहेत.
१. काही अपेक्षा तर प्रॅक्टिकलच आहेत, लसीकरण व्हावं, ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारावी, कॉलेज सुरू व्हावेत.
२. टीएनजर्स आता मॅच्युअर्ड ॲडल्टस्प्रमाणे वागू लागलेत. काहींना लव्ह अफेअर्स बालिश वाटू लागले, तर काहींना ते ही करून पाहूच पुन्हा असं वाटू लागलंय.
३. दोस्तांमध्ये खरे दोस्त कोण, लांबचे असलेले बरे कोण हे ही समजू लागलं आहे.
४. या बदलणाऱ्या नात्यांवर २०२१ वर्षात टीनएजर्सचं आयुष्य विणलं जाणार आहे.
५. काहीजण प्रॅक्टिकलही झालेत आणि ढासळलेल्या अर्थकारणात आपलं काय होणार, याचा विचारच नाही तर चिंताही करू लागले.
६. कॉलेज बंद असल्याची मजा आता वाटत नाही, करिअरचं काय होणार, हा मोठा प्रश्न आहे.
७. उठसूट प्रेमात पडणारेही आता कमी झाले. लव्ह अफेअरसाठी केवळ ॲट्रॅक्शन नाही, तर मॅच्युरिटी असावी लागते, हे समजलंय.
८. पालकांकडे केवळ पालक म्हणून न पाहता एक दोस्त म्हणूनही काही जण पाहू लागलेत.
९. बदलत्या ट्रेंडमध्ये ॲडजस्ट करण्याची सवय आता अनेकांनी लावून घेतली आहे.
१०. २०२१ मध्ये अनेक अर्थांनी ‘न्यू मी’ दिसून येणार आहेच, पण न्यू नॉर्मलची व्याख्याही बदलत राहणार आहे.