पंढरीत दुपारपर्यंत कडकडीत बंद
By admin | Published: June 13, 2014 01:24 AM2014-06-13T01:24:00+5:302014-06-13T01:24:00+5:30
दुपारी दुकाने उघडली; शहरातील व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद
पंढरपूर : एकापाठोपाठ दोन रविवारी महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या महापुरुषांच्या छायाचित्रांमध्ये बदल करून आक्षेपार्ह छायाचित्र सोशल नेटवर्क साईटवर अपलोड केल्याने पंढरपूर शहर बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, काही लोकांनी दुकानांवर दगडफेक करून लाखो रुपयांचे नुकसान केले. यामुळे पंढरपूर व्यापारी महासंघाने गुरुवारी बंद पुकारला होता. दुपारपर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन कडकडीत बंद पाळला. दुपारनंतर व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झाले.
१ जून रोजी सोशल नेटवर्क साईटवर महापुरुषाचे आक्षेपार्ह छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. यामुळे शिवभक्तांसह विविध संघटनांच्या वतीने बंद पुकारण्यात आला. या बंदला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. तरीही समाजकंटकांनी व्यापाऱ्यांच्या बंद दुकानांवर दगडफेक करून लाखो रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर दुसऱ्या रविवारी पुन्हा असाच प्रकार झाल्याची वार्ता समजताच भीमसैनिकांनी पंढरीत बंद पुकारला. या बंदलाही व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असतानाही काही जणांनी दुकानाच्या बाहेर असलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात नासधूस करून त्याचे नुकसान केले.
यामुळे पंढरपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण भट्टड, उपाध्यक्ष संजय भिंगे, दीपक शेटे, रा. पां. कटेकर, सत्यविजय मोहोळकर, कौस्तुभ गुंडेवार, नंदकुमार कटप, पद्मकुमार गांधी, इकबाल बागवान, राजेंद्र नवाळे, संतोष कंबीरे, सोमनाथ डोंबे, शैलेश बडवे यांनी गुरुवारी पंढरपूर बंद पुकारला होता. याला पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
दुपारी चार वाजल्यानंतर सर्वांनी आपली दुकाने उघडण्यास सुरुवात केली. यामध्ये विठ्ठल मंदिर परिसरातील दुकाने, स्टेशन रोडवरील दुकाने, संत रोहिदास मार्गावरील दुकाने उघडण्यात आली होती. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ, नगरसेवक नामदेव भुईटे उपस्थित होते.
----------------------------------
व्यापारी संघात दोन गट
व्यापारी संघाने कोणत्याही राजकीय नेत्याला सोबत घेऊन बंद करायचा नाही, असे ठरविले होते. परंतु माजी आ. सुधाकरपंत परिचारक, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी भाषण केले. ८ जून रोजी आ. भारत भालके यांना व्यापाऱ्यांनी बोलू दिले नव्हते. यावरुन राजकीय नेत्यांना बोलवायचे नाही, असे ठरले असताना परिचारक आल्याने व्यापारी संघातील व्यापाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला. त्यामुळे यात दोन गट पडले आणि काहींनी दुकाने चालू ठेवण्याचे आवाहन करून दुकाने सुरूच ठेवली.