परभणी: कुष्ठरोग शोध मोहिमेंतर्गत आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत ३४६ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यात १५ जणांना कुष्ठरोग असल्याचे निदान झाल्याची माहिती कुष्ठरोग सहायक संचालक डॉ.विद्या सरपे यांनी दिली.
जिल्ह्यात सक्रिय कुष्ठरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण मोहीम राबविली जात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाभर फिरून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची शारीरिक तपासणी करण्यात येत आहे. त्यात लक्षणे आढळल्यास या रुग्णांची कुष्ठरोगाच्या अनुषंगाने तपासणी केली जात आहे.
या मोहिमेंतर्गत फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ७७ हजार ८४२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६२१ संशयित रुग्ण आढळले होते. संशयित असलेल्या रुग्णांपैकी ३४६ जणांची कुष्ठरोग तपासणी करण्यात आली. तेव्हा ११ जणांना संसर्गिक तर चार जणांना असंर्गिक कुष्ठरोग असल्याचे स्पष्ट झाले. या १५ रुग्णांवर कुष्ठरोग विभागात उपचारही सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांनी कुष्ठरुग्ण शोध मोहिमेत सहभाग नोंदवून ााशारीरिक तपासणी करून घ्यावी, तसेच लक्षणे आढळल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात पुढील तपासणी करावी, असे आवाहन सहायक संचालक डॉ.विद्या सरपे यांनी केले आहे.
अशी आहेत कुष्ठरोगाची लक्षणे
त्वचेवर फिकट लालसर बधिर चट्टा असणे, चट्ट्यावरील त्वचा जाड होणे, चेहऱ्याची चकाकी अथवा तेलकट त्वचा, त्वचेवर गाठी येणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, डोळे पूर्णत: बंद न होणे, नाकाचे हाड बसणे, हातापायाला मुंग्या येणे, त्वचेवर थंड किंवा गरम संवेदना न जाणवणे, हात व पाय बधिर होणे, अशक्तपणा येणे, हातापायाची बोटे वाकडी होणे, बोटांना जखमा होणे ही लक्षणे कुष्ठरुग्णांची आहेत. अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी स्वत:हून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वर्षभरापासून शोध मोहीम
आरोग्य विभागाच्या वतीने मागील एक वर्षापासून जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत कुष्ठरुग्ण विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्यसेवक आणि सेविकांची मदत घेतली जात आहे. ग्रामीण भागात, तसेच शहरी भागातही या आजाराच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जात आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात कुष्ठरोग निदान होण्याचे प्रमाण वाढले आहे. कुष्ठरोग हा बरा होणारा आजार असून, रुग्णांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.