परभणी : शेतीच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणात परभणी येथील न्यायालयाने २२ जणांना वेगवेगळ्या कलमांखाली दोन महिने कारावासाची शिक्षा आणि ६३ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. १४ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा निकाल सुनावला.
पार्डी (ता. मानवत) येथे शिवाजी दौलत खराबे व त्रिंबक रामराव खराबे यांच्यात शेतीचा वाद होता. यातून २ आॅक्टोबर २०११ रोजी दोन्ही गटात हाणामारी झाली होती. या प्रकरणी शिवाजी दौलत खराबे यांनी मानवत ठाण्यात तक्रार नोंदविली होती. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर परभणी येथील चौथे सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. साक्षी, पुराव्यांती २२ आरोपींना कलम १४८ अंतर्गत १५ दिवसांची शिक्षा आणि ५०० रुपये दंड, कलम ३२३ अंतर्गत १५ दिवसांची शिक्षा आणि ५०० रुपये आणि कलम ३२४ अंतर्गत एक महिना शिक्षा आणि २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणातील रामराव वामनराव खराबे हे मयत झाले आहेत. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी वकील अभिलाषा पाचपोर यांनी बाजू मांडली.
यांना झाली शिक्षान्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या आरोपींमध्ये सटवा रावण सौदागर, वन्या पनेश चव्हाण, सुरेश सूर्यभान चव्हाण, जेकर्ण्या गाखेल चव्हाण, जनाबाई तानाजी गोरे, लक्ष्मीबाई सटवाजी सौदागर, राजामती किसन नितनवरे, कमलाबाई जगन चव्हाण, रेणुका जकरण्या चव्हाण, जयाबाई ऊर्फ लता पनेश चव्हाण, जगन चव्हाण, देवीदास रामराव खराबे, संतोष शामराव खराबे, गंगाधर रामराव खराबे, भानदास रामराव खराबे, रामराव वामनराव खराबे, दिगंबर त्र्यंबक खराबे, जगन गंगाधर खराबे, किशन वामन खराबे, दत्ता किशन खराबे आणि छत्रगू भानुदास खराबे, त्र्यंबक रामराव खराबे यांचा समावेश आहे.