लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनात समन्वय नसल्याने कोरोना संसर्ग वाढत असून, मागील २३ दिवसांमध्ये तब्बल १५ हजार ११६ नव्या रुग्णांची भर पडली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १ एप्रिलपासून संचारबंदी लागू केली. या काळात अत्यावश्यक सेवेत असलेल्या नागरिकांनाच घराबाहेर पडण्याची मुभा दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत. कारण नसतानाही रस्त्यांवरून फिरणार्या नागरिकांना कोणीही अडवत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन संचारबंदीचे आदेश काढून मोकळे झाले; परंतु त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र गप्प आहे. ज्या उद्देशाने संचारबंदी लागू केली, तो उद्देश अजूनही साध्य झालेला नाही. उलट संचारबंदी काळातच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे.
संचारबंदी कळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. मात्र, घराबाहेर का फिरत आहात, याची साधी विचारणाही होत नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे रस्त्यांवर फिरत आहेत. भाजी विक्रीची दुकाने बंद असतानाही मुख्य रस्ते वगळता इतर रस्त्यांवर सर्रास भाजीविक्री होत आहे. त्यामुळे जी गर्दी व्हायची ती होतच आहे. केवळ आदेश काढून प्रशासन मोकळे झाले आहे; परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने विपरित परिणामांना सामोरे जावे लागत आहे.
३० मार्चपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १४ हजार ८५७ एवढी होती; परंतु १ ते २३ एप्रिल या २३ दिवसांमध्ये १५ हजार ११६ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २९ हजार ९७१वर पोहोचली. संसर्ग कमी व्हावा, या उद्देशाने संचारबंदी लागू करण्यात आली; परंतु त्याउलट संचारबंदी काळातच रुग्णसंख्या वाढली आहे.
२३ दिवसांत ३३१ मृत्यू
संचारबंदी काळातील २३ दिवसांमध्ये ३३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा संसर्ग किती गंभीर रूप धारण करत आहे, हे लक्षात येते; परंतु नागरिक त्याला गांभीर्याने घेत नाहीत. ३० मार्चपर्यंत जिल्ह्यात ४२३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. २३ एप्रिलपर्यंत ही संख्या ७५४वर पोहोचली आहे.