पाथरी (परभणी ) : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर ग्राहकाने लावलेल्या मोपेडच्या डिक्कीतून २५ हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि.२५ ) घडली. याप्रकरणी गुरुवारी रात्री अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नारायण सुरवसे ( रा. सागर कॉलनी, देवनांदरा ) हे शहरात एका संस्थेत वसुली प्रतिनिधी म्हणून काम करतात. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ते स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत दुचाकीचा हफ्ता भरण्यासाठी आले. यावेळी त्यांनी आपली मोपेड बँकेसमोर लावली. मात्र, बँकेची इंटरनेट सेवा बंद असल्याने सुरवसे त्यांच्या मित्राच्या दुकानावर गेले. येथे त्यांनी पासबुक ठेवण्यासाठी मोपेडची डिक्की उघडली असता त्यात ठेवलेले २५ हजार रुपये लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात अज्ञात दोघांनी डिक्की उघडून त्यातून पैसे काढल्याचे लक्षात आले. यावरून सुरवसे यांनी त्याच दिवशी पोलीस स्थानकात तक्रार दिली.