संचारबंदीच्या काळात २६ हजार पॉझिटिव्ह; कडक अंमलबजावणी नसल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:27 AM2021-05-05T04:27:51+5:302021-05-05T04:27:51+5:30
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ ...
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ मार्चपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संचारबंदीची मुदत वाढवण्यात आली. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेनंतर राज्य शासनानेच संचारबंदी लागू केल्याने रुग्णासंख्येत घट होईल, असा सर्वसामान्यांचा समज होता. प्रत्यक्षात यासंदर्भातील आकडेवारीचा आढावा घेतला असता रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २२ मार्च २०२० ते २४ मार्च २०२१ या १ वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात फक्त १२ हजार २५८ रुग्ण आढळले होते. त्यापैकी १० हजार ६२३ जणांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर २५ मार्च ते ४ मे या कालावधीत जिल्ह्यात तब्बल २६ हजार १८० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १९ हजार ५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्याची काटेकोर अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आली होती. आता ४० दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी कडकडीत अंमलबजावणीला खो देण्यात आला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे पहिल्या टप्प्यात प्रभावी काम झाले होते. दुसऱ्या टप्प्यात याबाबीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही.
दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा विषाणू जास्त घातक आहे. त्यामुळे त्याचा संसर्ग अधिक वेगाने होत आहे. परिणामी, संपूर्ण कुटुंबच कोरोनाबधित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
ग्रामीण भागांत रुग्ण वाढले, कारण?
पहिल्या टप्प्यात कोरोनाचा ग्रामीण भागात अधिक फैलाव झाला नव्हता. जिल्ह्यातील ८४८ गावांपैकी ३८४ गावांमध्ये कोरोना पोहोचला नव्हता. दुसऱ्या टप्प्यात मात्र प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी ग्रामपातळीवत प्रभावीपणे झाली नाही. परिणामी, पहिल्या टप्प्यात कोरोनापासून दूर राहिलेल्या २०९ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचे संख्य झपाट्याने वाढली.