जिल्ह्यात २६९ ॲक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:17 AM2021-03-08T04:17:31+5:302021-03-08T04:17:31+5:30
परभणी : ‘सहा दिवसांत २९२ रुग्ण; उपचार घेणारे मात्र ११७’ या मथळ्याखाली ''लोकमत''ने वृत्त प्रकाशित करताच आरोग्य विभागाने रविवारी ...
परभणी : ‘सहा दिवसांत २९२ रुग्ण; उपचार घेणारे मात्र ११७’ या मथळ्याखाली ''लोकमत''ने वृत्त प्रकाशित करताच आरोग्य विभागाने रविवारी रुग्णांची माहिती संकलित केली असून, जिल्ह्यात २६९ रुग्ण ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र कमी असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर ''लोकमत''ने मागील ६ दिवसांमधील रुग्णसंख्येचा आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आढावा घेतला. सहा दिवसांत २९२ रुग्णांची नोंद झाली असताना, उपचार मात्र केवळ ११७ रुग्णांवरच होत असल्याचे आरोग्य विभागाने दैनंदिन प्रेसनोटद्वारे स्पष्ट केले होते. त्यामुळे उर्वरित १७५ रुग्ण गेले कुठे? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने ॲक्टिव रुग्णांचा शोध घेतला. त्यात जिल्ह्यात २६९ रुग्ण असून, त्यापैकी ७४ रुग्ण शासकीय संस्थांमध्ये, ६३ खासगी आरोग्य संस्थांमध्ये, तर १२९ रुग्ण त्यांच्या घरीच उपचार घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, तीन रुग्णांवर त्यांच्या शेतामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर दैनंदिन प्रेसनोटमध्ये मात्र रुग्णांची संख्या कमी का दाखवली जात आहे? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
शहरी भागात २०३ रुग्ण
जिल्ह्यात शहरी भागामध्ये २०३ रुग्णांवर उपचार सुरू असून, ग्रामीण भागात ६६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. परभणी महानगरपालिकेच्या हद्दीत सर्वाधिक १३४ रुग्ण उपचार घेत आहेत; तर सेलू शहरातही २२ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
अक्टिव्ह रुग्णांची तालुकानिहाय संख्या
जिंतूर ३१
पाथरी १४
सेलू २६
पालम ८
सोनपेठ १०
परभणी ग्रामीण १९
मानवत ९
पूर्णा ११
गंगाखेड ७
परभणी मनपा १३४