जिल्ह्यात ३ हजार ४४१ महिला निवडणुकीच्या रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:51 AM2021-01-08T04:51:50+5:302021-01-08T04:51:50+5:30
जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत एकूण ९ हजार ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ...
जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत एकूण ९ हजार ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामध्ये ३ हजार ४४१ महिलांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे ५६६ पैकी २८३ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदी महिलांची निवड निश्चित आहे. याशिवाय खुल्या प्रवर्गातही काही ठिकाणी सरपंचपदी महिलांची वर्णी लागू शकते. त्यामुळे निवडणूक निकालानंतर जवळपास ३०० महिलांना सरपंचपदाचा बहुमान मिळू शकतो. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सद्यस्थितीत महिलांचा बोलबाला दिसून येत आहे.
सद्यस्थितीत पुरुषांच्या बरोबरीनेच महिला निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्या आहेत. यामध्ये मतदारभेटी, काॅर्नर बैठका आदींमध्ये या महिला उमेदवारांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे. विशेष म्हणजे विविध राजकीय पक्ष्यांनी खुल्या जागेवर महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय मतपेटीवर डोळा ठेवून घेतल्याचे दिसून येत आहे.
गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक महिला उमेदवार
गंगाखेड तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. या तालुक्यात २२२ प्रभाग असून त्यातील १० ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. तालुक्यात एकूण १ हजार ८२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये ६७३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी सरपंचपद राखीव झाले आहे. त्यामुळे या तालुक्यात महिलांचा बोलबाला दिसून येत आहे.
८९५ जागा महिलांसाठी आरक्षित
जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत एकूण १ हजार ७८९ प्रभागांमध्ये निवडणूक होत आहे. राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू केल्याने ८९५ प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. याशिवाय ५६६ पैकी २८३ ग्रामपंचायतीचे सरपंचपदही विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले आहे.