जिल्ह्यात जायकवाडी प्रकल्पाच्या पैठण डावा कालव्याअंतर्गत चाऱ्यांची कामे निकृष्ट दर्जाची केली असून, कालव्यातील झाडेझुडपे काढण्यात न आल्याने शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत जानेवारी २०२० मध्ये विभागीय आयुक्तांकडे शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे, अशी तक्रार आ. बाबाजानी दुर्राणी यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. याप्रकरणी गेल्या ३ वर्षांत चाऱ्या दुरुस्तीवर ६४ कोटी रुपयांहून अधिकचा खर्च होवूनही कॅनॉलची सुस्थिती नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदार, अधिकारी व इतर यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आ.दुर्राणी यांनी पाटील यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आ. दुर्राणी यांना लेखी स्वरुपात उत्तर दिले आहे. त्यामध्ये जायकवाडी प्रकल्पाचा पैठण डावा कालवा १२२ ते २०८ कि.मी. परभणी जिल्ह्यात येत असून, २०१९-२० मध्ये यांत्रिक विभागाकडून एकूण २० सयंत्रे मागवून कालवा व त्याच्या वितरिकेतील गाळ काढणे, झाडेझुडपे काढणे ही कामे करण्यात येवून मागणीप्रमाणे शेवटच्या भागातील शेतकऱ्यांसह सर्व लाभधारकांना पाणी पुरवठा करण्यात आला आहे. २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षांच्या कालावधीत पैठण डावा कालवा कि.मी. १२२ ते २०८ मधील नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी पाणीपट्टी वसुलीच्या निधीतून ३ कोटी ८७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे मंत्री पाटील यांच्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
प्रत्यक्ष पाहणीत दुरुस्तीला खो
जायकवाडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी कागदी मेळ बसवून चाऱ्या दुरुस्त केल्याची माहिती मंत्र्यांसमोर मांडली असली तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील चाऱ्यांची दुरुस्तीच केली नसल्याची बाब ११ डिसेंबर रोजी सदरील प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत समोर आली होती. १२ डिसेंबर रोजीही दुपारी ४ च्या सुमारास पूर्णा तालुक्यातील ताडकळस परिसरातील चाऱ्यांची पाहणी केली असता तेथेही चाऱ्यांची दुरुस्ती केली नसल्याचे समोर आले आहे.