परभणीत ४३० खाटांच्या रुग्णसेवेला मिळणार बळ; १०८६ पदे भरण्यास मिळाली मान्यता
By मारोती जुंबडे | Published: December 5, 2023 07:02 PM2023-12-05T19:02:55+5:302023-12-05T19:03:10+5:30
परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू व्हावे, यासाठी परभणीकरांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यास यशही मिळाले.
परभणी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाले. मात्र वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरू करण्यात आलेल्या ४३० खाटांच्या रुग्णालयाकरिता आवश्यक पद निर्मितीची गरज होती. याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने ४ डिसेंबर रोजी एका शासन निर्णयाद्वारे १०८६ पदे भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुसज्ज झाले आहे.
परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू व्हावे, यासाठी परभणीकरांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यास यशही मिळाले. सध्या या महाविद्यालयात १०० विद्यार्थी प्रवेशित झाले असून महाविद्यालय सुरळीत सुरू आहे. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्नित असलेल्या रुग्णालयासाठी आवश्यकता असलेले १०८६ पदे निर्मिती करणे व भरण्यास शासनाने मान्यता देणे आवश्यक होते. परंतु, यासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळासाठी केवळ शासन आदेश काढण्यासाठी कानाडोळा केला जात होता. त्यामुळे ही पदे कधी भरली जाणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने याकडे लक्ष देऊन तत्काळ पदांची भरती करावी, अशी मागणी जिल्ह्यातून वारंवार करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने ४ डिसेंबर रोजी एका शासन निर्णयद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परभणी येथे सुरू करण्यात आलेल्या ४३० खाटांच्या रुग्णालया करता आवश्यक पद निर्मिती बाबत शासन निर्णय काढला. यामध्ये गट अ ते गट ड मध्ये एकूण १०८६ पदे निर्मिती करण्यास व भरण्यास मान्यता दिली. विशेष म्हणजे त्यासाठी १०९.१९ कोटी इतक्या अंदाजित खर्चास परवानगीही देण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुसज्ज झाले आहे.
अधिपरिचारिका, परिसेविकांची आहेत ४२५ पदे
परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित असलेल्या रुग्णालयासाठी राज्य शासनाने ४ डिसेंबर रोजी १०८६ पदांसाठी मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे या पदांमध्ये अधिपरिचारिकांसह इतर ४२५ पदे आहेत. त्याचबरोबर तंत्रज्ञ, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वैद्यकीय अधीक्षक, कार्यालयीन अधीक्षक यासह इतर पदांचा समावेश आहे. या उपलब्ध होणाऱ्या मनुष्यबळामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना उपचार करताना अधिक सुलभ होणार आहे.
‘लोकमत’ कडूनही पाठपुरावा
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर या महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी लागणाऱ्या १०८६ पदासाठी राज्य शासनाने शासन निर्णय काढणे गरजेचे होते. त्यासाठी ‘लोकमत’ कडून वारंवार पाठपुरावाही करण्यात आला. १८ ऑक्टोंबर २०२३ रोजी ‘‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय सुरू झाले हो, मात्र ही पदे भरणार केव्हा’’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर राज्य शासनाकडून पावले उचलण्यात आली. ४ डिसेंबर रोजी १०८६ पदासाठीचा शासन निर्णय सरकारने काढला.
लवकरच पदे भरली जाणार
‘‘मागील सहा महिन्यापासून राज्य शासनाकडे ही पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीनंतर जिल्ह्यातील रुग्ण सेवेला जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी हा शासन निर्णय परभणीकरांसाठी महत्त्वाचा आहे. आगामी काळात दर्जेदार वैद्यकीय सेवेसाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. लवकरच ही पदे भरली जाणार आहेत.
- डॉ. शिवाजी सूक्रे, अधिष्ठाता