एका वर्षात ७ मृत्यू, तर शेकडो जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:31 AM2020-12-14T04:31:32+5:302020-12-14T04:31:32+5:30

मानवत : मानवत रोड ते पाथरीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची संख्या वाढली असून, शहराजवळ असलेल्या रत्नापूर येथे नागमोडी वळणामुळे ...

7 deaths and hundreds injured in one year | एका वर्षात ७ मृत्यू, तर शेकडो जखमी

एका वर्षात ७ मृत्यू, तर शेकडो जखमी

Next

मानवत : मानवत रोड ते पाथरीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची संख्या वाढली असून, शहराजवळ असलेल्या रत्नापूर येथे नागमोडी वळणामुळे वाहन चालविणे धोकादायक झाले असून, मागील वर्षभरात ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, शेकडो प्रवासी जायबंदी झाले आहेत.

तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग ६१ जातो. तीन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील गढी ते मानवत रोडपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग हैदराबाद, नांदेड, परभणी शहरासह पुणे, मुंबई मार्गाला जोडणारा आहे. त्यामुळे वाहन चालक या रस्त्याला प्राधान्य देत असल्याने या रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. पाथरी ते मानवत रस्त्यावर रत्नापूर गावाजवळ या राष्ट्रीय महामार्गावर नागमोडी वळण आहे. हे वळण अपघात प्रवण क्षेत्र झाले असून, २६ जुलै २०१९ रोजी याच ठिकाणी दुचाकीवरून जात असलेल्या मिहलेला ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाला होता. जून २०१९ मध्ये चालत्या ट्रॅव्हल्समधून पडून एका मुलीचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर २०१८ मध्ये बसने धडक दिल्याने एका तलाठ्याचा मृत्यू झाला होता. गतवर्षी रत्नापूर येथे लग्न सोहळा सुरू असताना खाजगी बस लग्न सोहळ्यात घुसल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले होते. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही. त्याचबरोबर मानवत येथे लग्नासाठी जात असताना पोहेटाकळीवरून आलेल्या वऱ्हाडाचे वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात जखमींची संख्या जास्त होती. हे सर्व अपघात रत्नापूरजवळ ५०० मीटर अंतरावर घडले आहे. ११ डिसेंबर रोजी शहरातील बुद्धनगर येथील ३७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. त्यामुळे हा गुळगुळीत रस्ता मृत्यूस्थळ बनत आहे.

ट्राॅमा केअरची गरज

पाथरी ते कोल्हा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अपघाताची संख्या वाढली आहे. मात्र पुरेशा वैद्यकीय सुविधांअभावी या अपघातांमधील जखमींची हेळसांड होत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना नाहक जीवही गमवावा लागतो. त्यामुळे मानवत येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात ट्रॉमा केअर सेंटर उभारणीची मागणी जोर धरू लागली आहे.

स्पीड ब्रेकर्सची आवश्यकता

पाथरी ते मानवत रस्त्यावर कुठेही स्पीड ब्रेकर्स उभारण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवणे अवघड झाले आहे. रत्नापूरजवळ स्पीड ब्रेकर्स उभारावेत, अशी मागणी अनेक वेळा ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, मागणीकडे दुर्लक्ष होत असून, अपघाताची संख्या वाढल्याने ग्रामस्थांसह या रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: 7 deaths and hundreds injured in one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.