जिल्ह्यातील ८४८ गावे दुष्काळाच्या बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:51 AM2021-01-08T04:51:45+5:302021-01-08T04:51:45+5:30
परभणी : जिल्ह्यातील ८४८ गावांमधील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने १५ डिसेंबर रोजी जाहीर केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ...
परभणी : जिल्ह्यातील ८४८ गावांमधील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने १५ डिसेंबर रोजी जाहीर केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ८४८ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा अधिक आली आहे. त्यामुळे यावर्षी जिल्हा दुष्काळाच्या बाहेर आल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील ८४८ गावांमध्ये ५ लाख ५९ हजार ६८५ हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी उपयुक्त आहे. त्यापैकी ५ लाख ३८ हजार २०५ हेक्टर क्षेत्रावर २०२०- २१ या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. यामध्ये कापूस, सोयाबीन, उडीद, मूग व तूर पिकांची लागवड केली. जूनपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत समाधानकारक असलेल्या पावसाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत हाहाकार माजविला. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्टोबरअखेरपर्यंत ९४१ मि.मी. पाऊस झाला.
या पावसाने खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्याची खरी हंगामातील अंतिम पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली असून जिल्हा प्रशासनाने १५ डिसेंबर रोजी खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे.
यामध्ये जिल्ह्याची पैसेवारी ही ५४.११ पैसे एवढी आली आहे. त्यामुळे यावर्षी परभणी जिल्हा दुष्काळच्या बाहेर फेकला गेला आहे, तर दुसरीकडे १०० पैशांपैकी शेतकऱ्यांच्या हातात केवळ ५४ पैसे पडले आहेत.