रस्त्यावर उभ्या बेवारस टेम्पोने घेतला तरुणाचा बळी; पाथरी-आष्टी रस्त्यावर पहाटे अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 04:26 PM2024-11-27T16:26:58+5:302024-11-27T16:29:49+5:30
पाथरी ते आष्टी रस्त्यावर सारोळा पाटीजवळ उभ्या टेम्पोवर दुचाकी पाठीमागून धडकुन अपघात
- विठ्ठल भिसे
पाथरी : पाथरी ते आष्टी रस्त्यावर सारोळा पाटीजवळ रस्त्यावर उभ्या बेवारस टेम्पोला पाठीमागून दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे साडेबाराच्या सुमारास घडली. सुरेश भागवत शिंदे ( २७) असे मृताचे नाव आहे.
पाथरी तालुक्यातील हदगाव बुद्रुक येथील तरुण सुरेश भागवत शिंदे परभणी येथे वेअर हाऊसवर कामाला होता. तो दररोज हदगाव बुद्रुक येथून परभणी येथे कामाला जात असे. मंगळवारी रात्री उशिरा सुरेश परभणी येथून काम आटोपून गावाकडे दुचाकीवरून परत निघाला. दरम्यान, पाथरी ते आष्टी रस्त्यावर सारोळा बुद्रुक पाटीजवळ रस्त्यावर शॉर्ट सर्किटमुळे जळालेला अपघातग्रस्त टेम्पो ( क्र. DL-1-GE 0935) उभा होता. पहाटे एक वाजेच्या दरम्यान टेम्पोचे कोणतेही इंडिकेटर सुरू नसल्याने सुरेशची दुचाकी टेम्पोला पाठीमागून धडकली. यात सुरेश शिंदेच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला पाथरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून सुरेश यास मृत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास साहेब पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट करत आहेत.
रस्त्यावर उभ्या बेवारस टेम्पोने घेतला तरुणाचा बळी
पाथरी ते आष्टी रस्त्यावर सारोळा पाटीजवळ दोन दिवसांपूर्वी आयशर टेम्पो शॉर्टसर्किटमुळे जळाल्याची घटना घडली होती. टेम्पो जळल्यानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला. टेम्पो रस्त्यामध्येच लावण्यात आला होता. टेम्पोचा रिफ्लेक्टर किंवा इंडिकेटर चालू नव्हते. त्यामुळे अपघातातील दुचाकीस्वाराला रस्त्यावरील टेम्पो लक्षात आला नाही. त्यामुळे रस्त्यावर उभ्या बेवारस टेम्पो तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे.