गंगाखेड: वेतनवाढीसह शासकीय सेवेत सहभागी करून घ्यावे, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्व मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी बुधवारी (दि. ११) शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसरातील तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आशा सेविका व गट प्रवर्तिका यांनी ठिय्या आंदोलन केले.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत चोवीस तास काम करणाऱ्या आशा सेविका व गट प्रवर्तिका यांना अत्यंत तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत असल्याने आशा सेविका व गट प्रवर्तिका यांनी वेतनवाढी संदर्भात संप सुरू केला आहे. संपावर गेलेल्या आशा सेविकांना वेतन वाढ देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी आमच्या मागण्यांसंबंधीचा निर्णय शासनाने घ्यावा अशी मागणी करत बुधवार रोजी तालुक्यातील आशा सेविका व गट प्रवर्तिकांनी ठिय्या आंदोलन करून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी आरोग्य खाते आशा व गतप्रवर्तक आयटक संघटनेचे जिल्हा संघटक वामनराव राठोड, सविता भिसे, एस.एम. स्वामी, एम.बी. ब्रिगणे, जे.पी. उदरे, तुळसा फड, मुक्ता सोनटक्के, काशीबाई गिरी, मिना निरस, वर्षा जलाले, अलका पैठणे, शिवनंदा वाकळे, मंदाकिनी सोन्नर, सुमन साठे, सारिका गायकवाड, सविता गिरी, शिला शिंदे, आम्रपाली साळवे, सरस्वती सावंत, शांता हाके, ज्ञानेश्वरी सिरसाट, प्रियंका गरड, उज्वला भालेराव, गिता फड, रुक्मिण केंद्रे आदीसह बहुसंख्य आशा सेविका व गट प्रवर्तिका उपस्थित होत्या.