परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यासाठी प्रशासनाने फारसे गांभिर्याने घेतले नाही. त्यामुळे मोजक्याच उमेदवारांची तपासणी झाल्याचे समोर आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची कोरोना तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तहसीलस्तरावर तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. त्याच दिवशी ज्यांच्या तपासण्या झाल्या तेवढ्याच तपासण्या पूर्ण झाल्या आहेत; परंतु, पहिल्या दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनेक उमेदवारांच्या तपासण्या झाल्या नाहीत. त्याचप्रमाणे निवडणूक कामासाठी नियुक्त असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्याही कोरोना तपासण्या झाल्या नसल्याची बाब सोमवारी संकलित केलेल्या माहितीतून पुढै आली आहे. मानवत, गंगाखेड, पाथरी या ठिकाणी ५०० पेक्षा अधिक तपासण्यांची संख्या आहे. परंतु, प्रत्यक्षात ९ हजार उमेदवार असल्याने किती उमेदवारांची तपासणी झाली? याचा आकडा प्रशासनाकडेही नाही.
जिल्ह्यात ८० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची निवड
ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग घटलेला असला तरी त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हाभरात ८० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे मतदान केंद्र अधिकारी १ ते ३ व मतदान केंद्राध्यक्ष असे प्रत्येक मतदान केंद्रावर ४ अधिकारी नियुक्त् करण्यात आले आहेत. या शिवाय पोलीस बंदोबस्तही राहणार आहे.
फिजिकल डिस्टन्सचे राहणार बंधन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मतदानाच्या दिवशी उमेदवार योजना केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिटायझर ठेवले जाणार असून, मतदाराच्या रांगेत फिजिकल डिस्टन्स ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच मास्कशिवाय मतदान केंद्रावर मतदानासाठी दाखल होता येणार नाही. गर्दीच्या केंद्रांवर थर्मल गणच्या सहाय्याने मतदारांच्या शारीरिक तापमानाची तपासणीही करण्या येणार आहे.