पाय मुरगळल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल; इंजेक्शन देताच रुग्णाच्या तोंडाला फेस अन् मृत्यू
By मारोती जुंबडे | Published: October 6, 2023 09:41 AM2023-10-06T09:41:25+5:302023-10-06T09:42:09+5:30
परभणी येथील घटना; अस्थिव्यंग विभागात सुरू होते उपचार
परभणी: पाय मुरगळल्याने जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात उपचारासाठी दाखल असलेल्या ४० वर्षीय रुग्णाला डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. या इंजेक्शननंतर रुग्णाच्या तोंडाला फेस येऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश करत आपला संताप व्यक्त केला.
परभणी शहरातील साखला प्लॉट भागातील भारत मोरे (४०) हे आपला पाय मुरगळला म्हणून जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात ३ ऑक्टोंबर रोजी उपचारासाठी दाखल झाले होते. मोरे यांना डॉक्टरांनी दाखल करून ५ ऑक्टोबर रोजी आपल्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर डॉक्टरांनी आपला उपचार सुरू केला. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मोरे यांना डॉक्टरांनी औषधी व इंजेक्शन दिले. मात्र त्यानंतर भारत मोरे यांच्या तोंडाला फेस येऊन त्यांना त्रास सुरू झाला. या रुग्णाची गंभीरता पाहून डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू विभागात पुढील उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारानंतर ५ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर नातेवाईकांनी आक्रोश करत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. या घटनेने जिल्हा रुग्णालय परिसरात खळबळ उडाली आहे.
रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह
नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूच्या तांडवानंतर परभणी जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांनीही बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयातील रुग्णांवर होत असलेल्या उपचारांची माहिती घेत आढावा घेतला होता. त्याचबरोबर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे सुद्धा शुक्रवारी दुपारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाची पाहणी करून प्रशासनाला योग्य ते सूचना देणार आहेत. मात्र शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भारत मोरे यांचा झालेला मृत्यू रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला आहे.
"भारत मोरे यांच्यावर अस्थिव्यंग रुग्णालयात योग्य ते उपचार सुरू होते. रुटीन डोस दिल्यानंतर त्यांच्या तोंडाला फेस येऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना आमच्यासाठी ही चॅलेंजिंग आहे.
- डॉ. जयश्री यादव, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक परभणी.
"डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णाच्या तोंडाला फेस येऊन त्रास सुरू झाला. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझे पती मला गमवावे लागले.
-कल्पना भारत मोरे, पत्नी