मजुरांअभावी शेती व्यवसाय अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:42 AM2021-01-13T04:42:14+5:302021-01-13T04:42:14+5:30
पाथरी : शेती व्यवसाय दिवसेंदिवस अडचणीचा ठरू लागला आहे. कधी नैसर्गिक संकटे तर कधी मजुरांअभावी शेतकरी हतबल झाला आहे. ...
पाथरी : शेती व्यवसाय दिवसेंदिवस अडचणीचा ठरू लागला आहे. कधी नैसर्गिक संकटे तर कधी मजुरांअभावी शेतकरी हतबल झाला आहे. मजुरीचा दर ३०० रुपयांवर जाऊन पोहचला आहे. त्यातच तालुक्यात शेती कामासाठी मजूर मिळत नसल्याने मजुरांअभावी शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
पाथरी तालुक्यात शेतकरी कापूस, सोयाबीन, हरभरा, ज्वारी, गहू या पिकांबरोबरच ऊस पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. मात्र या पिकांना नैसर्गिक संकटांचा दरवर्षी फटका बसतो. यावर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या जलस्रोतांना पाणी आहे. तर जायकवाडी धरणाच्या डाव्या क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणावर शेतकरी सिंचन करतात. त्यामुळे यावर्षी ऊस पिकासह अन्य बागायती पिके शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतली आहे. मात्र ऊस तोडणी सुरू असल्याने जवळपास १० हजारांपेक्षा अधिक मजुरांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे शेती कामासाठी तालुक्यातील ग्रामीण भागात मजूर मिळणे कठीण बनले आहे. मोठे शेतकरी यंत्रांचा वापर करून शेती करीत आहेत तर दुसरीकडे मध्यवर्गीय शेतकरी जमेल तेवढी मेहनत करून मुंबई, पुणे, नाशिक आदी महानगरात कामासाठी स्थलांरित होत आहेत. त्यामुळे जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मजुरांसाठी पायपीट करावी लागत आहे. सद्यस्थितीत शेती व्यवसाय मजुरांअभावी अडचणीत सापडला आहे.
शेती व्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात चालला आहे. उत्पादित केलेल्या मालाला भावाची कायम निश्चिता नाही. सालभार शेतात मजुरीसाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे नैसर्गिक संकटे व मजुरांच्या अभावामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
कल्याण चव्हाण, रामपुरी खु., शेतकरी
शेतकऱ्यांना पाडव्यापासून शेतीला नवीन सालगडी शोधावा लागतो. सालगडी वर्षभर शेतात काम करण्यासाठी लाखावर पैसे मोजावे लागत आहे. आता मजुरांची वाणवा निर्माण झाल्याने सालगडीही मिळत नाही. त्यामुळे शेती घाट्यात चालली आहे.
अशोक गिराम, शेतकरी, बाभळगाव