पहिल्या दिवशी ‘कृषी स्वावलंबन’ योजनेच्या ७० लाभार्थ्यांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:14 AM2021-01-14T04:14:28+5:302021-01-14T04:14:28+5:30
अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ...
अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत लाभार्थ्यांना नवीन विहिरीसाठी दोन लाख ५० हजार रुपये, तर इनर बोअरवेलसाठी २० हजार, पंपसेटसाठी २५ हजार, वीज जोडणीसाठी १० हजार रुपये, शेततळ्याच्या प्लास्टीक अस्तरीकरणासाठी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. परभणी जिल्हा परिषदेने २०१७-१८ या वर्षांपासून या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड केली. त्यानंतर, लाभार्थ्यांनी विहिरीही तयार केल्या, परंतु महावितरणकडून त्यांना विहिरीवर विद्युत मोटार बसविण्यासाठी नव्याने वीज जोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी विहीर असूनही पिकांना पाणी देऊ शकत नव्हते. या संदर्भात काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सिद्धार्थ हत्तिअंबीरे यांनी पाठपुरावा केल्यानंतर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी १२ ते १४ जानेवारी या कालावधीत यासाठी महावितरण विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लाभार्थी शेतकऱ्यांचे शिबिर घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिबिराला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा परिषद व महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, तसेच लाभार्थ्यांकडून सातबारा, ए वन फॉर्म, होल्डिंग, आदी कागदपत्रे व गुगल शीटवर वीजपुरवठा मागणीचा अर्ज भरून घेण्यात आला. यावेळी ७० जणांनी अर्ज दाखल केले. महावितरणची वीज जोडणीची वेबसाइट बंद असल्याने अर्ज दाखल करण्याची ऑनलाइन प्रक्रिया होऊ शकली नाही. हे सर्व अर्ज नंतर ऑनलाइन केले जाणार आहेत. हे शिबिर आज, बुधवार व उद्या गुरुवार असे आणखी दोन दिवस चालणार आहे.