शेतातील धुऱ्याच्या कारणावरून लाठ्याकाठ्याने प्राणघातक हल्ला; सहा आरोपींना कारावास
By ज्ञानेश्वर भाले | Published: October 4, 2023 05:23 PM2023-10-04T17:23:02+5:302023-10-04T17:23:21+5:30
सेलू प्रथम वर्ग न्यायमूर्तींचा निकाल
- रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (जि.परभणी) : शेतातील धुऱ्याच्या कारणावरून धनेगावात २० सप्टेंबर २०११ रोजी फिर्यादीसह कुटुंबातील सदस्यांवर लाठ्या काठ्याने मारहाण करीत प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणाच्या सुनावणीअंती सेलू न्यायालयाचे न्यायमूर्ती मंदार राऊत यांनी सहा आरोपींना दोषी ठरवत त्यांना १ वर्षाचा कारावास व १८ हजार दंड अशी शिक्षा सुनावली.
या प्रकरणात विश्वनाथ थोरवट यांची शेत मुरलीधर कटारे व बालासाहेब कटारे यांनी कंत्राटी पध्दतीने कसण्यासाठी घेतली होती. यादरम्यान कटारे यांचा सुनिल संपतराव कटारे यांचे सोबत धुऱ्याच्या कारणांवरून वाद झाला. त्यानंतर सुनील कटारे यांनी सेलू तहसीलदारांकडे तक्रार केली. याचा राग मनात धरून मुरलीधर कटारे, बाबासाहेब कटारे, शिवाजी कटारे, विठ्ठल कटारे, मुंजा कटारे, बालासाहेब विश्वनाथ थोरवट, रघुनाथ कटारे यांनी संगणमत करून २० सप्टेंबर २०११ रोजी दुपारी सुनिल संपतराव कटारे हे पत्नी, बहीण, दोन भाऊ व भावजय यांचे सोबत घरी जेवतांना यांचेवर आरोपीतांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण करीत प्राणघातक हल्ला केला.
या प्रकरणी सात आरोपीविरुद्ध सेलू ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी दोषारोपपत्र सेलू न्यायालयात दाखल केले. दरम्यान आरोपी रघुनाथ कटारे यांचे निधन झाल्याने कारवाई स्थगित झाली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता अँड. धुळे, अँड. खान यांनी काही साक्षीदार तपासले. त्यानंतर रुजू झालेले अँड. किसन कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे अंतीम युक्तीवाद केला. न्यायमूर्ती मंदार राऊत यांनी आरोपी व सरकार पक्ष अशा दोन्ही बाजुंच्या विधीज्ञांचा युक्तिवाद ग्राह्यधरुन या प्रकरणातील सहा आरोपी दोषी असल्याबाबत निष्कर्ष काढला.
२९ सप्टेंबरच्या निकालात मुरलीधर कटारे, बाबासाहेब कटारे, शिवाजी कटारे, विठ्ठल कटारे, मुंजा कटारे, बालासाहेब थोरवट या सहा आरोपींना १ वर्ष कारावास व १८ हजार रूपये दंड व या दंडातील १० हजार रूपये फिर्यादी सुनिल कटारे यांना अपील कालावधीनंतर नुकसान भरपाई देण्याची शिक्षा सुनावली आहे. कोर्ट पैरवी म्हणून वसिम शेख शेरू यांनी काम पाहिले.