परभणीत दुपारनंतर आंदोलन चिघळले; पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर, शहरात तणावपूर्ण शांतता

By विजय पाटील | Published: December 11, 2024 02:09 PM2024-12-11T14:09:03+5:302024-12-11T14:09:41+5:30

आंदोलकांनी स्टेशन रोड परिसरात दुकानाचे शटर, फलक, दुचाकी, चारचाकी वाहनांवर दगडफेक सुरू केली. रस्त्यावर फलक आणून ते जाळण्यात आले.

At Parbhani, the agitation raged after noon; Use of tear gas by the police, tense silence in the city | परभणीत दुपारनंतर आंदोलन चिघळले; पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर, शहरात तणावपूर्ण शांतता

परभणीत दुपारनंतर आंदोलन चिघळले; पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर, शहरात तणावपूर्ण शांतता

परभणी : संविधान अवमानना प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या परभणी बंदला दुपारनंतर हिंसक वळण लागले. त्यामुळे पोलिसांना आश्रुधुराचे नळकांडे फोडून बळाचा वापर करावा  लागला. शिवाय अग्नीशामकच्या वाहनातून आंदोलकांवर पाण्याचा फवारा मारून त्यांना पंगविण्यात आले. ठिकठिकाणी रस्त्यावर पेटविलेल्या टायरची आगही अग्निशमन दलाने विझविली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. 

सकाळपासूनच हे आंदोलन सुरू झाले होते. जिंतूर मार्ग, पाथरी मार्ग वसमत रोडवर विविध ठिकाणी आंदोलकांनी ठिय्या मांडला होता. तसेच टायरही जाळून वाहतूक रोखण्यात आली होती. याशिवाय शहरातील इतर काही मार्गांवरही अशीच परिस्थिती होती. मात्र दुपारनंतर वातावरण चिघळले. आंदोलकांनी स्टेशन रोड परिसरात दुकानाचे शटर, फलक, दुचाकी, चारचाकी वाहनांवर दगडफेक सुरू केली. रस्त्यावर फलक आणून ते जाळण्यात आले. तोपर्यंतही पोलिस बघ्याच्या भूमिकेतच होते. मात्र एक वाहन तोडफोड करून जाळल्यानंतर आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसताच पोलिस कुमक वाढविली. त्यांनी बळाचा वापर गर्दीवर नियंत्रण मिळवून ती पांगविण्याचा प्रयत्न केला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीकचा जमाव मात्र तसाच होता. शिवाय स्टेशन रोडवर दगडफेक सुरूच होती. त्यानंतर हा जमाव पोलिसांच्या वाहनांवर चालून गेला. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात पोलिस वाहनांवर दगडफेक झाली. पोलिसांवर लाठ्यांनी हल्लाही झाला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा वाढीव कुमक मागवून शहरातील विविध भागात आंदोलकांना पिटाळून लावले. यात काही ठिकाणी आश्रुधुराचाही वापर झाला. आंदोलकांनी दगडफेक केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केल्याने पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वसमत रोड भागातही पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली.

Web Title: At Parbhani, the agitation raged after noon; Use of tear gas by the police, tense silence in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.