परभणी : नवा देश घडविण्यासाठी कृषी क्षेत्राचे योगदान महत्वपूर्ण आहे. 'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी', असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. त्याचीच अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली असून, सर्वांनी जोमाने कामाला लागावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. त्यांनी आज दुपारी येथील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधक, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आंचल गोयल, कुलगुुरु डॉ. अशोक ढवण व राजभवनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक जयंत मीना, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ.देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राज्यपाल कोश्यारी यांनी विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मते जाणून घेतली. त्यावर डॉ.सय्यद इस्माईल, डॉ. उदय खोडके, डॉ. आनंद गोरे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ.स्मिता सोळंकी, प्राचार्या जया बंगाळे, डॉ. एस.पी. म्हेत्रे यांनी विविध विषयांकडे राज्यपालांचे लक्ष वेधले.
'चांगले काम करून आयुष्यात यशस्वी व्हा'; राज्यपालांचा विद्यार्थ्यांना कठीण परिश्रमाचा सल्ला
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, भारतीय स्वातंत्र्याचे अमृतोत्सवी वर्ष आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे. जास्तीत जास्त प्राध्यापकांची नियुक्ती झाली पाहिजे. त्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे; परंतु, कमी मनुष्यबळात आणि कमी सुविधांमध्ये अधिक चांगली कामे झाली आहेत. अध्यापक मंडळी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असतात. त्यामुळे अध्यापकांना कृषी व संबंधित विषयांमध्ये दुप्पट कामे करावे, असे आवाहन त्यांनी केले. कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी एकाच ठिकाणी परवाने मिळतील, अशी व्यवस्था करण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कृषी क्षेत्रात पेटंट वाढविण्यावर भर द्यामराठवाडा विभागात कृषी क्षेत्रातील पेटंटचे प्रमाण कमी आहे. त्या त्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन आणि वाणांचे पेटंट वाढवून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यास कृषी क्षेत्राला चालना मिळेल, तेव्हा अधिकाधिक पेटंटवर भर द्यावा, असा सल्लाही यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी दिला. प्रारंभी कुलगुुरू डॉ. अशोक ढवण यांनी कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याचा आढावा सादर केला. विद्यापीठाच्या वतीने कुलगुुरू डॉ. ढवण यांच्या हस्ते राज्यपाल कोश्यारी यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. रणजीत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.