परभणी- निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या विरोधात भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १७ जून रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
सर्वसामान्य जनतेचा ईव्हीएमवर विश्वास राहिला नाही. अनेक विकसित देशांमध्ये ईव्हीएमवर बंदी घालण्यात आली असून मतपत्रिकेद्वारेच मतदान घेतले जात आहे. त्यामुळे ईव्हीएमला भारतातून हद्दपार करण्यासाठी व लोकशाहीच्या रक्षणासाठी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात १७ जून रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत ईव्हीएम हटाव, देश बचाव या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच प्रत्येक तहसील कार्यालयासमोर घंटानाद करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार भारिपच्या वतीन सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ईव्हीएम विरोधात घोषणा दिल्या. तसेच प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा. प्रवीण कनकुटे, आलमगीर खान आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.