मोठी बातमी: परभणी- परळी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी ७६९ करोड निधीला मंजुरी
By राजन मगरुळकर | Published: December 7, 2023 04:04 PM2023-12-07T16:04:56+5:302023-12-07T16:05:57+5:30
परभणी-परळी या रेल्वे मार्गाचे एकूण अंतर ६४.७१ किलोमीटर एवढे आहे. दररोज या मार्गावर १५ ते २० रेल्वे धावतात.
परभणी : केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात सन २०१०-११ मध्ये मंजुरी मिळालेल्या परभणी-परळी दुहेरीकरण कामाला खऱ्या अर्थाने गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी दिल्लीच्या रेल्वे बोर्डाने ६ डिसेंबरला दक्षिण मध्य रेल्वे विभाग सिकंदराबादच्या जनरल मॅनेजर यांना लेखी पत्राद्वारे या दुहेरीकरण मार्गासाठी एकूण ७६९ करोड ९३ लाख रुपये निधीला मंजुरी दिल्याचे कळविले आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये या मार्गाचे दुहेरीकरण लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
दक्षिण मध्य रेल्वे विभागातील विविध मार्गावर दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाची कामे जलदगतीने पूर्ण केली जात आहेत. यामध्ये सद्य:स्थितीत मुदखेड ते परभणी मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. आता या मार्गावर विद्युतीकरणाची कामे सुरू आहेत. परभणी जंक्शन येथून पूर्णा, जालना सोबतच परळीकडे जाणारा मार्ग आहे. परभणी-परळी या रेल्वे मार्गाचे एकूण अंतर ६४.७१ किलोमीटर एवढे आहे. दररोज या मार्गावर १५ ते २० रेल्वे धावतात. सोबतच परळी येथील थर्मल पाॅवर स्टेशनसाठी लागणाऱ्या कच्च्या कोळशाची येथे दररोज मालगाडीद्वारे वाहतूक होते. त्यामुळे या मार्गावर दुहेरीकरण आवश्यक आहे. सदरील मार्गावर विद्युतीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. केवळ परभणी स्थानक येथून जोडणी प्रक्रिया पुढील काही महिन्यांमध्ये पूर्ण झाल्यानंतर रेल्वे विद्युतीकरणावर धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मात्र, सोबतच गेल्या दहा ते बारा वर्षांपासून दुहेरीकरण रखडलेल्या या मार्गाचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न पडला होता. सन २०१०-२०११ च्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पामध्ये परभणी-परळी रेल्वे मार्गाचा समावेश दुहेरीकरण कामासाठी केला होता. त्यानंतर प्रत्यक्षात कामासाठी निधी मिळाला नसल्याने हे काम अपूर्णच राहिले. सदरील काम पूर्ण करण्यासाठी लागणारा आवश्यक निधी मंजूर झाल्याने या मार्गाचे दुहेरीकरण होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. दरम्यान, सदरील रेल्वे बोर्डाच्या प्राप्त झालेल्या पत्राविषयी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभाग अधिकाऱ्यांनी गुरुवारी अधिकृत दुजोरा दिला.
१० नोव्हेंबरला काढली होती अधिसूचना
रेल्वे मंत्रालय दक्षिण मध्य रेल्वे विभागाने १० नोव्हेंबरला कामाबाबत अधिसूचना काढली होती. परभणी आणि परळी ६४.७१ किलोमीटर दरम्यान ट्रॅकचे दुहेरीकरण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड व परभणी या तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी आणि भूसंपादन अधिकारी यांना अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले होते. त्यानंतर पंधरा दिवसांतच या कामास फायनान्स डिरेक्टोरेट रेल्वे विभाग यांनीसुद्धा निधी मंजुरीला मान्यता दिल्याने काम जलद गतीने होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वे बोर्डाने ६ डिसेंबरला दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद येथील जनरल मॅनेजर यांना सदरील पत्र पाठविले. रेल्वे बोर्ड डिरेक्टर दीपक सिंग यांच्या स्वाक्षरीने हे पत्र काढण्यात आले आहे.
पिंक बुकमध्ये समावेश
या कामाच्या दुहेरीकरणासाठी एकूण ७६९ करोड ९३ लाख एवढी रक्कम आवश्यक आहे. रेल्वे बोर्डाच्या पिंक बुक सन २०२३-२४ मध्ये सदरील कामाचा समावेश केला आहे. त्यामध्ये सिव्हील, एस अँन्ड टी, इलेक्ट्रिकल टीआरडी, इलेक्ट्रिक जी अशा कामाचे वर्गीकरण करून हा एकूण निधी ७६९ करोड ९३ लाख वर्गीकरण केला.