दुसऱ्यांदा प्रेताला अग्नी दिला अन्‌ पोलिसांच्या जाळ्यात अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 08:00 PM2021-08-11T20:00:45+5:302021-08-11T20:01:43+5:30

Crime News in Parabhani : सेलू तालुक्यातील हिस्सी येथील परमेश्वर भीमराव गायके (४०) यांच्यावर १४ जून रोजी मध्यरात्री दोनवेळा अंत्यसंस्कार केल्याची कुजबुज दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ जून रोजी दिवसभर हिस्सी गावात सुरू होती.

The body was set on fire for the second time and he was caught by the police | दुसऱ्यांदा प्रेताला अग्नी दिला अन्‌ पोलिसांच्या जाळ्यात अडकला

दुसऱ्यांदा प्रेताला अग्नी दिला अन्‌ पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Next
ठळक मुद्दे दारूच्या नशेत तर्र बापाला मुलाने संपविले

- रेवणअप्पा साळेगावकर

देवगावफाटा ( परभणी ) : एकवेळ जेवण नसले तरी चालेल पण प्यायला दारू पाहिजे अन् दारू पिली की, अंगात जोश संचारल्यागत घरात सदैव होणारे भांडण बापाकडून विकोपाला गेले अन् पोटच्या मुलाने बापालाच संपवून टाकले. ही घटना सेलू तालुक्यातील हिस्सी येथे घडली. याप्रकरणी सेलू पोलिसांनी तपास करून खुनाच्या आरोपाखाली मयताचा मुलगा हाच मुख्य आरोपी असल्याचे समोर आणून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ( Son killed alcoholic father, incident in Parabhani ) 

सेलू तालुक्यातील हिस्सी येथील परमेश्वर भीमराव गायके (४०) यांच्यावर १४ जून रोजी मध्यरात्री दोनवेळा अंत्यसंस्कार केल्याची कुजबुज दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ जून रोजी दिवसभर हिस्सी गावात सुरू होती. त्यानंतर पोलीस पाटील सुदर्शन मगर यांनी या प्रकाराची माहिती १६ जून रोजी सेलू पोलीस ठाण्यात दिली. या माहितीवरुन काही वेळातच तत्कालिन पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, पोउपनी जसपालसिंग कोर्टतीर्थवाले, रामेश्वर मुंढे, गजानन गवळी, राहुल मोरे हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी पंचासमक्ष पंचनामा केला. यामध्ये घरातील फरशीवर पडलेले रक्त, अंत्यविधीसाठी बैलगाडीचा वापर हे पुरावे मिळाल्याने हा खुनाचा प्रकार असल्याच्या संशयाने तपास सुरू केला.

पोलिसांनी संशयित म्हणून मयताचा मुलगा हनुमान गायके (२१) यास चौकशीसाठी त्याच दिवशी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीअंती हनुमान गायके यांनी असे सांगितले की, वारंवार सांगूनही वडील परमेश्वर गायके हे दारूचे व्यसन सोडत नसल्याने दररोज घरात भांडण होत होते. यातूनच १४ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मी रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला अशी कबुली दिली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने त्याचे मामा राजेभाऊ येवले, सर्जेराव येवले (दोघे रा.नाथरा, ता.पाथरी) व आत्याचा नवरा भीमराव शेजूळ (रा.रामपुरी, ता.पाथरी) यांना बोलावून घेतले. त्यानंतर मध्यरात्री या ६ जणांंनी बैलगाडीचा वापर करून १ किलोमीटर अंतरावरील रेणाखळी शिवारातील आपल्या शेतात घाबरलेल्या अवस्थेत परमेश्वर गायके यांच्या प्रेताची विल्हेवाट लावली; परंतु प्रेत व्यवस्थित न जळाल्याने दुसऱ्यांदा प्रेताला अग्नी दिला. त्यामुळे हा प्रकार गावात समजला अशी कबुली हनुमान गायके यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. १७ जून रोजी आरोपी हनुमान गायके यास सेलू प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कोठडी तपासात हनुमान याने वडिलांना मारहाण केलेले लाकूड आणि स्वतःच्या रक्तांनी माखलेले कपडे पोलिसांना दिले. त्यानंतर त्याची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे. तो आता परभणी येथील कारागृहात आहे.

५ जणांना केले सहआरोपी
या प्रकरणात ५ जणांना सहआरोपी करण्यात आले. परमेश्वर गायके यांच्या प्रेताची विल्हेवाट लावणारे राजेभाऊ येवले, सर्जेराव यवले, भीमराव शेजूळ यांना २ ऑगस्ट रोजी सेलू न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे. यामध्ये दोघांचे वय कमी असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे, अशी माहिती तपास अधिकारी रामेश्वर तट, रामेश्वर मुंढे यांनी दिली.

Web Title: The body was set on fire for the second time and he was caught by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.