गंगाखेड : शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या सुरू असताना काही वीटभट्टी चालकांनी रॉयल्टी भरण्याकडे कानाडोळा केला असून, संबंधितांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी धजावत नसल्याने या विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय शासनाला या माध्यमातून मिळणारा महसूलही बुडत आहे.
गंगाखेड शहरासह तालुक्यात ९६ वीटभट्ट्या सुरू आहेत. यामध्ये गंगाखेड महसूल मंडळात ४२, महातपुरी महसूल मंडळात १८, माखणी मंडळात ५, तर राणीसावरगाव महसूल मंडळात ३० वीटभट्ट्या सुरू आहेत. या वीटभट्ट्यांच्या माध्यमातून दरवर्षी ३० लाख ८८ हजार रुपयांची रॉयल्टी वसूल करण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी व तलाठ्यांवर सोपविण्यात आली आहे. मार्चअखेरपर्यंत ही सर्व रॉयल्टी वसूल करणे अपेक्षित असताना याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. २०१९-२० या वर्षात गंगाखेड मंडळातील १०, महातपुरीतील ११. माखणीतील ३, राणीसावरगाव मंडळातील ८, अशा एकूण ३२ वीटभट्टी चालकांनी १२ लाख २६ हजार रुपयांची रॉयल्टी न भरता शासनाला चुना लावण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही रॉयल्टी वसूल करण्याची जबाबदारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची असताना त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.