सेलू येथून दुचाकी वाहने चोरीस जाण्याच्या घटना गेल्या ३ महिन्यांत मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल होऊनही चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे सेलूतील नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर १८ जुलै रोजी दुचाकी मालकानेच चोरट्यास रंगेहात पकडल्याचे समोर आले आहे. परभणी येथे राहणारे राजस्थानमधील फर्निचर बनविण्याचे काम करणारे कारागीर नरेंद्र बालाराम चौधरी हे रविवारी सेलू येथे एका मित्राचे फर्निचर काम पाहण्यासाठी गेले होते. सायंकाळी ७ वाजता त्यांनी त्यांची एमएच २२ एएस ०३८४ क्रमांकाची दुचाकी शहरातील एका दवाखान्यासमोर उभी केली होती. अर्ध्या तासानंतर ते काम पाहून दुचाकी उभी केलेल्या ठिकाणी आले असता एका व्यक्ती त्यांनी दुचाकी ढकलत घेऊन जात असल्याचे दिसून आले. यावेळी चौधरी व त्यांच्या मित्राने धावत जाऊन त्यास पकडले. यावेळी दुचाकी का घेऊन जात आहे, अशी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी त्याने त्याचे नाव प्रमोद गणेशराव सावंत (वय ३४ वर्ष रा. करडगाव ता.सेलू) असे सांगितले. चोरट्यास पकडून त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. याबाबत नरेंद्र चौधरी यांनी १९ जुलै रोजी सेलू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी प्रमोद गणेशराव सावंत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुचाकी चोरटा पोलिसांच्या तावडीत सापडल्याने शहरात अन्य वाहने चोरीस गेल्याच्या घटनेतील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.