राज्यमार्गावर सिमेंट व नाल्यांना ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:14 AM2021-01-14T04:14:52+5:302021-01-14T04:14:52+5:30
पाथरी : राज्यमार्ग क्र. ६१ च्या रस्त्याचे काम तालुक्यातील हादगाव बुद्रुक येथील बसस्थानक परिसरात सुरू आहे. मात्र, या ठिकाणी ...
पाथरी : राज्यमार्ग क्र. ६१ च्या रस्त्याचे काम तालुक्यातील हादगाव बुद्रुक येथील बसस्थानक परिसरात सुरू आहे. मात्र, या ठिकाणी वसाहती असल्याने सिमेंट रस्ता आणि दोन्ही बाजूंनी नाला करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करून संबंधित विभागाने डांबरीकरण प्रस्तावित केले आहे. त्यामुळे या भागात दळणवळणाच्या समस्या निर्माण होणार आहे.
राज्यमार्ग ६१ हा अंबड-आष्टी-पाथरी-पोखर्णी- ताडकळस-पूर्णा- नांदेड या मार्गावरून जातो. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम सर्वेक्षण करून डीपीआर तयार करण्यात आला होता. पाथरी तालुक्यात या रस्त्याची लांबी जवळपास ५७ कि.मी.ची आहे. सध्या तालुक्यातील हद्दीत अष्टीकडून येणाऱ्या रस्त्यावर वेगाने काम सुरू आहे. पाथरी-पोखर्णीपर्यंचे काम जवळपास पहिल्या टप्प्यात पूर्ण होत आहे. आष्टी-पाथरी रस्त्याजवळ हादगाव बुद्रुक गाव परिसरात सिमेंट रस्ता व रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाला करणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित विभागाने डीपीआर तयार करताना या दोन्ही घटकांचा समावेश न करता डांबरीकरणाचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे हादगाव बुद्रुक ग्रामस्थांना भविष्यात दळणवळणाच्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
ग्रामस्थांची सा. बां. कडे धाव हादगाव बुद्रुकच्या गावठाण परिसरातील रस्त्यावर दोन वसाहती आहेत. या ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ता आणि नालीचे काम करणे आवश्यक आहे. यासाठी सा. बां. बांधकाममंत्री अशोक चव्हाण व सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे जि.प.च्या सदस्य भावनाताई नखाते व ग्रामस्थांनी लेखी तक्रार केली आहे. तसेच हादगाव बुद्रुक ग्रामपंचायतीने ७ ऑगस्ट २०२० रोजी ठराव घेऊन या ठिकाणी सिमेंट काँक्रीट व नालीचे काम करण्याची मागणी केली आहे.