कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी शाळेत इतर मुलांच्या माध्यमातून अथवा इतरांच्या संपर्कातून आपल्या मुलांना कोरोना संसर्ग होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. कोरोनाची भीती तर आहेच. शिवाय मुलांचे शिक्षणही थांबू नये, या भावनेने पालकांनी विशेषत: मुलांच्या मातांनी काळजावर दगड ठेवून मुलांना शाळेत पाठविण्याची संमती दिली आहे. त्यामुळे शाळेतून घरी आल्यानंतर मुलांबाबत पालक अधिक काळजी घेत आहेत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही पालकांकडून काळजीपूर्वक खबरदारी घेतली जात आहे.
काळजी आहेच, पण शिक्षणही महत्त्वाचे !
मुलाचे दहावीचे वर्ष असल्याने शिक्षणाची काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळेत पाठविण्यास हरकत नाही. योग्य ती खबरदारी घेत आहे.
- माधुरी परळीकर, पालक
आरोग्याबरोबरच शिक्षणही तेवढेच महत्त्वपूर्ण आहे. दोन वर्षांनंतर शाळा सुरू झाल्या असून, मुलांच्या आरोग्याचीही काळजी घेत आहे. मास्क, सॅनिटायझर बंधनकारक केले.
- आरती वाघ, पालक
कोरोनामुळे मुलांची काळजी वाटते; परंतु योग्य खबरदारी घेतली तर शाळेत पाठविण्यास हरकत नाही. त्यामुळेच स्वत: काळजी घेत मुलांना शाळेत पाठविले.
- शिवकन्या पारटकर पालक
शाळेतून घरी येताच कपडे बदला, अंघोळही करा !
कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी मुलांनी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी पालकांनीच पुढाकार घेणे गरजेचेे आहे. मुले शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना स्नान करण्याची सवय पालकांनी लावणे आवश्यक आहे. शिवाय शाळेत जाताना मास्क तसेच सॅनिटायझर मुलांसोबत देणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेतली तर कोरोनापासून बचाव होईल तसेच शिक्षणातही खंड पडणार नाही.