पत्रकार भवन परिसरातील बेवारस बॅगमुळे नागरिकांना फुटला घाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 01:37 PM2020-12-04T13:37:22+5:302020-12-04T13:38:04+5:30
पत्रकारभवनच्या गॅलरीत सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका व्यक्तीला बेवारस बॅग आढळून आली.
परभणी: शहरातील पत्रकार भवनमधील गॅलरीत शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास काही नागरिकांना बेवारस बॅग आढळून आली. त्यामुळे नागरिकांत खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने केलेल्या तपासाअंती कपडे व काही कागद आढळून आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात असलेल्या पत्रकारभवनच्या गॅलरीत सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका व्यक्तीला बेवारस बॅग आढळून आली. त्यानंतर त्यांनी इतरांना ही माहिती सांगितली. ही बॅग कुणाची आहे, कोणी आणून ठेवली, याची पडताळणी सुरु झाली; परंतु, याबाबतचा बॅग ठेवणाऱ्या व्यक्तीचा पत्ता लागत नसल्याने पोलीस कंट्रोल रुमला फोन करण्यात आला. त्यानंतर ३ मिनिटांत बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले.
या पथकाचे प्रमुख किशोर बोधगिरे, कर्मचारी संतोष वाव्हळ, शिवाजी काळे, प्रविण घोंगडे, इमरान शेख, प्रेमदास राठोड, अशोक कांबळे या कर्मचाऱ्यांनी अत्याधुनिक यंत्र व श्वानाच्या मदतीने बॅगची तपासणी केली. यावेळी बॅगमध्ये कपडे व काही कागद असल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. यावेळी बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.